29 June 2010

संग्रहालय वैद्यकशास्त्राच्या इतिहासाचे

जगात औषधांचा वापर आणि वैद्यक विश्वाचा जन्म कधी झाला, जगातला सर्वात प्रथम डॉक्टर कोण किंवा कोणते वैद्यक शास्त्र प्रथम अस्तित्वात आले, असे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात. सगळ्यानाच त्याची उत्तरे माहिती असतातच असे नाही. पण आता आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे याविषयीची माहिती देणारे अनोखे संग्रहालय उभे राहिले आहे.

नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात हे संग्रहालय उभे राहिले आहे. आदिती वैद्य आणि तिच्या सहकाऱयांनी हे संग्रहालय उभारले आहे.

या विषयी सविस्तर माहिती देणारी प्रसाद मोकाशी यांची बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २९ जून २०१० च्या अंकात पान क्रमांक एक वर प्रसिद्ध झाली आहे. या बातमीची लिंक पुढीलप्रमाणे...

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=81391:2010-06-28-15-04-31&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
  
या संग्रहलयाला केवळ वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही भेट दिली पाहिजे.  आजवरच्या वैद्यकशास्त्राचा इतिहास या संग्रहालयाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडला गेला आहे.

28 June 2010

कृत्रिम पावसासाठी वरुण यंत्र

गेल्या काही वर्षांत पाऊस लहरी झाला असून त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या वर्षी मुंबईत पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. कृत्रीम पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातात मात्र त्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च येतो. मात्र कमी खर्चात हा प्रयोग करता आला तर, डॉ. राजा मराठे या अभियंत्याने असा प्रयोग केला असून त्यांनी पाऊस पाडणारे वरुण यंत्र तयार केले आहे. सकाळ मध्ये काही दिवसांपूर्वी  याविषयची सविस्तर बातमी प्रकाशित झाली होती. ही बातमी सगळ्यापर्यंत पोहोचावी म्हणून आज त्याविषयीची माहिती... 


डॉ. राजा मराठे हे  मुंबईमधील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'चे ते पदवीधर आहेत आणि अमेरिकेच्या राईस विद्यापीठातून पीएच. डी. मिळविली आहे. भारताने बनविलेल्या "परम' या पहिल्या महासंगणकाच्या विकासकार्यात त्यांचा सहभाग होता. सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या डॉ. मराठे यांनी गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील सुजलेगाव येथे कृत्रिम पावसाबाबतचे काही प्रयोग केले. अशा दहा प्रयोगांत नऊ वेळा पाऊस झाला आहे. सुजलेगाव परिसरातील अन्य गावांतही त्यांनी हा प्रयोग केला आहे.

कृत्रिम पावसाचे अनेक प्रयोग जगभर होत असतात. त्यांपैकी सर्रास केला जाणारा प्रयोग म्हणजे विमानाद्वारे ढगात सिल्व्हर आयोडाईडची फवारणी करणे. या खेरीज खास बनविलेल्या रॉकेटद्वारा किंवा तोफांद्वाराही सिल्व्हर आयोडाईडची फवारणी केली जाते. बहुतेक ठिकाणी हे प्रयोग सरकारकडून केले जातात, शिवाय त्यांचा खर्चही अधिक असतो.

डॉ. मराठे यांनी "वरुण यंत्रा'चा छोटेखानी प्रयोग सुरू केला आहे. कृत्रिम पावसाच्या कोणत्याही प्रयोगात ढगापर्यंत उत्प्रेरक नेले जाते. पाऊस पडण्यासाठी ढगामधील पाण्याचे छोटे छोटे थेंब एकमेकांकडे आकर्षित होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी उत्प्रेरकाची गरज असते. मिठाचे सूक्ष्म कण हे उत्प्रेरकासारखे काम करतात. ढगामध्ये विमानाने मिठाची फवारणी शक्‍य नसल्यास जमिनीवर भट्टी करून त्यात मिठाचे कण टाकल्यास ते ढगापर्यंत पोहोचू शकतात. हे तत्त्व वापरून डॉ. मराठे यांनी  प्रयोग केले आहेत. हा प्रयोग कोणालाही सहजगत्या करता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गावात तो होऊ शकेल. तसे झाल्यास पाऊस न पडण्याच्या अडचणीवर मात करता येईल.

हा प्रयोग करण्यासाठी वातावरण ढगाळ असणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रयोगाच्या वेळी हवेत चांगला ओलावा (आर्द्रता) असायला हवा आणि वारे नसावेत. पहाटेची किंवा सायंकाळची वेळ प्रयोगासाठी चांगली असल्याचे डॉ. मराठे यांचे म्हणणे आहे. या प्रयोगासाठी "आयआयटी'मधील आजी-माजी सहकाऱ्यांनी; तसेच रोहिणी नीलेकणी यांची त्यांना मदत केल्याचे झाली आहे.

"वरुण यंत्रा'चे नमुने डॉ. राजा मराठे यांनी तयार केले आहेत. त्याची किंमत २२५० रुपये आहे. सुजलेगाव (ता. नायगाव, जि. नांदेड) येथून ती मिळतील. हे यंत्र म्हणजे दोनशे लीटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. तिच्या दोन्ही बाजूंकडील पत्रे नसतात. त्यामुळे पोकळ असलेल्या या टाकीच्या एका बाजूला लोखंडी गजांची जाळी बसवतात. याच जाळीवर एक सच्छिद्र आडवी नळी बसविली असते. तिच्या मध्यभागी काटकोनातून दुसरी नळी बसवून ती बाहेर काढतात. या नळीला "ब्लोअर' किंवा भाता जोडला जातो. विजेवर चालणारे "ब्लोअर' चालू केल्यास टाकीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढतो. वीज नसल्यास भाता वापरला तरी चालतो.

या टाकीत जळण म्हणून लाकडे, गोवऱ्या, भुश्‍श्‍याच्या विटा सहा इंचापर्यंत रचून ठेवाव्यात. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून पेटवावे. चांगला जाळ पेटल्यानंतर भुश्‍श्‍याच्या गोवऱ्या किंवा लाकडाच्या ढिपल्या दोन फुटांपर्यंत टाकीत टाकाव्यात. त्यानंतर "ब्लोअर'ने किंवा भात्याने जोरात हवा द्यावी. भट्टी चांगली पेटवून वर आगीचा जाळ यायला लागल्या की त्यात सुमारे सहा किलो मीठ (बारीक) थोडे-थोडे टाकत राहावे.

हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आर्द्रता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्‍यक आहे. आर्द्रता मापक यंत्र कोणत्याही शाळेत वा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असते. वरुण यंत्राचे तंत्रज्ञान खुले असून डॉ. मराठे यांनी या यंत्राची नक्कल करण्यास सर्वांना परवानगी दिली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क  डॉ. राजा मराठे ९९७०४३५७४०,
उमाकांत देशपांडे नावंदीकर- ९९२२७२४१०३,
संतोष देशमुख सुजलेगावकर ९९७०४६३९०२.

27 June 2010

सुप्रिया सुळे यांचा डबल गेम

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न आता चर्चेत आहे. सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असून त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधाऱयांवर दबाव आणण्याची गरज आहे. बारामती मतदार संघातून सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेल्या मृणालिनी काकडे यांनी केलेल्या याचिकेवरून हे प्रकरण उघडकीस आले.

काकडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली नसती तर झाकली मूठ तशीच राहिली असती. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार हे केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला समर्थन देणारे एक बडे नेते असल्याने याचिकेवर सुनावणी घेण्यासही मुद्दामहून विलंब लावण्यात आला, असा आरोप काकडे यांनी केला होता. हिच बाब सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडली असती तर इतका वेळ काढला गेला असता का, भारतीय राज्य घटना आणि भारतीय दंड संहितेनुसार जी शिक्षा असेल ती त्या माणसाला भोगावी लागली असती. पण येथे प्रकरण वेगळे असल्याने चालढकल करण्यात येत आहे.

कोणत्याही भारतीय नागरिकाने अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व किंवा कायम वास्तव्य स्वेच्छेने स्वीकारले की भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. त्यामुळे आता सुप्रिया सुळे भारताच्या नागरिक राहिल्या नसल्याचे जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एखाद्या परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर ती गोष्ट लपवून खासदारकीची निवडणुक लढवणे हीच मुळात बेकायदा बाब आहे. लोकांना उपदेशाचे डोस पाजणाऱया भारतीय नेत्यांनी पहिल्यांदा आपल्या पायाखाली काय जळते आहे ते पाहावे.

खरे तर हा मुद्दा शिवसेना, भाजप किंवा कॉंग्रेससाठीही शरद पवार यांना राजकारणातून नेस्तनाबूत करण्यासाठी हातात मिळालेले आयते कोलीत आहे. आयपीएल प्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप कऱण्यात आले होते. मात्र त्यातून ही मंडळी कोणतीही शिक्षा न होता सहीसलामत सुटली. मात्र हे प्रकरण तसे नाही. येथे उघड पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या विषयावर शिवसेना व भाजप आणि अन्य विरोधी पक्षांनी देशभरात जोरदार संघर्ष करायला पाहिजे, मात्र अद्याप या प्रश्नावर या पक्षाचे वरिष्ठ नेते मूग गिळून गप्प बसले आहेत.

सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असल्याचे समोर आल्याने त्यांनी बारामती मतदार संघातून लढवलेली निवडणुक बेकायदेशीर ठरते. तसेच या प्रकरणी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सुळे यांचे वडील अर्थातच शरद पवार हे दोषी ठरतात. शरद पवार हे राजकारण करताना काय काय बेकायदेशीर गोष्टी करत असतात, त्याचा उघड झालेला हा एक भाग. पडद्याआड अशा कितीतरी गोष्टी असतील. कॉंग्रेसलाही शरद पवार वेळोवेळी अडचणीत आणत असतात, त्यामुळे आता सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही कठोर भूमिका घेऊन या प्रकरणाची तड लावली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधानांनी पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

भारतीय राजकारणी किती नालायक आणि सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात करणारे आहेत, हे सुप्रिया सुळे प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे. आता मतदारांनी याचा जाब विचारण्याची गरज आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विश्वासघाताचा धडा त्यांना मिळालाच पाहिजे. सुज्ञ मतदारांनी आगामी विधानसभा, लोकसभा, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्व पातळीवरील निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाडून अद्दल घडविण्याची आता वेळ आली आहे.

पण ते होईल का, वाचक किंवा मतदार अशा गोष्टी वाचतात, चर्चा करतात आणि सोडून देतात. मतदारांची स्मृती अल्प असते, म्हणूनच आम्ही काहीही करू शकतो, अशा विचारातून भारतातील राजकीय नेते व पक्ष मुजोर झाले आहेत. भारतीय मतदारांना येथील राजकीय नेते आणि पक्षांनी कायमच गृहीत धरलेले आहे. त्याचेच परिणाम आपण भोगतो आहोत. खोटेपणा करण्यात सुप्रिया सुळे या आपल्या वडिलांच्याच तालमीत तयार झाल्या आहेत.

आता आणखी काही दिवस वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमातून याविषयी बातम्या येतील आणि नंतर सगळे शांत होईल. न्यायालयापुढे सगळे समान, असे आपण नुसते म्हणतो. सर्वसमान्यांना एखाद्या गुन्ह्यासाठी जो न्याय लावला जातो, तो राजकारणातील बड्या धेंडाना लावला जाईल का...
 

26 June 2010

चिंता करितो विश्वाची

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरील सुनील चिंचोलकर लिखित चिंता करितो विश्वाची हा ग्रंथ नुकताच वाचनात आला. १४ मार्च २००६ मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती आणि अवघ्या तीन वर्षात पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. हा ग्रंथ श्री गंधर्व वेद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. ४७२ पानी या ग्रंथाची किंमत ४०० रुपये इतकी आहे.

प्राचार्य राम शेवाळकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. या ग्रंथात मोगलांच्या आक्रमणाने पिचलेला महाराष्ट्र, समर्थ रामदास स्वामी यांचे पूर्वज, समर्थांची जन्मभूमी, त्यांचे माता-पिता, थोरले बंधू, समर्थांचा जन्म, त्यांचे बालपण, श्रीराम यांचे झालेले दर्शन व अनुग्रह, विवाह मंडपातून पलायन, नाशिक येथे पंचवटीला झालेले आगमन, टाकळीतील दिनचर्या, करुणाष्टकांची रचना, शहाजी राजे व बालशिवाजी यांची भेट, पहिला मठ, पहिला मारुती व पहिला शिष्य, समर्थ रामदास स्वामी यांचे भारत भ्रमण, महाबळेश्वर येथे झालेले आगमन, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट, सज्जनगडावरील वास्तव्य, समर्थ रामदास स्वामी यांचे राजकारण असे विविध विषय या ग्रंथाच हाताळले आहेत.

समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झालीच नाही, रामदास स्वामी शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे काही मंडळींकडून सांगण्यात येते. चिंचोलकर यांनी या ग्रंथात काही जुने दाखले, हस्तलिखिते यांचे दाखले देऊन रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची अनेक वेळा भेट झाली होती, शिवाजी महाराजांना रामदास स्वामी वेळोवेळी कसे मार्गदर्शन करत होते, हे स्पष्ट केले आहे.

चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने लेखक चिंचोलकर या ग्रंथात म्हणतात की, शंभर दिवसात लिहिलेला हा ग्रंथ शंभर दिवसात छापून तयार झाला. त्याची पहिली आवृत्ती प्रकाशनपूर्व नोंदणीतच संपली. चौथी आवृत्ती समर्थभक्तांच्या सेवेसाठी सादर करत आहोत.  आता वेध लागले आहेत ते या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशनाचे. या इंग्रजी अनुवादाच्या ४०० प्रती जगातील ४०० ग्रंथालयांना भेट म्हणून पाठवून समर्थांची ४०० वी जयंती संपन्न करण्याचे सदभाग्य समर्थांनी आम्हास द्यावे, ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र प्रार्थना.

हा संपूर्ण ग्रंथ अभ्यासकांच्या दृष्टीने आणि समर्थ भक्तांसाठीही महत्वाचा आहे.

