राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, शास्त्रीय संगीतातील दिग्गज पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. दि. वि. पलुस्कर, गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर यांचे गायन तसेच जुन्या जमान्यातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती आपल्याला ऐकायच्या असतील, त्यांच्या भाषण किंवा गायन शैलीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आता ते शक्य आहे. कारण आकाशवाणीने गेल्या अनेक वर्षांतील हा खजिना जपला आहे. जुन्या टेपवरील काही दुर्मिळ ध्वनिमुद्रण सीडी आणि कॅसेटवर घेण्यात आले असून ते रसिकांसाठी सशुल्क उपलब्धही करून देण्यात आले आहे.
खासगी दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्या आणि एफएम रेडिओ यांचे प्रस्थ वाढले असले तरी काही वर्षांपूर्वी मात्र तशी परिस्थिती नव्हती. आकाशवाणी आणि दूरदर्शन अशी दोनच प्रभावी माध्यमे तेव्हा होती. त्यामुळे विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आकाशवाणी-दूरदर्शनसाठी कार्यक्रम केले होते. मराठी संस्कृतीत अजरामर ठरलेले ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’ सर्वप्रथम आकाशवाणीवरूनच प्रसारित झाले होते. आकाशवाणीकडे अशा अनेक दिग्गजांचे ध्वनिमुद्रण जतन केलेले आहे. आकाशवाणी संगीत संमेलन कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील विविध घराण्यातील मान्यवर गायकांनी आपली हजेरी लावली होती. त्या सर्वाचे गायन आज सीडी आणि कॅसेट स्वरूपात उपलब्ध आहे.
पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. दि. वि. पलुस्कर, उस्ताद अझिज अहमद खान वारसी यांच्यासह अन्य शास्त्रीय गायकांचे गायन, पं. भीमसेन जोशी, पं. राजन आणि साजन मिश्रा, वीणा सहस्त्रबुद्धे, पं. जसराज, सवितादेवी, शोभा गुर्टू यांनी सादर केलेली ‘भजनावली’, पं. कुमार गंधर्व, उस्ताद आमिरखान, पं. कृष्णराव, शंकर पंडित, एम. एस. सुब्बलक्ष्मी, पं. पन्नालाल घोष, पं. निखिल बॅनर्जी आदींचे सादरीकरण सीडी व कॅसेट स्वरूपात आकाशवाणीने रसिकांसाठी जतन केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, चर्चगेट येथे चौकशी कक्षात त्याविषयी माहिती मिळू शकेल.
आकाशवाणी मुंबई केंद्राकडेही प्रभा अत्रे, पं. के. जी. िगडे, शोभा गुर्टू, पं. जसराज, पं. अजय पोहनकर, परवीन सुलताना, अल्लारखा, पं. डी. के. दातार, गंगुबाई हनगल, पं. जितेंद्र अभिषेकी, हिराबाई बडोदेकर आदी दिग्गजांचे आकाशवाणीवर झालेले कार्यक्रम जतन करून ठेवण्यात आले आहेत. मराठी सुगम संगीतात भावगीतांचा उल्लेख तर अपरिहार्य असून आकाशवाणीवरून त्याकाळी सादर झालेली अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. आकाशवाणी-मुंबई केंद्रावरून ‘भावसरगम’ या कार्यक्रमातून ही सर्व गाणी सादर झाली होती. मराठी सुगम संगीतातील हा सुवर्णकाळ होता. सुदैवाने आज ही गाणी आकाशवाणीकडे आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील कार्यक्रम अधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांकडे असलेल्या जुन्या कार्यक्रमांचे जतन करण्याासाठी स्थापन करण्यात आलेल्या अर्काइव्ह समितीचे राज्य समन्वयक भूपेंद्र मिस्त्री यांनी भावगीतांच्या सुवर्णकाळाचा वेध घेणारी मालिका गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सादर केली होती.
मान्यवर कवी, लेखक, गायक, संगीतकार, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, शाहीर, गझलकार, विचारवंत, शास्त्रज्ञ, अभिनेते, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती, गायन, आत्मकथन आकाशावणीच्या मुंबई केंद्राकडे जतन केलेले आहे. दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची दाजी भाटवडेकर यांनी घेतलेली मुलाखत, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची जॉर्ज फर्नाडिस यांनी घेतलेली मुलाखत तसेच जे. आर. डी. टाटा, भाऊसाहेब पाटणकर, हरिवंशराय बच्चन अशा अनेक मान्यवरांनी आकाशवाणीसाठी मुलाखत दिली होती. ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी ‘माझा नाटय़लेखन प्रवास’ या विषयावर दिलेले भाषण असा दुर्मिळ खजिना आकाशवाणीकडे आहे.
आकाशवाणीवरून काही वर्षांपूर्वी जे कार्यक्रम सादर व्हायचे त्याचे ध्वनीमुद्रण ‘मेल्ट्रॉन’ यंत्रावर केले जायचे. कालांतराने यावर ध्वनिमुद्रण केले जाणे बंद झाले. आता आकाशवाणीत सर्वत्र कॉम्प्युटराइज्ड किंवा डिजिटल पद्धतीने ध्वनिमुद्रण केले जाते. आता अनेक वर्षांपासूनच्या ज्या जुन्या टेप्स आहेत, त्यापैकी काहींचे सीडी किंवा कॅसेटमध्ये जतन करण्यात आले आहे. राज्यात २२ आकाशवाणी केंद्रे असून त्या प्रत्येक केंद्राकडे अशा प्रकारे टेप्सवर केलेले अनेक जुने कार्यक्रम आहेत. यात लोककला, नाटक, संगीत, मुलाखती, विविध साहित्य आणि नाटय़संमेलने आणि अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे. यापूर्वीही हा ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि आताही करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांकडे असलेल्या कार्यक्रमांची यादी आपण मागवली असून त्यातून निवडक कार्यक्रमांचे जतन केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र/राज्य शासनाकडून आर्थिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मिस्त्री यांनी दिली.
No comments:
Post a Comment