जानेवारी महिना संपला की घामाच्या धारा वाहायला सुरुवात होते आणि अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु होतो. गेल्या वर्षी पक्षा यंदा जास्त उन्हाळा आहे, असे आपण दरवर्षी म्हणत असतो. मुंबईकर राज्यातील अन्य मंडळींच्या तुलनेत खूप सुखी. कारण अजून तरी येथील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले नाही. नाशिक, जळगाव, धुळे, भुसावळ, नागपूर आणि राज्याच्या अन्य भागात एप्रिल महिन्यातच तापमापकाने ४० चा पारा पार केला आहे. भुसावळ येथे तर ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. आत्ता ही अवस्था तर ऐन मे महिन्यात काय होईल
ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा नाश, झाडांची कत्तल, डोंगर, टेकड्या यांना भुईसपाट करुन टाकणे, सर्वत्र उभे राहिलेले सिमेंट-क्रॉंक्रिटचे जंगल, डांबरी किंवा सिमेंट-क्रॉंक्रिटचे रस्ते, पेव्हर ब्लॉक या आणि अशा अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आजही एखाद्या खेडेगावात गेल्यानंतर दाट झाडांखाली आपण बसलो तर भर दुपारही सुसह्य होते याचा अनुभव आपण सर्वानानीच कधी ना कधी घेतला असेल. वड, पिपंळ, आंबा या सारखे जुने वृक्ष आपल्याला सावली आणि गारवा दोन्हीही देत असतात. पण शहरात मात्र ही सावली आणि गारवा आपल्याला अपवादानेच मिळतो.
अद्याप संपूर्ण मे महिना शिल्लक असून जून अर्धा किंवा संपूर्ण कोरडाच जाणार आहे. हल्ली सात जूनला पाऊस येतच नाही. आणि आला तरी हजेरी लावून गायब होतो. त्यामुळे पुन्हा अंगाची काहिली करणारा उन्हाळ्याला सामोरे जावे लागते. यंदा तर बदललेल्या हवामानामुळे ऐन चैत्र महिन्यांत राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाला. काही वर्षांपूर्वी किमान निसर्गाचे ऋतूचक्र तरी व्यवस्थित होते. आता तेही बिघडले आहे. माणसानेच ताळतंत्र सोडून वागायचे ठरवल्यावर निसर्गाने तरी का आपले वेळापत्रक पाळायचे. तो ही लहरीपणा करत असतो.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अगोदरच पाण्याची टंचाई असून यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रसंगी पाण्यावरुन माऱयामाऱया, दंगली होतील की काय असे वाटते. पाणीटंचाईच्या काळात सर्वानी पाणी जपून वापरावे, याचेही भान अनेकांना नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असतोच. शहरात काही टक्के पाणीकपात केली तर आपण शहरातील माणसे लगेच आरडाओरड करतो. पण खेडेगावातून, ज्या ठिकाणी पाण्याचे नळ थेट घरात आलेले नाहीत, तेथील लोकांचा विचार आपण कधी करतो का, तीच परिस्थिती वीजेच्या बाबतीत. शहरात वीज भारनियमन काही तासांचे आहे. पण ग्रामीण भागात ते बारा ते पंधरा तास आहे. तेथील लोकांचे काय हाल होत असतील.
पुढील मे महिन्यात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत. राज्यातील सत्ताधारी, राजकीय पक्ष, संघटना उत्साहात तो साजरा करतील. पण सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रात आपण खरोखरच सुखी आहोत का, शेतकरी आत्महत्या, वीज भारनियमन, तीव्र पाणी टंचाई, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आणि समस्या तशाच आहेत. नव्हे काही समस्यांचा तर भस्मासूर झाला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक, राजकीय नेते व राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत.
राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तरी तळागाळातील आणि हातावर पोट घेऊन जगणाऱया सर्वसामान्यांच्या किमान गरजा तरी पूर्ण होतील का, येत्या १ मे रोजी आपण महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करु पण तो दिन की दीन असेल, याचा आपण विचार करणार आहोत की नाही...
सुंदर ,,मस्त ...कडक
ReplyDelete