प्रकाशक संपर्क
दीपक खाडिलकर, श्री वेद गंधर्व प्रकाशन, १२८६, सदाशिव पेठ, चिमण्या गणपतीजवळ, पुणे-४११०३०, दूरध्वनी (०२०-२४४९३५०२)

लेखक संपर्क
सुनील चिंचोलकर, अजिंक्य नगर, हिंगणे खुर्द, पुणे-४११०५१
दूरध्वनी (०२०-२४३४८०७०)
         

25 June 2010

मराठी नाटय़सृष्टीतले ‘गंधर्वयुग’

मराठी रंगभूमीवरील अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांचा २६ जून हा जन्मदिन! (जन्म २६ जून १८८८. महानिर्वाण १५ जुलै १९६७). आपल्या स्वर्गीय संगीताने, अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण केले. श्रीराम रानडे यांनी लिहिलेला हा लेख लोकसत्ता पुणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

‘‘आपल्या सखीगणांसह शकुंतलेने रंगभूमीवर प्रवेश करताच आपल्या नेत्रांचे सार्थक झाले, असे प्रेक्षकांना वाटले. कण्वमुनींच्या तापसी आश्रमास शोभेल असा साधा वेष तिने परिधान केला होता. ‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते’, या दुष्यंताच्या उक्तीची सार्थकता पटत होती. ‘वृक्ष वेल या दोहींची जोडी शोभते’, हे पद जेव्हा ती गाऊ लागली त्या वेळी जणू काय स्वर्गीय संगीत ऐकल्याचा भास प्रेक्षकांना झाला आणि पहिल्या प्रवेशाच्या अखेरीस ‘सखये अनुसये, थांब की गं बाई’, हे पद म्हणत पायात रुतलेल्या दर्भाकुराच्या किंवा कोरांटीस अडकलेली साडी सोडविण्याच्या निमित्ताने दुष्यंताकडे नेत्रकटाक्ष टाकीत, लयबद्ध पावले टाकीत, तिच्या सख्यांच्या मागोमाग जाऊ लागली त्या वेळी तिच्या भावपूर्ण चेहऱ्यावर दुष्यंताप्रमाणे प्रेक्षकही अनुरक्त झाले..’’

शनिवार, ५ जानेवारी आणि रविवार, ६ जानेवारी १९०६. मिरजेतील सरकारी थिएटरात हा जणू चमत्कारच घडला. वरील दोन्ही दिवशी सरकारी नाटय़गृहात प्रेक्षकांची एकच गर्दी उसळलेली होती. सांगली, मिरज, बुधगाव येथील प्रेक्षक होतेच, पण पुणे, कोल्हापूर, बेळगाव येथील रसिक प्रेक्षक आवर्जून ‘शाकुंतल’ नाटकाला उपस्थित होते. कोल्हापूरहून आलेल्या प्रेक्षकांचे नेतृत्व छत्रपती शाहूमहाराजांकडे होते. त्यापूर्वीच्या चार-पाच वर्षांत किलरेस्कर नाटक मंडळींच्या नाटकाला अशी गर्दी उसळली नव्हती. १३ फेब्रुवारी १९०१ रोजी किलरेस्कर मंडळीत नायिकेची भूमिका करणारे भाऊराव कोल्हटकर (भावडय़ा) मृत्यू पावले आणि किलरेस्कर मंडळीचे सौभाग्यच हरवले, पण मिरज मुक्कामी झालेल्या ‘शाकुंतल’च्या प्रयोगानंतर किर्लोस्कर मंडळींचेच नव्हे तर अवघ्या मराठी रंगभूमीचे सौभाग्य आपल्या पायांनी पुन्हा चालत आले होते. ज्या व्यक्तीच्या पावलांनी हे सौभाग्य परत आले होते, त्या व्यक्तीचे नाव- नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व!

पुण्यातील शुक्रवार पेठेतील मोरगावकरांच्या वाडय़ानजीकच्या एका घरात २६ जून १८८८ रोजी सायंकाळी ६ वाजून २ मिनिटांनी नारायणाचा जन्म झाला. नारायणचे बालपण शब्दसुरांच्या संगतीतच गेले. शालेय शिक्षणाकडे मात्र या मुलाचा ओढा कमीच होता. जळगाव येथे मेहबूबखान यांच्याकडे नारायण शास्त्रशुद्ध गाणे शिकू लागला. पुण्यात लोकमान्यांनी नारायणाचे गाणे ऐकले आणि त्यांच्या तोंडून सहजोद्गार निघाले, ‘हा बालगंधर्व फार सुरेख गातो’ आणि तेव्हापासून ‘बालगंधर्व’ या नावानेच नारायण ओळखला जाऊ लागला.

मिरज मुक्कामी देवल मास्तर, चिंतोबा गुरव, दादा लाड, गणपतराव बोडस, शंकरराव मुजुमदार, नानासाहेब जोगळेकर, पांडोबा क्षीरसागर अशा जाणत्यांसमोर नारायणाने आपल्या आवडीच्या काही चिजा म्हटल्या व अखेरीस अण्णासाहेब किलरेस्करांच्या ‘रामराज्य वियोग’ नाटकातील ‘धन्य जाहला, तुम्ही माझा राम पाहिला’ हे गीत म्हटले. त्याचे गाणे सर्वाना आवडले. ‘नारायणा, तू स्त्री पार्टी करशील काय,’ असे देवलमास्तरांनी विचारले आणि त्यावर ‘शिकवल्यास करीन,’ असे १७ वर्षांच्या नारायणाने उत्तर दिले. नारायणाचा- बालगंधर्वाचा किलरेस्कर मंडळीत गुरुद्वादशीच्या सुमुहूर्तावर ऑक्टोबर-१९०५ला मिरज मुक्कामी प्रवेश झाला. सुरुवातीला ‘शारदा’ नाटकातील नटी- सूत्रधाराच्या प्रवेशाची रंगीत तालीम झाली. ‘नटीची भूमिका’ आणि ‘नाटक झाले जन्माचे’ हे तिच्या तोंडी असलेले पद म्हणून बालगंधर्वानी मोजक्याच, पण रसिक प्रेक्षकांकडून पसंतीची टाळी मिळविली आणि हा शकुंतलेची भूमिका करण्यास सर्वथैव योग्य अशी किलरेस्कर मंडळींच्या सर्वाचीच खात्री पटली. काही वर्षांपूर्वी ‘फुटक्या काठाचं मडकं’ म्हणत ज्याची संभावना केली तोच हा मुलगा, गायनाचा, अभिनयाचा सुवर्णकलश मिरवत कंपनीत आला आणि पुढील काळात त्याने आपल्या नावाची सुवर्णमुद्राच रंगभूमीवर उमटवली.

१९०५ ते १९१३च्या जुलै महिन्यापर्यंत बालगंधर्व किलरेस्कर मंडळीत होते. आपल्या मधुर आवाजाने आणि अप्रतिम लावण्यसंपदेने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शकुंतला (शाकुंतल), नटी (शारदा), विषया (चंद्रहास), सरोजिनी (मूकनायक), सुभद्रा (सौभद्र) या भूमिका करून त्यांनी स्वत:ची अभिनयातली आणि गायनातली प्रगती उंचावलीच, त्याचबरोबर किर्लोस्कर मंडळीलाही अपार यश मिळवून दिले.

नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे किर्लोस्कर संगीत मंडळीच्या रंगभूमीवर आलेले पहिले संगीत नाटक ‘मानापमान!’ ‘मानापमान’चा पहिला प्रयोग १२ मार्च १९११ रोजी मुंबईत झाला. (‘मानापमान’ नाटकाच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे). प्रयोग दुपारचा होता. नानासाहेब जोगळेकर (धैर्यधर), गणपतराव बोडस (लक्ष्मीधर) आणि बालगंधर्व (भामिनी) असा त्रिवेणीसंगम! गोविंदराव टेंबे यांचे संगीत, पण दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी बालगंधर्वाची लाडकी मुलगी वारली. नियोजित प्रयोग रद्द करण्याचे ठरत होते, पण बालगंधर्वानी त्याला ठाम नकार दिला. खेळ झाला. ‘टकमक पाही’ या ‘मानापमाना’तल्या पहिल्या गाण्यापासूनच बालगंधर्वाना वन्समोअर मिळू लागला. त्यांची ‘भामिनी’ रंगतच गेली. स्वत:चे दु:ख बाजूला सारून संस्थेची, स्नेहय़ांची आणि रंगभूमीची काळजी वाहणारा श्रद्धाळू कलावंत म्हणून बालगंधर्वाची प्रतिमा रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाली. किलरेस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडून बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे यांनी स्वत:ची स्वतंत्र नाटय़कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या बुधवार पेठेतील ढमढेऱ्यांच्या बोळातील माळय़ाची धर्मशाळा भाडय़ाने घेतली. ५ जुलै १९१३ रोजी पुष्य नक्षत्रावर सायंकाळी साडेपाच वाजता नव्या नाटय़संस्थेचा नारळ फोडला. नाटय़संस्थेला ‘न्यू किर्लोस्कर नाटक मंडळी,’ असे परंपरादर्शक नाव द्यावे, असे घाटत होते. परंतु काकासाहेब खाडिलकरांनी सुचवलेले नाव तात्यासाहेब केळकरांनाही पसंत पडले आणि कंपनीचे नामकरण झाले, ‘गंधर्व नाटक मंडळी.’ राम गणेश गडकऱ्यांना मात्र किर्लोस्कर नाटक मंडळीमधून फुटून नवीन नाटय़संस्था काढण्याचे मुळीच मान्य नव्हते. त्यांना विलक्षण संताप आलेला होता. ‘आमच्या नवीन कंपनीचा नारळ फुटला बरं का,’ असं गणपतराव बोडसांनी त्यांना सांगताच, ‘नारळ फुटला, आता कंपनी कधी फुटणार?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला होता.

‘गंधर्व नाटक मंडळी’चा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ‘मूकनायक’ नाटक प्रथम रंगमंचावर आणले. ‘शाकुंतल’, ‘रामराज्यवियोग’ असे नाटकांचे प्रयोग सुरू झाले. ‘मानापमान’ आणि ‘सौभद्र’ नाटकांच्या प्रयोगांचे हक्क मिळविण्यास थोडा विलंब लागला, त्यामुळे उत्पन्नाचे वारू धाव घेईना, पण या कालखंडातील महत्त्वाची घटना म्हणजे अव्वल दर्जाचे नाटय़शिक्षक, नाटककार गो. ब. देवल पुन्हा नाटय़क्षेत्रात आले. गंधर्व मंडळीच्या तालमी घेऊ लागले. आपल्या ‘मृच्छकटिक’ आणि ‘गद्य फाल्गुनरावा’चे ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये रूपांतर करून त्यांनी तालमी सुरू केल्या. कंपनीच्या उत्कर्षांची सुचिन्हे दिसू लागली. तो पावेतो ‘मानापमान’, ‘सौभद्र’ नाटकांचे प्रयोगहक्क मिळाले. गंधर्व नाटक कंपनीच्या वैभवाचे दिवस सुरू झाले. राम गणेश गडकऱ्यांनी ज्या गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेबद्दल राग व्यक्त केला होता, त्यांचेच ‘एकच प्याला’ नाटक गंधर्व नाटक मंडळीने २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोदा येथे रंगमंचावर आणले. त्या नाटकाने गंधर्व नाटक मंडळी, बालगंधर्व, गणपतराव बोडस यांना उदंड यश, कीर्ती, धनसंपदा मिळवून दिली. पण आपल्या नाटकाचे यश पाहण्याचे भाग्य गडकऱ्यांच्या नशिबी नव्हते. नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वीच २३ जानेवारी १९१९ रोजी गडकरी या जगाच्या रंगभूमीवरून कायमचे निघून गेले होते.

‘एकच प्याला’मधील ‘सिंधू’ ही बालगंधर्वाच्या इतर सर्व भूमिकांपेक्षा सर्वस्वी निराळी भूमिका! बालगंधर्वाना भरजरी पोशाखातून फाटक्या वस्त्रांकडे, शृंगार रसातून करुण रसात नेणारी आव्हानात्मक भूमिका! बालगंधर्वानी हे आव्हान पेललं. याबाबतची एक घटनाच या गोष्टीवर प्रकाश टाकणारी आहे. ‘रत्नाकर’ मासिकाने १९३१ जुलैचा अंक ‘बालगंधर्व विशेषांक’ म्हणून काढला. त्यानिमित्त ‘बालगंधर्वाची सवरेत्कृष्ट भूमिका कोणती,’ असा प्रश्न संपादकांनी रसिकांना विचारला. ३३५३ रसिकांकडून उत्तरे आली. त्यापैकी २०५२ जणांनी बालगंधर्वाची सवरेत्कृष्ट भूमिका राम गणेशांच्या ‘एकच प्याला’मधील ‘सिंधू’ची असा निर्वाळा दिला. या तत्कालीन जनमताच्या कौलास मान देऊन आम्ही ‘रत्नाकर’च्या मुखपृष्ठावर सिंधूचे रंगीत चित्र देत आहोत, अशी टीप ‘रत्नाकर’च्या संपादकांनी आवर्जून दिली.

‘गंधर्व नाटक मंडळी’ म्हणजे नाटय़क्षेत्रातले वैभव. अस्सल भरजरी कपडे, शालू, शेले, पैठण्या, खरे दागिने, सोन्या-चांदीचे मुकुट, वैभवशाली पडदे, सुदृढ कलाकार, कंपनीत बडदास्त इतमामाची, जेवण जेवावे तर गंधर्व कंपनीतले, ‘इथे नांदते वैभव सारे’, अशी सुस्थिती! निर्भेळ दूध आणि साजूक तूप असा सर्व मामला! तिरखवाँ, राजण्णासारखे तबलजी, कादरबक्ष महंमद हुसेनसारखे सारंगीवाले, ऑर्गनवर कांबळे, हरिभाऊ देशपांडे, नाटके रंगत होती, पण जमा-खर्चाचा ताळमेळ जमत नव्हता. गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस भागीदारीतून बाजूला झाले, कारण खर्चविषयक मतभेद हे प्रमुख कारण. अखेर बालगंधर्व एकटेच कंपनीचे मालक झाले. अर्थकारण चुकले. कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि अखेर ३१ डिसेंबर १९३४ रोजी गंधर्व कंपनी बंद करण्याचा कटू निर्णय घेण्यात आला.

