07 April 2010

पेपरलेस हॉस्पिटल

भारतातील आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या प्रेरणेतून कोचीन येथे सुरू झालेले ‘अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर’ हे केरळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षणातील मानबिंदू ठरले आहे. या संकुलात १३०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, रुग्णांसमवेत येणाऱ्या नातेवाईकांसाठी १६ मजल्यांची स्वतंत्र इमारत, वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय इत्यादींचा समावेश आहे. या अद्ययावत रुग्णालयाचा सर्व कारभार ‘पेपरलेस’ असून बाह्य रुग्ण विभागात दररोज सुमारे दोन हजार पाचशे रुग्ण येत असतात. रुग्णांना कमीतकमी त्रास व्हावा यासाठी येथे विशेष प्रयत्न केले जातात.

माता अमृतानंदमयी मठातर्फे नुकतेच कोचीन येथे एका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे संपूर्ण अद्ययावत रुग्णालय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. या वेळी रुग्णालयाचे पर्यवेक्षक डॉ. संजीव सिंह, अमृतानंदमयी मठाचे सहनिमंत्रक अनुप चव्हाण, डॉ. ओम प्रकाश आदी उपस्थित होते.

या रुग्णालयाची संपूर्ण इमारत वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीत इतकी स्वच्छता आणि टापटीपपणा आहे की आपण एखाद्या रुग्णालयात फिरत आहोत, असे वाटतच नाही. रुग्णालयाचा संपूर्ण पेपरलेस कारभार हे रुग्णालयाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणता येईल. येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बारकोड असलेले एक कार्ड दिले जाते. त्या कार्डावर त्याचे नाव, पत्ता, आजार, सध्या सुरू असलेले उपचार, रुग्णाचा इतिहास याची माहिती नोंदविण्यात येते. ही सर्व माहिती संगणकावर संकलित करून साठवून ठेवण्यात येते. त्यामुळे पुन्हा कधी रुग्ण परत आला तर त्याचे केसपेपर तयार करा, सर्व माहिती घ्या, असे सोपस्कार करावे लागत नाहीत. तसेच रुग्णाचे रक्त, लघवी, थुंकी, मूत्र याचे नमुने घेतल्यानंतरही त्याची तपासणी करताना त्यावर बारकोड दिला जातो. तपासणीचा अहवाल हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टर ऑनलाईन पाहू शकतात. त्यामुळे अन्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा रुग्णाला इकडेतिकडे जसे धावावे लागते तो त्रास येथे वाचतो. रुग्णाचे एक्स-रे काढण्यासाठीही फिल्मचा वापर केला जात नाही तर त्याचा डिजिटल रिपोर्ट तयार केला जातो. रुग्णाचा एक्सरे संबंधित डॉक्टर ऑनलाईन पाहू शकतात तसेच सीडीमधून आपला एक्स-रे रुग्ण घेऊन जाऊ शकतो.

रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी सोयीचे असलेले या रुग्णालयाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे हृदय, मधुमेह, नाक-कान आणि घसा आणि अन्य आजारांसंबंधीच्या सर्व तपासण्या या एकाच ठिकाणी होतात. म्हणजे रुग्णाच्या ज्या काही तपासण्या आणि उपचार करायचे असतील ते एकाच मजल्यावर केले जातात. त्यामुळे रुग्णाला इकडूनतिकडे जावे लागत नाही. रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे समुपदेशक, आहारतज्ज्ञ यांचीही नेमणूक केलेली आहे. याच ठिकाणी संशोधन विभागही असून येथे विविध आजार, त्यावरील औषधोपचार याबाबत संशोधन सुरू आहे. बायोटेक्नोलॉजी, नॅनो टेक्नोलॉजी यासंबंधीही येथे प्रयोग सुरू आहेत. मधुमेही रुग्णांसाठी इन्सुलिन पंप विकसित करण्यात आला असून तो २५ हजार रुपये इतक्या शुल्कात रुग्णांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. बाजारात सध्या याची किंमत काही लाख रुपये इतकी आहे.

येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर खासगी रुग्णालयातील दरांच्या तुलनेत अल्प दरात उपचार केले जातात. एखाद्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल तर त्याच्यावर मोफतही उपचार केले जातात. या रुग्णालयात उपचार करण्यासाठी देशभर तसेच परदेशांतूनही रुग्ण येत असतात. मुंबईत बदलापूर येथे अमृतांदमयी मठातर्फे ३० खाटांचे एक छोटे रुग्णालय चालविण्यात येत आहे.

अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटरबाबत http://www.aimshospital.org या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल.

( माझा ही बातमी लोकसत्ता- मुंबई वृत्तान्तमध्ये ७ एप्रिल २०१०च्या अंकात पान १ वर प्रसिद्ध झाली आहे)

5 comments:

  1. लेख माहितीपुर्ण झाला आहे आणि याच रुग्णालयात बहिण आणि मेहुणे डॉ्क्टर आहेत त्यामुळे उत्सुकतेने वाचला लेख!!!!

    ReplyDelete
  2. mala ek kalat nahi
    tumhi srakhe kuthe haravat??????????????????

    ReplyDelete
  3. छान लेख. बरेच दिवसांनी दिसलात शेखरजी !!

    ReplyDelete
  4. तन्वी, विनायक आणि हेरंब,
    नमस्कार
    प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोचीन येथील हॉस्पिटलचे काम खूप मोठे आहे.
    गेल्या अनेक दिवसात काही लिहिले नाही. मी कुठेच हरवलेलो नाही. इकडेच आहे. गेल्या अनेक दिवसात ब्लॉगवर काही लेखन झाले नाही, काही खास कारण असे नाही.

    ReplyDelete
  5. लेख अप्रतिम आहे ,माहिती सुंदर आहे,

    ReplyDelete