14 November 2009

डाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi

मुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदणे, बोअरवेल किंवा रिंगवेल खणणे हे पर्याय असले तरी त्यामुळे पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेल का, याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखालील गोडय़ा पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासन डाऊझिंग तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार करत आहे.

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हल्ली सर्रास बोअरवेल किंवा रिंगवेलला प्राधान्य दिले जाते. बोअरवेल खणताना जमिनीत सुमारे सत्तर ते ऐशी फूट खोल जावे लागते. इतके खोल गेल्यानंतरही पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेलच याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखाली नेमके कुठे पाणी लागेल, याचा शोध ज्या प्रक्रियेमार्फत घेतला जातो त्याला डाऊझिंग असे म्हणतात.

विशिष्ट झाडाची वाय आकाराची फांदी किंवा धातुची काटकोनातील काठी घेऊन जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्यात येतो. खेडेगावात अशा पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोध घेणाऱ्या माणसांना ‘पाणाडे’ असे म्हटले जाते. राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे पाण्याचा शोध या माणसांकडून घेण्यात येतो.दरम्यान पश्चिम उपनगरातील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांनी डाऊझिंगच्या मदतीने बोअरवेल/रिंगवेल खणून घेतल्या असून त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

तांबे किंवा अन्य धातूची काठी काटकोनात धरुन डाऊझिंग तज्ज्ञ जमिनीवर पुढे पुढे चालत राहतो. ज्या ठिकाणी हमखास पाणी लागण्याची शक्यता असेल तेथे ती काठी जमिनीच्या दिशेने झुकते. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या पद्धतीचा वापर केला होता, अशी माहिती महापालिकेचे उपप्रमुख अभियंता (जल बांधकाम) मुकुंद पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

विहिर खणल्यानंतर त्याला पाणी लागणे किंवा न लागणे हे माणसाच्या नव्हे तर निसर्गाच्या हातात. आहे. जमिनीखाली न खोदता जर अगोदरच पाणी लागेल की नाही, ते गोडे असेल का हे कळले तर विहिर खणून पाणी लागले नाही किंवा खारे पाणी लागले तर होणारा खर्च वाया जाणार नाही आणि हेच या पद्धतीने शोधून काढता येते, असे डाऊझिंग पद्धतीचे अभ्यासक आणि पाणीसमस्येवर मात करण्यासाठी विविध प्रयोग करणारे तज्ज्ञ गोविंद पंडीत व अजय काळे यांनी सांगितले. जमीन न खणता या पद्धतीने काढलेले निष्कर्ष ९० टक्के बरोबर येतात, असा दावाही पंडीत यांनी केला.

No comments:

Post a Comment