अडीच तपांचा संगीतमय, प्रकाशमय, आनंदमय, रसिकप्रिय नाटय़प्रवास थांबत होता. नियतीने खेळ मांडला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे जन्मलेल्या आमच्या पिढीने बालगंधर्व पाहिले, पण ते, ते बालगंधर्व नव्हते. आम्ही पाहिले बालगंधर्वाचे उतरतीला लागलेले रूप. भग्न अवशेष. भिंत खचली, कलथून खांब गेले, अशी अवस्था! दोघा-चौघांनी उचलून आणून गादीवर बसवलेले आणि अभंग, भजने गाणारे बालगंधर्व. पण त्यांना आणताना अनेकांचे डबडबलेले डोळे, गळय़ात दाटलेले हुंदके आम्ही बघितले आहेत आणि अरेरे! चे दर्दभरे उद्गार ऐकलेले आहेत. रंगभूमीच्या या अनभिषिक्त सम्राटाविषयी आमच्या पिढीने भरपूर ऐकले आहे, भरपूर वाचले आहे. त्यातील किती आठवावे आणि किती जतन करावे, याला मर्यादाच नाही.

‘नारायणराव (बालगंधर्व) म्हणजे रंगभूमीवरील एक अपूर्व घटना! फूटलाईटच्या प्रकाशात उगवलेले इंद्रधनुष्य! सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेले चांदणे!’ (कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर).

‘नारायणराव केवळ गळय़ाने जगले नाहीत. उद्या जर त्यांच्या पायाच्या अंगठय़ाला स्वर फुटला तर तेथूनही तेच गाणे स्रवेल. उसाचे कांडे जसे सर्वत्र गोड, तसे त्या गाण्याचे, गाण्याच्याच नव्हे तर गद्य वाक्यांच्या लयीचादेखील त्यांना झालेला साक्षात्कार तसाच.’ (पु. ल. देशपांडे).

बालगंधर्वाची अमाप स्तुती करणारी जशी रसिक मंडळी होती, आहेत आणि असतील, त्याचप्रमाणे त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. याचे उदाहरण म्हणजे अहिताग्नी राजवाडे. त्यांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात ‘ ‘स्वयंवर’ नाटकाचा आजचा प्रयोग काव्य, गायन, अभिनय, नाटय़ या सर्व बाबतीत हीन’ अशी नोंद आपल्या त्या दिवशीच्या डायरीत केली आहे. पु. शं. पतके हे बालगंधर्वाचे चाहते. त्यांनी आठवण लिहिली आहे- ‘संगीत नाटक अ‍ॅकॅडमीतर्फे त्यांचा (बालगंधर्वाचा) सवरेत्कृष्ट नट म्हणून गौरव होणार होता, त्या वर्षीच्या अ‍ॅकॅडमीच्या कौन्सिलवर मी आणि (कै.) मामा वरेरकर असे दोनच महाराष्ट्रीयन प्रतिनिधी होतो. मामांनी ‘गंधर्वाना अभिनय व संगीतातले श्रीगणेशासुद्धा समजत नाही’, असे विधान करताच कै. पृथ्वीराज कपूर, देविकाराणी व कमलादेवी चटोपाध्याय यांनी ‘बुढ्ढे, तुम चूप बैठो’ म्हणून मामांवर हल्ला केला होता.’

१९५६-५७च्या दरम्यानची गोष्ट आहे. बालगंधर्वानी आत्मचरित्र लिहावे, असा आचार्य अत्रे यांचा आग्रह होता. मिरजेच्या वसंतराव आगाशे यांनी ‘बालगंधर्वाचे असफल आत्मवृत्त’ या आपल्या लेखात यासंबंधीचे सविस्तर वर्णन केले आहे. जिज्ञासूंनी तो लेख जरूर वाचावा किंवा वसंतराव आगाशे यांच्याशी संपर्क साधावा. (मिरज- दूरध्वनी ०२३०-२२२५४४७). जर ते आत्मवृत्त प्रसिद्ध झाले असते तर बालगंधर्वाच्या अनेक अज्ञात गुणांवरही प्रकाश पडला असता. पण जर-तर या गोष्टींना काहीच अर्थ नसतो. आपण फक्त, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ म्हणत या महान कलाकाराला वंदन करायचे.
(लोकसत्ता-पुणे वृत्तान्तवरून साभार) 

24 June 2010

मुजोर रिक्षाचालकांवर प्रवाशांचा बहिष्कार

रिक्षाची दरवाढ बुधवारपासून लागू झाली. बहुतेक ग्राहक मनातल्या मनात चरफडत ही दरवाढ स्वीकारतील. पण, दरवाढीपूर्वी मंगळवारी अचानक संपावर जाऊन रिक्षाचालकांनी मुंबईकरांना वेठीस धरले त्यास प्रत्युत्तर म्हणून ग्राहक एक दिवस रिक्षांवर बहिष्कार टाकणार का, असा सवाल मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केला आहे.


कोणतीही दरवाढ काही निश्चित निकषांवर केली जाते. रिक्षाची दरवाढ करताना वाहनाची किंमत, रिक्षाचालकांच्या राहणीमानाचा निर्देशांक, इंधनाची किंमत आणि वाहनासाठी भरण्यात येणाऱ्या विम्याची रक्कम तसेच इतर कर हे घटक लक्षात घेतले जातात. सीएनजीची वाढीव किंमत, रिक्षाचा सध्याचा बाजारभाव आणि इतर खर्च लक्षात घेऊन ६.२३ रुपये प्रति किलोमीटर एवढा दर मिळतो. पहिला टप्पा १.६ किलोमीटरचा असल्याने ६.२३ गुणीले १.६ हा हिशेब केल्यावर ९.९६ हे उत्तर मिळते आणि पूर्णाक करता रिक्षाचा दर हा १० रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ६.५० रुपयांचा दर असणे अपेक्षित होते.

ग्राहक पंचायतीने हा सर्व हिशेब राज्याचे परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर ठेवला होता. परंतु ‘ना तेरा ना मेरा’ असे म्हणत परिवहनमंत्र्यांनी रिक्षावाल्यांचे समाधान करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठीचा दर ११ रुपये आणि ग्राहक पंचायताचे समाधान करण्यासाठी पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ६.५० रुपये एवढा दर कायम केला. परंतु, अशास्त्रीय पद्धतीने मंजूर केलेली ही दरवाढ अमान्य असल्याचे देशपांडे म्हणाले.

दरम्यान, भारतात अजूनही ‘मैल’ हे परिमाण धरून दरआकारणी केली जाते. त्यामुळे एक किलोमीटरऐवजी १.६ किलोमीटरचा पहिला टप्पा गृहित धरला जातो. त्यामुळे थोडय़ाशा अंतरासाठीही प्रवाशाला अधिक अंतराचा ज्यादा दर द्यावा लागतो. या संदर्भातील प्रस्तावही परिवहन मंडळाकडे देण्यात आला आहे आणि तो तत्वत: मान्य झाल्याची माहितीही देशपांडे यांनी दिली.

मुंबईतील बुहतेक उपनगरांमध्ये प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा अनुभव येतो. विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली, मुलुंड या ठिकाणी रिक्षावाले प्रवाशांना भाडे नाकारत असल्याच्या कित्येक घटना घडतात. रिक्षावाल्यांना हव्या त्या ठिकाणी प्रवाशाला जायचे नसेल तर ते चक्क नकार देतात. परंतु, अनेकदा प्रवाशांना इच्छित ठिकाणी पोहोचण्याची घाई असल्यामुळे कोणी तक्रार करण्याची तसदी घेत नाहीत. स्वत: परिवहनमंत्र्यांनी अंधेरी, बोरिवली येथे रिक्षावाल्यांच्या वागणुकीचा अनुभव घ्यावा, असेही शिरीष देशपांडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्राहकांकडून घेण्यात येणारे शुल्क व त्यांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा यात काहीतरी ताळमेळ असणे गरजेचे असते. रिक्षाचालकांबाबत मात्र हे अजिबात दिसून येत नाही, अशी तक्रारही देशपांडे यांनी केली आहे. याबाबत आता ग्राहकांनीच कडक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. बेकायदेशीर संप आणि अशास्त्रीय पद्धतीने झालेली दरवाढ या दोन्ही मुद्दय़ांवर पुढे काय पाऊल उचलायचे याबाबतची येत्या शनिवारी होणाऱ्या ग्राहक पंचायतीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.
 
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त २४ जून २०१० च्या अंकात पान क्रमांक एकवर  प्रसिद्ध झाली आहे)

22 June 2010

नीतीन देसाई यांचा शनिवार वाडा

शनिवार वाडा म्हटला की आपल्याला पुण्यातील शनिवार वाडा आणि पेशवे आठवतात. पण आता प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा शनिवार वाडा पुन्हा नव्याने उभा केला आहे. म्हणजे त्याची प्रतिकृती तयार केली आहे.

देसाई हे भव्य आणि दिव्य सेट्सबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मालिकेत ते अशा ऐतिहासिक स्थळाची प्रतिकृती उभी करण्यात कधीही काटकसर करत नाहीत. त्याची प्रचिती प्रेक्षकांनी वेळोवेळी विविध मालिकांमधून घेतली आहे. त्यात आता  ई-टीव्ही मराठी वरील ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेची भर पडली आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी देसाई यांनी कर्जत येथील आपल्या एन. डी. स्टुडिओत चक्क शनिवारवाडा उभा केला आहे.


सुमारे २८० वर्षांपूर्वी थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यावेळच्या बारा हजार रुपयांत शनिवारवाडा बांधला होता. देसाई उभारत असलेली शनिवार वाडय़ाची प्रतिकृती दोन लाख पन्नास हजार चौरस फुट क्षेत्रफळात विस्तारणारी असून याचा खर्च सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपये इतका आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ही प्रतिकृती पूर्णपणे तयार होणार आहे.

मुळ शनिवारवाडय़ाचे रेखाचित्र आणि स्थापत्य शिवरामपंत काझीवाले यांनी केले होते. १० जून १७३० ला पायाभरणी झाली होती. १० जून १७३१ ला प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होऊन २२ जानेवारी १७३२, म्हणजे सुमारे दीड वर्षांत हा भलामोठा शनिवारवाडा बांधून तयार झाला.

शनिवारवाड्याची प्रतिकृती ४० फूट उंच असणार असून त्यासाठी लाखो किलो फायबरचा वापर केला जाणार आहे. मुख्य दरवाजा, दिल्ली दरवाजा, पुष्करिणी, तलाव, चमन बाग, दरबार, गणेश मंदिर, रक्षक खोल्या, बुरूज आदी सर्व या शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीततही असणार आहे.

महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा आणि पेशव्यांचा संपन्न इतिहास अख्ख्या जगासमोर प्रभावीपणे येणे आवश्यक असून पुरातन वास्तुशास्त्र जपण्यासाठी या प्रतिकृती टिकवून ठेवल्या जाणार आहेत. या प्रतिकृती करताना मूळ बांधकामाचा विचार केला आहे.

(ही मूळ बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त मध्ये १९ जून २०१० च्या अंकात कर्जतमध्ये शनिवार वाडा या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=78992:2010-06-18-14-45-21&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
येथे वाचता येईल.

21 June 2010

पावसाळ्यातील आरोग्य

अंगाची काहिली करणारा उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळी पिकनिक, पावसात भिजणे, मसालेदार आणि चमचमीत खाणे अशा कार्यक्रमांना आता प्राधान्य दिले जाईल. मात्र हे करत असताना आपण सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण पावसाळ्यातच विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतात. चमचमीत पण उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाण्यामुळेही पोट बिघडायला निमंत्रण ठरू शकते. कावीळ, विषमज्वर, हिवताप, कॉलरा, व्हायरल फिव्हर, गॅस्ट्रो असे अनेक आजार व साथीचे रोग या काळात होत असतात.

पावसाळ्यात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करता येईल, या काळात आपला आहार कसा असावा या बाबतची माहिती देणाऱया काही लेखांच्या लिंक्स आज मी ब्लॉगवर देत आहे.

पावसाळ्यातील आरोग्य या विषयावर डॉ. बालाजी तांबे यांनी केलेले मार्गदर्शन ई-सकाळच्या संकेतस्थळावर आहे.
http://72.78.249.107/esakal/20100604/5580764304351799374.htm

आरोग्य डॉट कॉम या संकेतस्थळावरही आपल्याला या विषयीची माहिती मिळू शकेल. त्यासाठी http://marathi.aarogya.com/पोषक-पदार्थ-आणि-अन्न/पावसाळ्यातील-आहार
यावर क्लिक करा.

ग्लोबल मराठी या संकेतस्थळावरही या विषयासंबंधी लेख असून तो
http://globalmarathi.org/GlobalMarathi/20100603/4756779700033024746.htm
 येथे वाचता येईल.

पावसाळ्यातील आजार या विषयी http://dhanvantary.wordpress.com/2007/07/21/पावसाळ्यातील-आजार-भाग-२/
या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल.

पावसाळा आणि दुखणी या विषयी http://abstractindia.blogspot.com/2009/07/blog-post_7158.html
या लेखात माहिती वाचता येईल.  

या सर्व लेखांचा आपल्याला नक्की उपयोग होईल असे वाटते.

20 June 2010

वास्तव रुपवाणी

प्रभात चित्र मंडळाच्या वास्तव रुपवाणी या मासिकाचा जून महिन्याचा अंक नुकताच वाचनात आला. प्रभात चित्र मंडळाचे संस्थापक आणि विश्वस्त तसेच फिल्म सोसायटीचे चळवळीचे प्रवर्तक सुधीर नांदगावकर  यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्तृत्व गौरव सोहळा अंक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. श्रीकांत बोजेवार आणि संतोष पाठारे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.

आपल्या संपादकीयात बोजेवार व पाठारे यांनी म्हटले आहे की, मुंबईत १९६८ पूर्वी अनेक फिल्म सोसायट्या कायर्रत होत्या. मात्र मराठी माणसांची फिल्म सोसायटी असावी या कल्पनेने नांदगावकरांना झपाटून टाकले. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा मध्ये काम करत असताना त्यांनी अनेक चित्रपटांची समीक्षा केली होती. पण जागतिक दर्जाचे चित्रपट मराठी रसिकांना बघायला मिळत नाहीत ही खंत त्यांच्या मनात होती. म्ङणून प्रभात चित्र मंडळाची १९६८ मध्ये नांदगावकर यांनी स्थापना केली. तेव्हापासून प्रभात व नांदगावकर असे समीकरणच बनून गेले आहे.

नांदगावकरांचे कार्य शब्दात मावणारे नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणून नांदगावकरांसोबत फिल्म सोसायटी चळवळीत सहभागी असणाऱयां त्यांच्या सहकाऱयांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वास्तव रुपवाणीचा हा विशेष अंक.

या अंकात दिनकर गांगल (नांदगावकरची दुहेरी निष्ठा), विजया चौहान (सुधीर-एक लोभस व्यक्तिमत्व), सतीश जकातदार (प्रेक्षक चळवळीचा मिशनरी), दत्तात्रय जोशी (ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी), रघुवीर कुल (सत्तरी नव्हे अत्तरी), श्रीकांत बोजेवार (चतुरस्त्र), संतोष पाठारे (प्रभातचा वारसा), अभिजित देशपांचे (झपाटलेला) आणि वसंत सोपारकर यांची कविता असे साहित्य अंकात आहे. अंकात नांदगावकर यांची काही जुनी छायाचित्रेही आहेत.

वास्तव रुपवाणी मासिक गेली सतरा वर्षे सुरू असून अंकाचे मूल्य दहा रुपये इतके आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क

वास्तव रुपवाणी, द्वारा प्रभात चित्र मंडळ,
शारदा चित्रपटगृहाशेजारी, दादर (पूर्व)
मुंबई-४०००१४
टेलीफॅक्स ०२२-२४१३१९१८

ई-मेल cinesudhir@gmail.com     

19 June 2010

निसर्ग पयर्टन

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरात १७ जून २०१० रोजी प्रसिद्ध झालेला लेख. ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील वाफे येथे उभारण्यात आलेल्या निसर्ग पयर्टन केंद्रविषयीचा हा लेख किरण सयाईस-शिसोदे यांचा आहे.

शहापूर वन विभागाने वैविध्यपूर्ण अशा निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती अलिकडेच केली आहे. मुंबई पासून दीड तासाच्या अंतरावर मुंबई-नाशिक महामार्गानजीकच्या वाफे गावाजवळ हे केंद्र उभारण्यात आल्याने मुंबईकरांसाठी ते सोयीचे आहे. सिमेंटच्या जंगलात धकाधकीचे जीवन जगणा-या मुंबईकरांसाठी हे पर्यटन केंद्र विरंगुळा ठरेल हे प्रवेश करतांनाच जाणवले.
वाफे परिसरात ४० एकर क्षेत्रात शहापूर वन विभागाने वैविध्यपूर्ण या निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा या पर्यटन केंद्रात निसर्गाचा आनंद लुटण्याबरोबरच मुलांना वनऔषधी वनस्पतींचा अभ्यास करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे या पर्यटन केंद्राचे एक वैशिष्टय आहे. राज्याचे वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते त्याचे नुकतेच उद्घाटन झाले. आता ते नुकतेच पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

स्वच्छ आणि सुंदर या पर्यटन केंद्रात राहण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तरंगता तंबू हे इथल्या पर्यटन केंद्राचे वैशिष्टय आहे. जमिनीपासून ६ मीटर उंचीवर असलेल्या या तंबंचे क्षेत्रफळ १८ चौरस फुट असून झाडांवर लोखंडी तारांनी तो बनवण्यात आला आहे. त्यात सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम काही काळ तरंगत्या तंबूतच ठोकला. नंतर भटकंतीस सुरूवात केली.  निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कुडांच्या व गवताने शाकारलेल्या झोपडयाही येथे बनवण्यात आल्या आहेत. त्या वातानुकुलित असल्याने पर्यटकांना शहरी जीवनाचेही सुख उपभोगता येईल. याशिवाय येथे गेस्टरुमचीही व्यवस्था आहे.

निसर्गाच्या कुशीत यायचे असेल तर निसर्गातीलच उपलब्ध वस्तूंचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदुषण रोखण्यासाठी येथे सर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्यामुळे पर्यटकांना पंगतीचा अनुभव मिळणार असल्याचे या केंद्राचे व्यवस्थापक सांगतात.

या केंद्रात फुलपाखरे विहार करताना दिसतात. त्यांच्यासाठी क्रोटोलरिया, बेल ऑईल, शेवंती, निरगुडा, कडीचा पत्ता, कणेर आणि चाफा यासारखी फुलझाडे लावण्यात आली आहेत. केंद्रात भारतीय नौदलाचा एक विभाग आहे. ९ बोटी आहेत. या बोटींबरोबर पाणबुडी पुढे असणारा डोंबही ठेवण्यात आला आहे. येणा-या विद्यार्थ्यांना नौदलाविषयी माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरुणांनी नौदलात भरती व्हावे, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शहापूरचे वनक्षेत्रपाल दिनेश सिंग यांनी सांगितले.

झाडे कशी लावतात, त्यांची निगा कशी राखावी, रोपे कशी बनवावित, झाडांचे महत्व, पर्यावरणावर लघूपट आणि वनअधिका-यांबरोबर चर्चा असा एक दिवसाचा भरगच्च कार्यक्रम व एलसीडी स्क्रीनवर माहितीपट दाखविण्यात येतात.. विद्यार्थ्यांसाठी जेवण, चहा यांची उत्तम व्यवस्था येथे आहे.

वनौषधींचे महत्व अनन्यसाधारण असून त्यांचा वापर सर्व स्तरांवर पोहोचवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी शतावरी, सर्पगंधा, लेंडी पिंपळी, बेडकी, कदंब, अग्निमंथ,पांगिरा, कोरफड, गुळवेल, आराठा अशा ८० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या वनस्पतींचे गुणधर्म व त्यांचा विविध आजारांवरील वापर याची माहिती येथे देण्यात येते. त्यामुळे पर्यटनाबरोबरच मुलांना इतरही बाबी शिकण्यास मिळत आहेत.

(महाराष्ट्र राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

18 June 2010

कल्याण-डोंबिवलीत मोटार वाहन कायदा धाब्यावर

टॅक्सी आणि ऑटोरिक्षा या मीटरवरच चालवल्या पाहिजेत, अशी सुस्पष्ट तरतूद मोटार वाहन कायद्यात असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण व डोंबिवलीत त्याची पायमल्ली केली जात आहे. ज्यांनी कायदा करायचा आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी होते आहे किंवा नाही हे पाहायचे, त्याच मंडळींनी मुजोर रिक्षाचालक, त्यांचे नेते आणि रिक्षा संघटनांपुढे शरणागती पत्करून हा कायदा धाब्यावर बसवला आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार कल्याण-डोंबिवलीत रिक्षांचे मीटर डाऊन व्हावे यासाठी प्रवासी आणि नागरिक यांनाच संघर्ष करावा लागत आहे.


राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून कल्याण-डोंबिवली ही शहरे सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, परिवहन सचिव तसेच ‘आरटीओ’, वाहतूक आयुक्त आदी शासकीय कार्यालये मुंबईत आहेत. मुंबईत, ठाण्यात मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार टॅक्सी व रिक्षा मीटरवर चालतात. मग कल्याण-डोंबिवलीमध्येच त्याची अंमलबजावणी का होऊ शकत नाही, येथील रिक्षाचालक, त्यांचे नेते आणि संघटनांपुढे स्थानिक आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस व अधिकारी का नांगी टाकतात, या सर्वाचे एकमेकांशी नेमके काय साटेलोटे आहे, वेळोवेळी वृत्तपत्रातून याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही या विषयाशी संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि यंत्रणा, ठाण्याचे जिल्हाधिकारी, ठाणे वाहतूक पोलीस, ठाणे आरटीओ आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनीधीही त्याची दखल का घेत नाहीत, त्याचे कोडे सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांना अद्यापही उलगडलेले नाही.

कल्याण-डोंबिवलीकर प्रवासी आणि नागरिक कल्याण-डोंबिवलीसाठी खास वेगळा कायदा करा किंवा वेगळे नियम करा अशी त्यांची मागणी नाही. तर मोटार वाहन कायद्यात मीटर प्रमाणे रिक्षा चालविण्याची जी तरतूद आहे, त्याचीच कठोरपणे अंमलबजावणी केली जावी, इतकी माफक अपेक्षा या लोकांची आहे. मात्र आजतागायत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे स्थानिक आणि राज्य स्तरीय नेते, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

प्रवासी संघटनेच्या माध्यमातून नागराज शास्त्री हे गेली अनेक वर्षे कल्याण-डोंबिवलीत रिक्षांचे मीटर डाऊन व्हावे, रिक्षाचालकांकडून शेअर पद्धतीने जे भाडे घेण्यात येते, ते कसे चुकीचे आहे, याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या प्रश्नासाठी त्यांनी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, परिवहन सचिव आणि संबंधित शासकीय यंत्रणांना निवेदने दिली. प्रवाशांची बाजू मांडली. मात्र कोणीही या प्रश्नाची गंभीरपणे दखल घेतलेली नाही आणि त्या निवेदनाला प्रतिसादही दिलेला नाही. राज्याचे माजी परिवहन आयुक्त दीपक कपूर यांनी गेल्यावर्षी या प्रश्नाबाबत कल्याण येथे बैठक घेतली होती. त्यावेळी गणेशोत्सवानंतर कल्याण-डोंबिवलीत रिक्षांना मीटरसक्ती केली जाईल, असे सांगितले होते. मात्र नंतर विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत त्यांनी ही सक्ती पुढे ढकलली. त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. म्हणजे ज्यांनी कायदा करायचा आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहायचे तीच मंडळी या प्रश्नाबाबत गंभीर नाही, मग मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी केली जावी, म्हणून नागरिकानी आता न्यायालयात जावे का, असा सवालही शास्त्री यांनी केला.
 
रिक्षांचे मीटर लवकरात लवकर डाऊन झाले नाही तर लवकरच होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मते मागायला येणारे सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना याची किंमत मोजावी लागणार आहे. किंवा या प्रश्नासाठी कोणी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली तर संबंधित शासकीय अधिकारी आणि यंत्रणाना न्यायालयाकडून मोठी चपराक बसेल तेव्हा तरी या मंडळींचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे.
 
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १८ जून २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

17 June 2010

स्वर आले जुळूनी

ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांनी आपला आजवरचा जीवनप्रवास स्वर आले जुळूनी  या आत्मचरित्राद्वारे रसिकांसमोर उलगडला आहे. अत्यंत प्रांजळ आत्मकथन असे या लेखनाचे वर्णन करता येईल. बालपणापासून ते आजवरच्या आयुष्यातील चढउतार, आलेले खडतर प्रसंग, कडू गोड आठवणी, संगीतबद्ध केलेल्या काही गाण्यांच्या आठवणी, विविध संगीतकार आणि गायक यांच्याविषयी व्यक्त केलेली मते, घरच्यांविषयीही सांगितलेली माहिती अशा विविध प्रकरणातून जोग यांचा जीवनप्रवास रसिकांच्या समोर येतो.

पुस्तकाच्या सुरुवातीला थोडसं माझ्या मनातलं या विषयाअंतर्गत लिहितांना जोग म्हणतात की, माझा मित्र सदाशिव येरवडेकर याच्या आग्रहावरून मी आठवतील तशा आठवणी लिहित गेलो. स्नेहल प्रकाशनाचे रविंद्र घाटपांडे यांना त्या आठवणी वाचायला दिल्या. त्या त्यांना मनापासून आवडल्या व त्या पुस्तक  स्वरुपात प्रसिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली. केवळ व्यावसायिक आठवणी न लिहिता बालपणापासून मी कसा घडत गेलो ते लिहावे, असे सूचवले. नव्या पिढीला कलाकाराच्या कलेच्या प्रांतातील ग्लॅमर तेवढं दिसतं. पण त्याची जडणघडण कोणत्या परिस्थितीत झाली, कलेत वरच्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कोणकोणत्या कौटुंबिक, मानसिक, आर्थक आणि व्यवसायातील स्पर्धेला तोंड देत आपलं ध्येय गाठावे लागले त्याचे मार्गदर्शन या लेखनातून मिळावे, अशी त्यामागे घाटपांडे यांची भूमिका होती.

या पुस्तकाला ज्येष्ठ संगीतकार, गीतकार व गायक यशवंत देव यांची प्रस्तावना आहे. गाणारे व्हायोलिन लिहिते झाले या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, जीवनातील सर्व अडचणींना तोंड देत असताना ध्येयप्राप्तीचं सतत भान ठेवून वागणारा, एखादा जिद्दी व्हायोलिन वादक कसा असतो हे जाणून घ्यायचं असेल त्याने हे आत्मचरित्र जरूर वाचावे. त्यातून दिशाहीनांना दिशा मिळेल, निराश मनांना उभारी मिळेल आणि हे कळून येईल की आपल्या मनातला प्रामाणिक सूरच आपल्या जीवन  संगीताचा खरा आधार असतो.

जोग यांनी वीस मराठी चित्रपटांना संगीत दिले असून त्यात जावई माझा भला, थांब लक्ष्मी कुंकू लावते, कुंकवाचा करंडा, दाम करी काम, सतीचं वाण, सतीची पुण्याई, आंधळा मारतो डोळा, भैरु पैलवान की जय, कैवारी, जावयाची जात आदी चित्रपटांचा समावेस आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत संगीतकारांकडे जोग यांनी व्हायोलिन वादक, संगीत संयोजक म्हणून काम केले आहे. मनाचे श्लोक, महामृत्युंजय जप, श्री गणेश बीजमंत्र आदी काही कॅसेट्स साठीही त्यांनी काम केले आहे.

प्रेमाला उपमा नाही, गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, देवमानूस देवळात आला, हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, लई दिसानं सजणा आला, हिल हिल पोरी हिला, रवी आला हो रवी आला, स्वर आले दुरुनी, प्रिया आज माझी कोटी कोटी रुपे तुझी, होऊन आज राधा माझी प्रिया हसावी,  लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, शुभं करोती म्हणा मुलांनो शुभंकरोती म्हणा, प्रभू सोमनाथा, धुंद आज डोळे, हवा धुंद झाली या सारखी अनेक लोकप्रिय आणि रसिकांच्या ओठावर असलेली गाणी जोग यांनीच संगीतबद्ध केली आहेत.

ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्याबरोबर केलेले काम, गीतरामायण तयार होत असतानाच्या आणि ते लोकप्रिय झाल्यानंतरच्या आठवणी, हिंदीतील नावंत संगीतकार, गायक यांच्याविषयी जोग यांनी सांगितलेल्या आठवणी, किस्से, जोग सादर करत असलेल्या गाणारं व्हायोलिन या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली, या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आदी सर्व या पुस्तकात आहे. सुधीर फडके यांचे बोट धरून जोग यांची संगीत क्षेत्राची सुरू झालेली वाटचाल ते आपल्या कर्तृत्वाने आणि अथक परिश्रमाने मराठी चित्रपट संगीतावर उमटवलेला ठसा, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी म्युझिशियन म्हणून केलेले काम, आदी सर्व प्रवास जोग यांनी मोकळेपणाने या पुस्तकात मांडला आहे.

प्रभाकर जोग यांचा संपर्क
 स्वरगंध, ८९, मेघना सोसायटी, सहकार नगर क्रमांक-२, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे-४११००९. दूरध्वनी ०२०-२४२२३०७९

स्नेहल प्रकाशन संपर्क
 आदित्य घाटपांडे, ३६, ब, गुरुदत्त सहवास, ४७०, शनिवार पेठ, पुणे-४११०३०.
दूरध्वनी ०२०-२४४५२९११

              

16 June 2010

नको नको रे पावसा...

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यापासून आपली सुटका झाली असून गेल्या दोन-चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हवेत चांगला गारवा आला आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे आता पावसाळी सहलीचे बेत आखले जातील आणि पावसात मजा केली जाईल. आपल्या मराठी साहित्यातूनही पावसाचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांमधूनही पावसाची गाणी आपण पाहिलेली आहेत. सुरू झालेल्या पावसाच्या निमित्ताने मराठीतील पावसाच्या कविता आणि गाण्यांचे संकलन येथे करत आहे.

पाऊस हवाहवासा वाटत असला तरी मुसळदार पाऊस पडयला सुरुवात झाल्यानंतर आपल्या सर्वांची कशी दाणादाण उडते आणि पाऊस आपल्याला कसा नकोसा होतो, ते इंदिरा संत यांनी नको नको रे पावसा या कवितेतून सांगितले आहे. त्यांची ही कविता आजही आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहे.

नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली;
नको नाचूं तडातडा असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येउं झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन;
पितळेची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन;

या पाऊस कवितेबरोबरच आपल्या मनात असलेल्या काही पाऊस गाण्यांचे हे संकलन. येथे दिलेल्या लिंकवर ही गाणी आपल्याला ऐकताही येतील.  

१) श्रावणात घननिळा बरसला  http://www.video4viet.com/music.html?act=play&id=56532ce7bd65aa829b629daefe9e3a4a

२) ये रे घना, ये, रे घना, न्हाऊ घाल     http://www.mazafm.com/marathimusic/details.php?image_id=225

३) हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील आला आला वारा संगे पावसाच्या धारा
http://www.mazafm.com/marathimusic/details.php?image_id=546

४) मन्ना डे यांनी गायलेले आणि आजही लोकप्रिय असलेले गाणे घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
http://www.in.com/music/track-ghan-ghan-mala-nabhi-datlya-188763.html

५)सर्जा चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले चिंब पावसानं रान झालं आबादानी
http://www.in.com/videos/watchvideo-chimb-pavasan-ran-zal-sarja-1987-5777905.html

६)देवबाप्पा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले आणि आज इतक्या वर्षांनतरही लोकप्रिय असलेले नाच रे मोरा
http://www.in.com/music/track-naach-re-mora-naach-190443.html

७)सोंगाड्या या चित्रपटातील अहो राया मला पावसात नेऊ नका हे पुष्पा पागधरे यांनी गायलेले गाणे

८) मंगेश पाडगावकर यांचे बालगीत सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

९) कवी ग्रेस यांचे ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

१०) रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात

ही यादी काही परिपूर्ण नाही. मला पटकन आठवतील त्याची यादी येथे दिली आहे. आपल्याही मनात अशी काही पाऊस गाणी नक्कीच असतील.

 

15 June 2010

कल्याण-डोंबिवलीत मीटर डाऊन नाहीच

कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालक आणि रिक्षाचालक-मालक संघटनांच्या दादागिरीपुढे येथील सर्वच राजकीय पक्ष, नेते, आरटीओ आणि वाहतूक पोलीस अधिकारी आणि राज्यस्तरावरील सर्वपक्षीय नेत्यांनी शेपूट घातले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे रिक्षांचे मीटर डाऊन झालेले नाही. मुठभर रिक्षाचालक हजारो प्रवाशांना वेठीस धरत आहेत. राज्य शासनानेही या प्रश्नात तातडीने लक्ष घातले नाही तर कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांच्या सहनशीलतेचा कधीही स्फोट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


गेल्या काही दिवसांपासून मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यासाठी प्रवासी संघटनेचे नागराज शास्त्री सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मध्यंतरी शिवसेनेने कल्याणमध्ये प्रवाशांकडून अर्ज भरून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे नाटक केले. मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात हजारो तक्रारी शिवसेनेकडे दाखल झाल्या. मीटर पद्धत असावी, अशी हजारो प्रवाशांची मागणी होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाने मीटर डाऊन करण्यासाठी पुन्हा ‘आरटीओ’ कार्यालयावर धडकण्याचा प्रयोग केला. पण ‘पहिले पाढे पंचावन्न’ पुढे काही झालेच नाही.

पनवेलमध्ये तेथील स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर रिक्षाचे मीटर डाऊन करण्यासाठी प्रवाशांच्या बाजूने रस्त्यावर उतरू शकतात, तर कल्याण व डोंबिवलीतील ‘फलकबाजी’ करणारे आमदार, कल्याण-डोंबिवलीकरांच्या मतांवर निवडून आलेले खासदार आणि सर्वपक्षीय नेते प्रवाशांच्या बाजूने का उभे राहात नाहीत, प्रवाशांसाठी कधी रस्त्यावर का उतरत नाहीत, असे सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहेत. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ वगळता कल्याण-डोंबिवलीतील विविधरिक्षाचालक-मालक संघटना या सर्वच राजकीय पक्षांच्या आहेत. त्याच पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना प्रवाशांच्या हितापेक्षा मुठभर रिक्षाचालकांची बाजू घेणे ‘अर्थ’पूर्ण वाटत असावे. पण ‘मनसे’चे तसे नाही. या पक्षाकडे अद्याप एकही रिक्षाचालक-मालक संघटना नाही. त्यामुळे ‘मनसे’ तरी या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरेल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. पण त्यांनीही प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

गेल्या वर्षी याच सुमारास कल्याण-डोंबिवलीत मीटरनुसार रिक्षा धावू लागतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राजकीय नेते, राजकीय पक्ष, ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसानीही मुजोर रिक्षाचालक आणि त्यांच्या नेत्यांसमोर शेपूट घातल्याने मीटर डाऊन झालेच नाही.

गणेशोत्सवानंतर अंमलबजावणी करू, असे सांगणाऱ्या ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसांनी नंतर राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बागुलबुवा करून पुन्हा एकदा रिक्षाचालकांपुढे शरणागती पत्करली. शहरातील प्रमुख रिक्षातळांवर (काही ठराविक व महत्त्वाची ठिकाणे) मीटर पद्धत आणि शेअर पद्धतीने होणाऱ्या भाडय़ाचे मोठे फलक ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसांकडून गेल्या वर्षी लावण्यात येणार होते. मात्र त्यालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या रिक्षाचालकांना आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ हवी आहे. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी नकार देणे, प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळणे, अधिकृत रिक्षातळावर रिक्षा उभी न करता रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्तीने वाटेल तशा रिक्षा उभ्या करून पादचारी आणि प्रवाशांना मनस्ताप देणे, पश्चिमेकडून पूर्वेला आणि पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी उड्डाणपूलावरून जावे लागते म्हणून वीस रुपयांपासून पुढे कितीही पैसे उकळणे (मीटरप्रमाणे या अंतरासाठी फक्त १२ ते १५ रुपये लागतील), प्रवाशांनाच मीटर पद्धती नको आहे, कोणीही आले तरी येथे मीटर डाऊन होणारच नाही, अशा उद्दाम शब्दात प्रवाशांना बोलणे अशी मुजोरी रिक्षाचालकांकडून येथे सर्रास सुरू आहे. पण एकाही राजकीय पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष द्यावेसे वाटले नाही, हे येथील मतदारांचेही दुर्देव.

कल्याण येथे रेल्वे स्थानकाजवळ मीटरप्रमाणे एक रिक्षातळ सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फक्त एकाच ठिकाणी असा तळ का?, म्हणजे ज्यांना मीटर पद्धतीने प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी हा रिक्षातळ आहे, त्यांनी त्या ठिकाणी यावे, असे आरटीओ, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालक-मालक संघटनांच्या नेत्यांना अपेक्षित आहे का? संपूर्ण कल्याण-डोंबिवलीत मीटर पद्धती का नाही, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणाऱ्या आणि कायदा धाब्यावर बसविणाऱ्या रिक्षाचालकांबरोबरच स्थानिक ‘आरटीओ’ अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या विरोधात राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव, गृहमंत्री कठोर कारवाईचा बडगा कधी उगारणार, त्याकडेही कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

मीटर आणि शेअर पद्धत दोन्हीही सुरू ठेवता येऊ शकते. एखाद्या प्रवाशाला मीटर पद्धतीने जायचे असेल तर रिक्षाचालकाने मीटर डाऊन करूनच गेले पाहिजे आणि ज्याला शेअर पद्धतीने जायचे आहे, तेव्हा रिक्षाचालकाने त्याप्रमाणे जावे. मीटर पद्धती लागू केली तर प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील, असे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत असले तरी त्यात रिक्षाचालकांचेच नुकसान होणार असल्याने त्यांनाच मीटर पद्धती नको आहे. कारण सध्या एका रिक्षात पाच ते सहा प्रवासी बसवून (येथेही आरटीओ आणि वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष) आणि प्रत्येक प्रवाशाकडून सहा रुपये याप्रमाणे एका फेरीत छत्तीस ते चाळीस रुपये मिळविणाऱ्या रिक्षाचालकांना मीटर पद्धत लागू केली तर किमान भाडे मिळणार असल्यानेच त्यांचा मीटरपद्धतीला विरोध आहे.

ताजा कलम : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे माहेर डोंबिवलीत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे उद्धव आणि रश्मी यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व हा प्रश्न कायमचा मिटवावा आणि कल्याण-डोंबिवलीत लवकरात लवकर रिक्षांचे मीटर डाऊन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (केवळ वरवर नाही तर रिक्षांचे मीटर डाऊन होईपर्यंत. कारण यापूर्वीही वृत्तपत्रातील बातम्या वाचून भाषाप्रभू पु. भा. भावे यांचे डोंबिवलीत यथोचित स्मारक उभारण्यासाठी उद्धव व रश्मी ठाकरे यांनी लक्ष घातले होते. पण त्याबाबतीत अद्याप काहीही झालेले नाही)
 
(ही बातमी लोकसत्ता, मुंबई वृत्तान्त आणि ठाणे वृत्तान्तमध्ये १५ जून २०१० च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

14 June 2010

अंदाज पावसाचा, विनाश पर्यावरणाचा

हवामान खात्याने पावसाच्या वर्तवलेल्या अंदाजाकडे सर्वसामान्य नागरिक कधीच गंभीरपणे पाहात नाहीत. हवामान खात्याने मुसळधार किंवा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला असेल तर तेव्हा चक्क उन पडते.आणि पाऊस पडणार नाही, असे सांगितले असेल तर तेव्हा चक्क मुसळधार पाऊस पडतो. गेल्याच आठवड्यात शनिवार व रविवार या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली होती. मात्र त्या दिवशी एक थेंबही पाऊस पडला नाही.   
 

पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक निकष ताडून पाहिले जातात. हे निकष अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे असतात. त्यातही तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, अप्पर एअर र्सक्युलेशन हे काही प्रमुख घटकांचा यात समावेश असतो. हे सर्व घटक तसेच गेल्या काही वर्षांमध्ये जमा केलेली महिती लक्षात घेऊनच पावसाचा अंदाज वर्तवला जातो.

पावसाशी संबंधित या घटकांच्या अभ्यासामध्ये काही वर्षांनी बदलही होत असतात. एखाद्या घटकाचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे लक्षात आल्यावर तो रद्द केला जातो तर परिणाम होण्याची शक्यता असलेला घटक नव्याने समाविष्ट केला जातो. अल-निनो वादळाचा काही परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याची माहिती गोळा करण्यात येते. काही वर्षांनंतर हा घटक कितपत प्रभावी आहे, ते पाहून त्याचा अभ्यास करावा की नाही ते ठरवले जाते.

गेल्या पाच वर्षांमधील वेधशाळेचा पावसाचा अंदाज आणि मान्सूच्या तारखा पाहिल्या तर त्यात दोन-चार दिवसांचाच फरक पडला असल्याचे दिसून येते. २००५ मध्ये ७ जूनला पाऊस केरळात दाखल झाला. वेधशाळेचा अंदाज  १० जून असा होता. अन्य वर्षातील वेधशाळेचा अंदाज पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे प्रत्यक्ष पाऊस केरळ मध्ये दाखल झाला तो दिवस. २००६- २६ मे (३० मे), २००७-२८ मे ( २४ मे), २००८ -३१ मे (२९ मे) आणि गेल्या वर्षी २३ मे (२६ मे) या दिवशी मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता.

पावसाचा अंदाज अधिक अचूक वर्तविण्यासाठी हवामानशास्त्र वर्षानुवर्षाचा अभ्यास, माहितीचा साठा, त्याचे विश्लेषण तसेच हवामानातील बदल टिपणारी आधुनिक यंत्रे महत्त्वाची ठरतात. तरीही आपण केवळ अंदाजच व्यक्त करू शकतो.


याशिवाय तापमान, वाऱ्याचा वेग आणि दिशा, हवेचा दाब, पाऊस अशा मुख्य घटकांचे स्वयंचलित पद्धतीने रिडींग घेणारी ऑटोमेटिक वेदर स्टेशन याचाही उपयोग होत असतो. डॉपलर रडार या सारखी अत्याधुनिक यंत्रणाही मुंबईत बसविण्यात येणार आहे. त्यामुळेही पावसाचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.

अर्थात कितीही अत्याधुनिक यंत्रणा बसवली आणि पावसाचा किंवा हवामानाचा अंदाज वर्तवला  तरी मानवी बुद्धी, अत्याधुनिक यंत्रणा आणि विज्ञानापेक्षाही निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे. तो लहरी आहे. तो कसा वागेल, हे आपल्याला ठामपणे कधीच सांगता येत नाही. अर्थात असे असले तरी अत्याधुनिक यंत्रणेमुळे किमान काही प्रमाणात तरी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे आपण होणारे नुकसान टाळू शकतो, हे मान्य करावेच लागेल.

आधुनिक प्रगती, बदलती जीवनशैली, पर्यावरणाचा आपणच केलेला नाश, झाडांची बेसुमार केलेली कत्तल, नष्ट केलेले डोंगर याचाही परिणाम निसर्गावर पर्यायाने वातावरणावर, पावसावर होत आहे. त्याचा आपण कधी गंभीरपणे विचार करणार आहोत की नाही. अशाच प्रकारे आपण पर्यावरणाचा नाश करत राहिलो तर पुढील पन्नास/ शंभर वर्षात आकाशातून नैसर्गिकपणे पाऊस पडणेही कदाचित बंद होईल. कृत्रीम पद्धतीनेचे दरवर्षी आपल्याला पाऊस पाडावा लागेल. पुढील पिढीला आकाशातून धो धो पाऊस पडतो, हे कदाचित खरे वाटणार नाही आणि त्यांना केवळ पावसाची व्हिडिओ फिल्म दाखवावी लागेल...     

13 June 2010

वर्षातील बारा अमावास्या

कोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किंवा शुभ कार्य करणे टाळतात. अमावास्या या तिथीच्या भोवती पहिल्यापासूनच गूढ, अशुभ आणि काहीतरी विपरित असे समीकरण तयार झाले आहे. भारतीय संस्कृतीत अर्थात बारा मराठी महिन्यांमध्ये दर महिन्याला अमावास्या येत असते. मराठी महिन्यानुसार अमावास्येनंतर नवीन मराठी महिना सुरू होत असतो. 

आज १३ जून. आजपासून ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. काल म्हणजे १२ जून रोजी वैशाख अमावास्या होती. ही अमावास्या शनैश्चर जयंती म्हणून ओळखली जाते. या दिवशी शनी देवाचा जन्म झाला म्हणून ही अमावास्या शनी जयंती किंवा शनैश्वर जयंती म्हणून साजरी केली जाते. आषाढ अमावास्या ही गटारी अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. आषाढ अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो. मास किंवा मटण खाणारी मंडळी श्रावण महिन्यात हे काहीही खात नाही. काही जण या महिन्यात दारू पीत नाहीत. म्हणून श्रावण सुरू होण्यापूर्वी आदल्या दिवशी अमावास्येला मास, मटण, मासे आणि दारू येथेच्छ प्यायली जाते. आषाढ अमावास्या  हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कणकेचे दिवे करून त्याची पूजा केली जाते.

श्रावण महिन्यातील अमावास्या ही पोळा म्हणून साजरी केली जाते. शेतकरी वर्गामध्ये या दिवसाचे खूप महत्व असते. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात येणारी अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. या अमावास्येनंतर अश्विन महिन्याची सुरुवात होते. हा पहिला दिवस घटस्थापना म्हणून ओळखला जातो. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते.

पौर्णिमा आणि अमावास्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीसापेक्ष एकाच रेषेमध्ये येतात, यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि समुद्राला मोठी भरती येते, यालाच 'उधाणाची भरती' असे देखिल म्हणतात. आपल्या काही ग्रंथांमधून अमावास्येच्या दिवशी धार्मिक विधि, पूजापाठ करण्यास सांगितले आहे.


       

12 June 2010

महाराष्ट्र गौरव गाणी

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती यांचा गौरव करणारी काही मराठी गाणी आज एकत्र देत आहे. महाराष्ट्र गौरव गीते म्हटली की सर्वप्रथम पटकन आठवते शाहरी साबळे यांनी गायलेले आणि राजा बढे यांनी लिहिलेले जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे.

या गाण्यांबरोबरच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले बहु असो सुंदर की संपन्न महा प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा, राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांचे मंगल देशा, पवित्र देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम आमुचा तुजला घ्यावा, महाराष्ट्र देशा,  सुरेश भट यांनी लिहिलेले लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी आदी गाणी आपल्याला आठवतात. ही महाराष्ट्र गौरव गीते आज येथे संकलित केली आहेत. ही गाणी आपल्याला ऐकायची असतील तर त्याची लिंकही मी येथे दिली आहे. त्यावर क्लिक केलेत तर आपल्याला हे गाणे ऐकता येईल.

माझा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते जरुर कळवा.

१) जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणा-या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त रखितो महाराष्ट्र माझा

आपल्याला हे गाणे http://www.video4viet.com/music.html?act=play&id=ca6fa56a73ae2b08b807176dc13bf6eb
येथे ऐकता येईल.

२) प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?

पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे

रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे

दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
(श्रीपाद कृष्ण कोल्हटकर)

आपल्याला हे गाणे http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=64cb53bc-0b5b-45cf-b5d7-7027bca3ebd6&title=Priya%20Amucha%20Ek%20Maharashtra%20Desh%20Ha.mp3
 येथे ऐकता येईल.

३) लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
(सुरेश भट)

४) मंगल देशा पवित्र देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी , निशाणावरी , नाचते करी ;
जोडी इह पर लोकांसी , व्यवहारा परमार्थासी ,
वैभवासी, वैराग्यासी जरिपटक्यासह
भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा , कृष्णा , भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
(गोविंदाग्रज)

हे गाणे आपण http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=e639491e-d529-4aeb-99a1-3b0e9d448248&title=12%20Mangal%20Desha%20Pavitra%20Desha%20Maharashtra%20Desha.wma

येथे ऐकू शकाल.

५)मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे

नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ती गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी
तरी सिंधु मंथूनी काढूनी रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥
(माधव ज्युलियन)

हे गाणे आपल्याला http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=3ff56c86-8897-4717-978c-1ae7ab76d6c9&title=Marathi%20Ase%20Aamuchi%20Maiboli.mp3

या लिंकवर ऐकता येईल.

६) जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय जय राष्ट्र महा

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , माझे राष्ट्र महान

कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण

तू संतांची , मतिमंतांची , बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण

मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान
(चकोर आजगावकर)

11 June 2010

हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास

इतिहास संशोधक (ज्यांनी ताजमहाल नव्हे तेजोमहालय हे पुस्तक लिहिले  ते ) पु. ना. ओक यांनी लिहिलेला आणि अभ्यासपूर्ण विवेचन केलेला हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास हा ग्रंथ नुकताच वाचनात आला. आजवर झालेल्या इतिहास संशोधन आणि अभ्यासाला एक वेगळी दिशा देणारा असा हा ग्रंथ म्हणता येईल. प्राचीन काळी संपूर्ण जगभरात वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीच कशी पसरलेली होती, ते ओक यांनी या ग्रंथात उलगडून दाखवले आहे.

पुस्तकाच्या अर्पण पत्रात ओक यांनी म्हटले आहे की, प्रचलित परिपाठाहून पूर्णपणे भिन्न अशा माझ्या संशोधन प्रणालीत प्रस्तुतचा ग्रंथ अभूतपूर्व व सर्वकष ठरावा. कारण अनेक ऐतिहासिक रहस्ये, गैरसमजूती आणि ब्रह्मघोटाळे यांची उकल करून जागतिक इतिहासाचा  समन्वय करून दाखवणारी गुरुकिल्ली असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.

वैदिक संस्कृती आणि संस्कृत भाषा हाच सर्व मानवांचा मूळ वारसा आहे, हे चिरकाल लुप्त झालेले ऐतिहासिक सत्य सर्वांच्या कानी जायला हवे.

या ग्रंथाचे हिंदू विश्वप्रसार, वैदविज्ञानाचे प्राचीनत्व व विश्वप्रसार, इतिहास लेखन, संशोधनाचे तंत्र आणि घटना खंड असे चार भाग केलेले आहेत.  हिंदू विश्वप्रसार या पहिल्या भागात हिंदू शब्दाची व्युत्पत्ती, पूर्वेकडील हिंदू संस्कृती, पश्चिमेकडील हिंदू संस्कृती, संस्कृतोद्भव विश्वभाषा, हिंदू देवतांचे विश्वपूजन, जगातील हिंदू पदव्या आणि प्रथा, विश्वव्यापी हिंदू राजचिन्हे, विश्वव्यापी हिंदू शिक्षण पद्धती, विश्वप्रसृत हिंदू कालगणना, हिंदू संगीताचा विश्वप्रसार, युरोपखंडातील हिंदू संस्कृतीचे रामनगर केंद्र, यदुकुलाचे यहुदी लोक, कृस्तियांची हिंदू परंपरा, इस्लामचे हिंदुत्व, स्पेन, फ्रान्स व जर्मनतील हिंदू संस्कृती, अमेरिका खंडातील प्राचीन हिंदू संस्कृती, विश्वव्यापी प्राचीन हिंदू वैद्यकशास्त्र, आर्यावर्त असे विषय हाताळले आहेत.

वेदविज्ञानाचे प्राचीनत्व आणि विश्वप्रसार या भागात वेदांचे ऐतिहासिक स्वरुप, हिंदूंचे प्राचीन मुलभूत वाङ्मय, प्राचीन हिंदूंचे वेदविज्ञान, हिंदूंचे प्राचीन यांत्रिक-तांत्रिक ज्ञान, जागतिक वैदिक वारशाचा पुरावा, प्राचीन भारताची शास्त्रीय प्रगती यांचा उहापोह करण्यात आला आहे तर इतिहास लेखन व संशोधनाचे तंत्र या भागात प्रचलित इतिहासातील काही ढोबळ दोष, इतिहास पुनर्लेखनाची आवश्यकता, ऐतिहासिक कुट प्रश्नांचा उलगडा, इतिहासकारांचे अक्षम्य अपराध याविषयी सांगितले आहे.

हे पुस्तक मनोरमा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ६२८ पानांच्या या ग्रंथाची किंमत सहाशे रुपये इतकी आहे.

प्रकाशक-अनिल रघुनाथ फडके, मनोरमा प्रकाशन, १०२, सी-माधववाडी, दादर मध्य रेल्वे स्थानकासमोर, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४
दूरध्वनी ०२२-२४१४८२९९         

10 June 2010

साने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराईट संपुष्टात

साने गुरुजी यांच्या साहित्यावरील ‘कॉपीराइट’ (स्वामित्वहक्क) कायदा येत्या ११ जूनपासून संपुष्टात येणार असून त्यामुळे कोणीही प्रकाशक किंवा व्यक्ती आता त्यांचे साहित्य प्रकाशित करू शकेल. सध्याच्या कॉपीराइट कायद्यानुसार त्या लेखकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी संबंधित लेखकाच्या साहित्यावरील कॉपीराइट कायदा संपुष्टात येतो. साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले होते. येत्या ११ जून रोजी त्यांच्या निधनाला साठ वर्षे पूर्ण होत असल्याने कॉपीराइट कायद्यानुसार साने गुरुजी यांच्या साहित्यावरील ‘स्वामित्वहक्क’आपोआपचसंपुष्टात येत आहे.


कॉपीराइट कायद्यानुसार लेखकाने आपल्या लेखनाचे हक्क जी व्यक्ती किंवा संस्थेकडे दिले असतील, त्यांनाच ते साहित्य प्रकाशित करता येऊ शकते. अन्य कोणीही ते प्रकाशित केले तर कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून संबंधितांना भारतीय दंड विधानानुसार शिक्षा होऊ शकते. कॉपीराइट संपुष्टात आल्यामुळे त्या लेखकाचे साहित्य ही सार्वजनिक संपत्ती होते त्यामुळे कोणा एकाची मक्तेदारी त्या साहित्यावर राहात नाही.

साने गुरुजी यांनी सुमारे ७३ पुस्तके लिहिली होती. यात ‘सती’, ‘भारतीय संस्कृती’, ‘सुंदर पत्रे’, ‘स्वप्न आणि सत्य’, ‘श्यामची पत्रे’, विनोबाजी भावे’, ‘धडपडणारी मुले’ तसेच त्यांच्या गाजलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा, त्यांनी चालवलेल्या ‘पत्री’ या दैनिकाचा या समग्र साहित्यात समावेश होतो. ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे कॉपीराइट स्वत: सानेगुरुजी यांनीच पुणे विद्यार्थी गृह (पूर्वीचे अनाथ विद्यार्थी गृह) या संस्थेकडे दिले होते.
 
पुणे विद्यार्थी गृहाच्या मुद्रणालयात साने गुरुजी यांचे ‘पत्री’ हे दैनिक छापले जात होते. या दैनिकात तत्कालीन इंग्रज शासनाच्या विरोधात लेखन येत असल्याने त्या काळी हे मुद्रणालय जाळले गेले. आपल्यामुळे मुद्रणालयाचे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून साने गुरुजी यांनीच या संस्थेला ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे कॉपीराइट दिले होते. मात्र आता कॉपीराइट कायद्यानुसार पुणे विद्यार्थी गृह तसेच अन्य कोणाकडे दिलेले कॉपीराईट संपुष्टात येणार आहेत.
 
साने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराइट आता संपुष्टात येणार असल्याने त्यांचे साहित्य आता कोणीही प्रकाशक किंवा व्यक्ती प्रकाशित करू शकेल. तसेच हे साहित्य मराठी भाषकांपुरतेच मर्यादित न राहता आता अन्य भारतीय भाषात व परकीय भाषेत कोणालाही अनुवादित करता येणार आहे.

09 June 2010

मराठी पुस्तकांचे ई-वाचनालय

बदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता ई-वाचनालय सुरू झाले आहे. या वाचनालयाद्वारे आता ही पुस्तके ऑनलाईन वाचता येणार आहेत. फुजीसॉफ्ट वेअर्सने www.sahityasampada.com हे ई-वाचनालय सुरू केले आहे.


सध्याचे युग संगणक आणि माहिती-महाजालाचे असून नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. या संकेतस्थळावर माझी पुस्तक यादी, शोध, ललित, कथा, कविता, कादंबरी, बालजगत, विनोदी आणि नाटक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. स्कॅन केलेली किंवा पीडीएफ फाईलमधील मराठी पुस्तके वाचकांना या ठिकाणी ऑनलाईन वाचता येणार आहेत.

या संकेतस्थळावर सध्या १२५ पुस्तके ठेवण्यात आली असून वाचकांना ही पुस्तके ई-लायब्ररीच्या स्वरुपात किंवा विकत घेऊन वाचता येतील. सभासद होताना काही रक्कम मोबाईलच्या प्रीपेड कार्डाप्रमाणे भरावी लागणार आहे. सध्या ना. धों. महानोर, ना. सी. फडके, प्रमोदिनी वडके-कवळे, बाबा भांड, रा. रं. बोराडे यांची पुस्तके संकेतस्थळावर असून लवकरच अनंत मनोहर, भा. द. खेर, सुहास टिल्लू, द. रा. बेंद्रे, डॉ. सुवर्णा दिवेकर, संध्या रानडे यांचीही पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

संकेतस्थळावर ‘साहित्यिकांचे मनोगत’, ‘चर्चेचे व्यासपीठ’ अशी सदरेही असून सध्या त्यावर काही टाकण्यात आलेले नाही. ना. धो. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’, ‘पावसाळी कविता’ हे कविता संग्रह येथे उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशक यांच्यासाठीही हे संकेतस्थळ उपयोगी असून त्यांना येथे पुस्तके ई-बुक स्वरूपात सुरक्षित ठेवता येणार असून ती पुस्तके फक्त ऑनलाईनच वाचता येणार आहेत.
 
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अंजली कुलकर्णी यांच्याशी ०२४०-२३४७६३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा fuzzsoft@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेली बातमी)

08 June 2010

पाऊस तरणा आणि म्हातारा

मुंबई वगळता राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी मुंबईत मात्र त्याने अशी जोरदार हजेरी लावलेली नाही. असा हा पाऊस कधी जोरदार तर कधी रिमझिम असतो. पाऊस ज्या नक्षत्रात पडतो, त्या प्रत्येक नक्षत्रातील पावसाला वेगवेगळी नावे असून ती गमतीशीर आहेत. प्रत्येक नक्षत्रात पडणारा हा पाऊस ‘तरणा’, ‘म्हातारा’, ‘सासूचा’ आणि ‘सूनेचा’अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. ही नावे आपल्याकडे पूर्वापार चालत आली असून शेतकरी आणि लोकांनी ती अनुभवातून दिली आहेत.


पंचांगात पावसाची एकूण बारा नक्षत्रे दिली असून रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रात पाऊस पडला तर खूप पडतो किंवा  फारसा पडतही नाही. म्हणून त्या काळातील पावसाला कोणतेही नाव दिलेले नाही. ‘पुनर्वसु’ या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’ तर पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ असे नाव दिले आहे. आश्लेषा नक्षत्रातील पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ असे म्हणतात. मघा व पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला अनुक्रमे ‘सासूचा’ व ‘सूनेचा’ पाऊस असे नाव आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘रब्बीचा’ तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्तीचा’ पाऊस या नावाने ओळखले जाते.

याविषयी अधिक माहिती देताना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, पावसाला ही नावे लोकांनी दिलेली असून ती गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहेत. त्या प्रत्येक नावावरून त्या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. यंदाच्या वर्षी ६ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करत आहे. हा काळ सगळ्यात जास्त पाऊस पडणारा असतो. या दिवसात पडणारा पाऊस हा जोरदार, मुसळधार आणि जोशपूर्ण असतो. म्हणून या पावसाला तरणा पाऊस असे नाव दिले आहे. पुष्य नक्षत्रात पडणारा पाऊस हा सातत्य असलेला पण रिमझिम पडतो. शेतीसाठी तो उपयोगी असतो. त्यात जोश नसल्याने त्याला म्हातारा असे नाव दिले गेले आहे.

पुन्हा मघा नक्षत्रात पडणारा पाऊसही (यंदाच्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी सूर्य उत्तररात्री ५ वाजून ३४ मिनिटांनी या नक्षत्रात प्रवेश करत आहे) जोरदार, कडाडणारा आणि त्रास देणारा असतो. म्हणून त्याला सासूचा पाऊस असे म्हणतात तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस शातंपणे येतो. तो शेतीला उपयोगी असतो. त्यामळे त्याला सूनांचा पाऊस असे नाव दिले आहे.

उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस हा त्या वेळी होणाऱ्या रब्बी पिकांसाठी उपयुक्त असल्याने त्याला रब्बीचा तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला हत्तीचा पाऊस असे नाव दिले आहे. हस्तातील पाऊसही शेतीसाठी उपयुक्त असतो. त्यामुळेच आपल्याकडे ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त’ असे म्हटले जाते.

यंदाच्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्रात पडणारा पाऊस हा शेतीचे नुकसान करणारा असल्याने ‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ असे म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तर स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असे आपल्याकडे म्हटले जाते.

नक्षत्राप्रमाणेच पावसाचे वाहन आपल्याकडे सांगितलेले आहे. विविध प्राणी पावसाचे वाहन म्हणून सांगितले असून त्या प्राण्यांचे गुणधर्म, सवयी यानुसार तेव्हा पाऊस पडतो, असे मानण्यात येते. हत्ती, म्हैस, बेडूक ही वाहने असतील तर तेव्हा जास्त पाऊस पडतो. कारण हे सर्व प्राणी पाण्याशी संबंधित आहेत. तर उंदीर, घोडा या वाहनावर कमी प्रमाणात पाऊस येतो. गाढव वाहन असेल तर पाऊस पडला तर भरपूर नाहीतर अजिबात पडत नाही, असेही सोमण म्हणाले.

पावसाच्या या वाहनांना किंवा त्या त्या नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याला कोणतीही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक बैठक नाही. शेतकरी आणि लोकांनी वर्षांनुवर्षांच्या अनुभवातून आणि परंपरेनुसार पावसाची ही नावे दिलेली असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

07 June 2010

विश्वप्रसृत हिंदू कालगणना

इतिहास संशोधक पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास या पुस्तकात विश्वप्रसृत हिंदू कालगणना असे एक प्रकरण आहे. या प्रकरणात त्यांनी जगातील कालमापन हे पूर्वापार भारतीयांनीच ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच आजही कसे सुरू आहे ते तसेच इंग्रजी महिन्यांची नावेही विश्वव्यापी भारतीय वैदिक संस्कृतीत प्राचीनकाळी विविध महिन्यांचा उल्लेख कसा केला आहे, ते सांगितले आहे. ही सर्व माहिती विचार करायला लावणारी आहे.

पुस्तकातील सप्ताह-महिन्यांचे क्रमही भारतीयच या शीर्षकाखाली असलेल्या मजकुरात लेखक म्हणतात की, साठ सेकंद म्हणजे एक मिनिट आणि साठ मिनिटे म्हणजे एक तास हा हिशोब भारतीयांनी रुढ केलेल्या गणनेनुसार आहे. भारतीय पद्धतीनुसार साठ विपळे म्हणजे एक पळ आणि साठ पळे म्हणजे एक घटी. यावरुन असे दिसते की ६०-६० चा भारतीय हिशोब तसाच राहून घटी, पळे, विपळे या परिभाषेऐवजी तास, मिनिटे आणि सेकंद ही नावे युरोपात रुढ झाली.

hour (आवर) हा आंग्ल शब्द मुळात होरा असा संस्कृत आहे. होरा शब्दाचाच hour असा आंग्ल अपभ्रंश झाला. अडीच घटकांचा एक होरा. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. म्हणून अडीच घटकांचा एक तास hour ऊर्फ होरा म्हटला जातो.

दिवसांचा साप्ताहिक क्रमही भारतीयांनी ठरवून दिलेल्या प्रथेनुसारच संबंध जगात बिनबोभाट पाळला जातो. उदा. शनिवारनंतर रवीचा वार. नंतर सोमवार म्हणजे चंद्राचा वार आंग्ल भाषेत Monday असा जो शब्द आहे तो मुळात Moonday (म्हणजे चंद्रावार) असा होता. भारतीय वैदिक सम्राटांचे जगावर प्रभुत्व नसते तर वरील क्रम कोणीच मानला नसता.

यौरोपीय महिन्यांची नावेही पाहा. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ही नावे सप्तांबर, अष्टांबर, दशांबर अशी संस्कृत आहेत. अंबर म्हणजे आकाश. जन्मपत्रिकेत आकाशाचे बारा भाग कल्पिले असून त्यास अनुसरून १२ राशी आणि १२ महिने केले गेले आहेत. महिने मोजण्याचे दोन प्रकार असतात. वाटल्यास चैत्र वैशाख अशा विशिष्ट नावाने उल्लेख करावा किंवा पहिला महिना, दुसरा महिना असा करावा. या संख्याक्रमानुसार पहिला महिना म्हणजे एकांबर. दुसरा म्हणजे द्वितीयांबर. अशा क्रमाने सप्तांबर, अष्टांबर, आणि नवांबर ही अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या, दहाव्या महिन्यांची नावे आहेत. युरोपात ही जी नावे उरली आहेत, त्यावरून विश्वव्यापी भारतीय वैदिक संस्कृतीत प्राचीन काळी विविध महिन्यांचा उल्लेख अशा प्रकारे त्यांच्या संख्याक्रमाने होई, असे दिलून येते.

सप्टेंबर हा नावानुरुप सातवा महिना. परंतु प्रचलित यौरोपीय प्रथेनुसार तो नववा महिना आहे. ही विसंगती कशी निर्माण झाली ह्याचे स्पष्टीकरण वास्तविक यौरोपीय लोकानीच द्यायला पाहिजे. पण बहुतेकांना त्याची जाणीव सुद्धा नाही तर ते त्याचे विवरण ते काय देणार. मात्र या विसंगतीवरून एका नवीन ऐतिहासिक तथ्याचा सुगावा लागतो. ते तथ्य असे की मार्च हा पहिला महिना धरला तरच सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे संख्याक्रमाने सातवे, आठवे, नववे आणि दहावे महिने ठरतात. या वरून असा निष्कर्ष निघतो की प्राचीनकाळी युरोपात मार्च महिन्यात नववर्षदिन पडे. म्हणूनच मार्च हा पहिला महिना गणला जाई.  आणि हुबेहुब प्राचीन इतिहासापासून तेच सिद्ध होते. उदा. इसवीसन १७५२ पर्यंत आंग्ल देशाचे नवे वर्ष २५ मार्च पासूनसुरु होई. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदा त्याच सुमारास येते. इराणी नवरोझही त्याच सुमारास येतो.

ऑगस्ट हे एखा यौरोपीय महिन्याचे नाव ऑगस्टस सीझर या रोमन सम्राटाच्या नावावरून पडले असा समज सध्या रुढ आहे. तो समज खऱा असला तरी त्या सम्राटाचे नाव ऑगस्टस पडण्याचे कारण काय, हे पाहिले तर अगस्च ऋषी हे प्राचीन विश्वात फार ख्याती पावल्यामुळे त्यांचे नाव रोमन सम्राटांनी पदवीरुपाने धारण केले.  कॅलेंडर (calendar) हा यौरोपीय शब्द मुळात कालांतर म्हणजे काळाचे अंतर दाखविणारा तक्ता अशा अर्थाचा संस्कृत आहे. आंग्ल भाषेत मोठ्या घड्याळाला क्लॉक (clock) म्हणतात. तो काल-क म्हणजे काळाची नोंद ठेवणारे यंत्र अशा अर्थाचा शब्द आहे.

काळाच्या उलथापालथीत ऐतिहासिक इमारतींची जशी नासधूस होते, तशी ती हिंदू संवत्सरातील महिन्यांची झालेली आपणास दिसून येते. कालौघात अशी वाताहत सतत सुरु असते. तरी त्या खंडीत चिन्हांवरून लुप्त इतिहासाची जुळणी करता येते.

(हे पुस्तक मनोरमा प्रकाशन, १०२/सी, माधववाडी, पहिला मजला, दादर मध्य रेल्वे स्थानकासमोर, दादर-पूर्व, मुंबई-४०००१४ यांनी प्रकाशित केले आहे. दूरध्वनी संपर्क ०२२-२४१४८२९९)                   

06 June 2010

शिवाजी महाराज यांची आरती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आरती. लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही आरती (गाणे) प्रसिद्ध आहे. शिवजयंती, महाराष्ट दिन किंवा विविध कार्यक्रमातून हे गाणे वाजवले जातेच. 

शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने आज ती आरती येथे देत आहे.

जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया।।


आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता।

त्रस्त आम्ही, दीन आम्ही शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया
भगवन भगवद्गीता सार्थ कराया।।

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिंवरला
करुणोक्तें स्वर्गी श्रीशिवनृप गहिंवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तश्रीमत्शिवनृप की जय बोला।।

-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

05 June 2010

श्यामची आई उपेक्षित

एखादी व्यक्ती किंवा संस्थेच्या आयुष्यात पंचाहत्तरी अर्थात अमृतमहोत्सव साजरा करणे हा एक आनंदसोहळा असतो. त्या निमित्ताने खास समारंभ आयोजित करण्यात येतो. पंचाहत्तर वर्षांनतरही एखादे पुस्तक बाजारात विकले जात असेल, त्या पुस्तकाच्या चार लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली असेल तर ते पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेसाठीही गौरवाची गोष्ट आहे. मात्र साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाला अमृतमहोत्सवी वर्षांत हे भाग्य लाभलेले नाही. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ‘पुणे विद्यार्थी गृह’ या संस्थेने या निमित्ताने कोणतेही विशेष कार्यक्रम किंवा उपक्रम राबवलेले नाहीत. त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षांत ‘श्यामची आई’ उपेक्षित राहिली आहे.


दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदान सचिव आनंद कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली असता ‘श्यामची आई’ चा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, मी आत्ता दिल्लीत आहे. असा काही प्रस्ताव असेल तर मला त्या बाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. पण प्रस्ताव नसेल तर त्यावर जरुर विचार करू.

पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांनी लिहलेले हे पुस्तक १९३५ मध्ये प्रकाशित झाले होते. साने गुरुजी हे नाशिक येथील कारागृहात असताना १९३३ मध्ये त्यांनी या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली होती. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून आजतागायत त्याची सातत्याने विक्री होत आहे. याच पुस्तकापासून प्रेरीत होऊन आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदकही मिळाले आणि सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला मराठी चित्रपट ठरला.

‘श्यामची आई’ या पुस्तकानेही इतिहास घडवला आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. आजही पुस्तकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. पुस्तकाचे ४४ वेळा झालेले पनर्मुद्रण त्याचेच द्योतक आहे. सहा वर्षांपूर्वीच या पुस्तकाने चार लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता.

या पुस्तकाच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने पुणे विद्यार्थी गृहाकडून विशेष सोहळा आयोजित केला जाईल, अशी ‘श्यामची आई’ पुस्तकप्रेमींची अपेक्षा होती. मात्र प्रकाशन संस्थेने त्या अपेक्षेवर बोळा फिरवला आहे. अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने कोणताही विशेष सोहळा, कार्यक्रम किंवा उपक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.

ज्या साने गुरुजींनी या पुस्तकाचे मुद्रण हक्क (कॉपीराईट) पुणे विद्यार्थी गृहाला (पूर्वीचे अनाथ विद्यार्थी गृह) त्यांच्या या लोकप्रिय पुस्तकाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत कोणताही सोहळा आयोजित न करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे बोलले जात आहे. अनाथ विद्यार्थी गृहाच्या लोकसंग्रह मुद्रणालयात साने गुरुजी यांचे ‘पत्री’ हे वृत्तपत्र छापण्यात येत होते. मात्र तत्कालिन सरकारविरोधी लेखनामुळे हे मुद्रणालय जाळले गेले. तेव्हा विद्यार्थी गृहाला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याासाठी साने गुरुजी यांनी आपल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे मुद्रण हक्क संस्थेकडे सुपूर्द केले होते.

दरम्यान या संदर्भात पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन संस्थेत संपर्क साधला असता तेथील शेटे नावाच्या पदाधिकाऱ्यांनीच पुस्तकाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने सध्यातरी विशेष काही कार्यक्रम किंवा उपक्रम आयोजित करण्याबाबत विचार नसल्याचे सांगितले. आपल्याला भेटायला आत्ता काही लोक आलेले असल्याचे सांगून ‘श्यामची आई’ पुस्तकाबाबत अधिक काही माहिती देण्यास व बोलण्यास शेटे यांनी असमर्थता दर्शवली. थोडय़ा वेळाने पुन्हा संपर्क साधू का, अशी विचारणा केली असता, तुमच्या पुणे कार्यालयातील एखाद्या माणसाला आमच्या येथे पाठवा, तुम्हाला हवी असेलेली माहिती आम्ही त्यांना देऊ, असेही उत्तर शेटे यांनी दिले

04 June 2010

मानबिंदू महाराष्ट्राचे

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने द संडे इंडियन वृत्तसाप्ताहिक (मराठी आवृत्ती) आणि आयआयपीएम प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मानबिंदू महाराष्ट्राचे यशोगाथा शंभर मराठी आयडॉल्सची हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

आपापल्या कायर्क्षेत्रात स्वतच्या कर्तगारीने वेगळा ठसा उमटविणाऱया विविध व्यक्तींची ओळख आणि त्यांचा प्रवास यात उलगडून दाखविण्यात आला आहे. यातील सर्व व्यक्तीमत्व सगळ्यांच्या माहितीची असतीलच असे नाही. पण जीवनात आलेल्या अडचणी, अपयश आणि आपल्यातील मर्यादेवर मात करत  जीवनात केलेली यशस्वी वाटचाल अनेकांना मार्गदर्शक ठरणार आहे.

या पुस्तकाचे संपादक देवदास मटाले यांनी आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, मराठी माणूस म्हणजे नोकरदार, चाकरमानी ही मागे सरलेल्या काळातील प्रतिमा झाली. अर्थात तेव्हाही मराठी समाजातील कित्येकांचे कर्तृत्व गगनाला भीडणारे होतेच आणि कित्येक क्षेत्रांवर मराठी जनांनी आपल्या असमान्य कर्तगारीने स्वतचा असा ठसा उमटवला होता. आज ही कर्तबगारी अधिक व्य़ापक होऊ लागली आहे. म्हणूनच उत्तुंग यश मिळविणाऱया असमान्य कर्तबगारीच्या बुजर्गासोबतच वेगळ्या वाटा चोखाळून आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

यश, कर्तगारी ही कोणत्याही चौकटीतल्या व्याख्येत बसवता येत नाही. आपण आपली वेगळी वाट धुडाळून यशाचा एक नवा फॉर्म्युला जगासमोर ठेवायचा असतो. हे शालेय विद्यार्थ्यांना सांगण्याच्या मुख्य उद्देश या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. काही विशिष्ट क्षेत्रांची, व्यक्तिमत्वांची निवड ही म्हणूनच खास मुलांना डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकातील काही आयडॉल्सच्या महत्वाच्या वाक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात आयटी उद्योजक दीपक घैसास, अभिनेता अतुल कुलकर्णी, शेफ निलेश लिमये, कवी संदीप खरे, सामाजिक कायर्कर्ते डॉ. अभय आणि राणी बंग यांचा समावेश आहे. त्यांचे हे विचार विद्यार्थी आणि तरुणांना नक्कीच प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरतील.

द संडे इंडियन आणि आयआयपीएम प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच महाराष्ट्रातील पर्यटन, संस्कृती, उद्योग आदी विविध विषयांवरील माहितीचा आढावा घेणारी पुस्तकेही प्रकाशित केली जाणार आहेत.  खरे तर अशा प्रकारारचे काम महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याच्या या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने करणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. त्यामुळे द संडे इंडियन आणि आयआयपीएम प्रेस यांचा हा उपक्रम अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे.

या पुस्तकात चित्रकार अनंत जोशी, आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट-क्रिएटिव्ह डायरेक्टर या पदावर काम करणारे राज कांबळे, मराठी बाणा कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे, आयसीआयसीआय व्हेन्चर फंड्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाखा मुळ्ये, मिस अर्थ सौदर्यस्पर्धेचा किताब जिंकणारी पहिली भारतीय अमृता पत्की आणि अन्य अनेक व्यक्तींचा परिचय करून देण्यात आला आहे. त्याचा हा परियच अनेकांच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणेल.  


पुस्तकाचे संपादक देवदास मटाले यांचा संपर्क

feedback.greatmarathi@gmail.com

03 June 2010

आता वाजले की बारा...

नटरंग या चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हे गाणे अमाप लोकप्रिय झाले आहे. कोणत्याही कायर्क्रमात, उत्सवात हे गाणे वाजवले जाते. अशा या लोकप्रिय गाण्यावर माझी दहा वर्षांची मुलगी मानसीने हे विडंबन गीत केले आहे. 

वर्गात अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर ऑफ पिरियडला खाली खेळायला सोडा हे सांगण्यासाठी आता वाजले की बारा या गाण्याच्या चालीवर आधारित हे गाणे मानसीने तयार केले आहे.  


आज आहे आमचा मूड, खूप चांगला दिवस

आम्हा सोडा ना हो खाली आम्हा चैन पडेना

एवढा वेळ आम्ही पाहिली वाट,

नाही बोलत हो आम्ही खोटं

खेळायचं आहे हो खूप आम्हाला

आता सोडाना ना हो खाली...


राखली की मर्जी तुमची अभ्यास आम्ही केला

आता तरी अभ्यासातून  मुक्त आम्हा करा

मऱाठीचा अभ्यास झाला झाली गणितंही सोडवून

इतिहास आणि भूगोल तुमचा झालाय शिकवून

आम्हा सोडा खेळायला मस्ती नाही करणार

ऊनं आलं डोक्यावरती तरी चक्कर नाही येणार

बाई, चक्कर नाही हो येणार


पाहिजे तर राखणीला तुम्ही येऊ शकता

आम्ही कसं खेळतो ते तुम्ही बघू शकता

आता कसं सांगू कळत नाही, दुसरं काही सूचत नाही

आम्हा सोडा ना हो प्लीज खाली...


आता सोडाना हो आम्हा खाली

वेळ आहे खूप कमी

वीसचं मिनिंटं आता उरली

आम्हा सोडा ना हो खाली

आता वाजले की बारा...


असं काय करता, वर्गात ठेवता, अभ्यास देता

बोल बोल बोलतां, कटकट असते तुमची हो

पहिला तास गेला आता, सहावा तास गेला

आता नवव्या तासाला तरी सोडा

आम्हा सोडा ना हो खाली

आता वाजले की बारा...

-मानसी जोशी  

02 June 2010

कौलालम्पुरमध्ये झाला तुकोबांच्या अभंगांचा गजर

तुकोबांची अभंगवाणी मराठी भाषा आणि संस्कृतीपुरतीच मर्यादित राहिली नसून ती विश्वपातळीवर पोहोचली असल्याचा अनुभव मुंबईतील एक उद्योजक आणि फाईन आर्ट सोसायटी चेंबूरचे अध्यक्ष गणेशकुमार यांना नुकताच आला. गणेशकुमार हे व्यवसायाने उद्योजक असले तरी मराठी संत साहित्य हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून ते मराठी संत साहित्यावर आधारित ‘महाराष्ट्र अभंगरत्न-नामसंकीर्तन’ हा कार्यक्रमही सादर करत असतात.

मलेशिया-कौलालम्पूर येथे ते व्यावसायिक कामासाठी गेले होते. तेथील मंडळींना गणेशकुमार हे येथे आल्याचे कळल्यांतर त्यांनी त्यांना कौलालम्पूर येथील ग्यानानंद स्वामीच्या आश्रमाला भेट देण्यासाठी निमंत्रित केले. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यक्रम सादर करावी अशीही विनंती केली.


गणेशकुमार हे त्या आश्रमात गेले असता तेथील विद्यार्थ्यांनी तुकोबांच्या काही रचना त्यांना म्हणून दाखवल्या. कौलालम्पूर येथील त्या आश्रमातील विद्यार्थ्यांकडून तुकोबांच्या अभंगांचा गजर झाल्यामुळे गणेशकुमार यांनाही आश्चर्य वाटले.

आपल्या या अनुभवाविषयी बोलताना  गणेशकुमार म्हणाले की, मी आश्रमात गेल्यानंतर तेथे शिकणाऱ्या मुलांनी मला तुकोबांचे काही अभंग म्हणून दाखवले. आश्रमातील बहुतेक मुले दक्षिण भारतीय आहेत. या मुलांनी ‘सुंदर ते ध्यान’ आणि अन्य काही अभंग म्हटले. याबाबत त्या मुलांकडे विचारणा केली असता, आपल्याला तुकोबांचे अभंग माहिती आहेत आणि आम्ही ते नेहमी म्हणतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील संत तुकाराम, रामदास स्वामी हे दक्षिण भारतातील लोकांना माहिती आहेत. रामदास स्वामी दक्षिण भारतात येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. दक्षिण भारतातील एक संत ग्यानानंद स्वामी यांचा शिष्यपरिवार जगभरात पसरला असून हरिदासगिरी महाराज हे त्यांचे शिष्य होते. दक्षिण भारतात प्रवचन/कीर्तन आदी कार्यक्रमातून हरिदासगिरी महाराज हे नेहमी मराठी अभंग सादर करत असत. त्यामुळे दक्षिण भारतात तुकोबांचे अभंग माहिती आहेत. कांचीपुरम्जवळ विठ्ठल-रुखमाईचे मोठे मंदिरही आहे. त्यामुळे कौलालंपूर येथील आश्रमातील विद्यार्थ्यांनाही या अभंगांची माहिती असल्यानेच त्यांनी ते सादर केले असल्याचे गणेशकुमार यांनी सांगितले.

तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाला आपला मित्र मानले. त्याच्याशी सहज संवाद साधला. त्यांच्या अभंगातूनही ही सहजता आणि जीवनविषयक तत्वज्ञानही दिसून येते. तुकोबांच्या अभगांची भाषा ही सहज व सोपी आहे. सर्वसामान्य माणसालाही त्याचे सहज आकलन होते. त्यात कठीण असे काही नाही. तुकोबांच्या या सहज भक्तीचा प्रभाव दक्षिण भारतातील लोकांवरही पडला आहे आणि त्यामुळेच तुकोबांचे अभंग मराठी भाषा आणि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडून देश आणि जागतिक पातळीवर पोहोचले असल्याचेही गणेशकुमार म्हणाले.