14 November 2010

मराठी अभिमान गीताचे मार्केटिंग

ठाणे येथे पुढील महिन्यात भऱणाऱया ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कौशल इनामदार यांने संगीत दिलेल्या मराठी अभिमान गीताने होणार आहे. हे अभिमान गीत म्हणजे ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांनी लिहिलेली कविता आहे. भट यांची लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी  ही कविता अनेक वर्षांपू्वीच प्रसिद्ध झालेली आहे. या कवितेलाच कौशल यांनी वेगळ्या पद्धतीने चाल लावून आणि अनेक गायकांकडून गाऊन घेऊन मराठी अभिमान गीत म्हणून लोकांपुढे आणले आहे.

खासगी एफएम वाहिन्यांवर मराठी गाणी वाजवली जात नाहीत. त्यामुळे कौशल इनामदार यांनी मराठी भाषेचे अभिमान गीत तयार केले. त्याचे चांगल्या प्रकारे मार्केटिंगही केले गेले. प्रसारमाध्यमानीही त्याला उचलून धरल्यामुळे त्याचा खूप बोलबाला झाला. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनीही कौशलचे आणि त्याच्या या अभिमान गीताचे कौतुक केले होते. मला प्रश्न पडतो की या पू्र्वी मराठी भाषा, महाराष्ट्र यांचा गौरव करणारी गाणी झाली नव्हती का, ही लिहिलेली गाणी लोकांच्या मनातून हद्दपार झाली आहेत का, आज ही गाणी कोणाला किंवा तरुण पिढीला आवडत नाही का, जर यांची उत्तर नाही अशी असतील तर कौशल इनामदार यांच्या  अभिमान गीताचे एवढे कौतुक कशासाठी.

राजा बढे यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेले जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले, शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केलेले आणि ज्योत्स्ना भोळे व स्नेहल भाटकर यांनी गायलेले बहु असोत सुंदर की संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा  ही दोन गाणी आजही प्रत्येकाच्या ओठावर आहेत.   किंवा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय राष्ट्र महान कोटी कोटी प्राणांतून उसळतो एक तुझा अभिमान हे गाणेही आजही लोकप्रिय आहे. हे गाणे चकोर आजगावकर यांनी लिहिलेले असून त्याचे संगीत श्रीनिवास खळे यांचे तर स्वर शाहीर साबळे यांचा आहे. राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हे गाणेही महाराष्ट्राचे अभिमान गीत होऊ शकते. याचे संगीत वसंत देसाई यांचे असून ते जयंवत कुलकर्णी यांनी गायले आहे. माधव ज्युलीयन यांची मराठी असे आमुची मायबोली हे गाणेही प्रत्येकाला आठवत असलेच

 सर्व सांगताना सुरेश भट यांचे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या कवितेला मला कमी लेखायचे नाही. अन्य महाराष्ट्र गाण्यांप्रमाणेच हे गाणेही लोकप्रिय असून त्याची यापूर्वीच कॅसेट, रेकॉर्डही निघालेली आहे. मला तर कौशल इनामदार यांनी आत्ता या गाण्याला जी चाल लावली आहे त्यापेक्षा याची जुनी चाल अधिक आवडते. त्यात जोश वाटतो.

साहित्य संमेलन आयोजकांना ठाण्यातील साहित्य संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीतानेच करायची होती तर कौशल इनामदारच्या पूर्वी झालेली महाराष्ट्र गीते किंवा सुरेश भट यांचे हे पूर्वीचे गाणे होतेच ना. मग पूर्वसुरींचे देणे असताना नव्या चालीतील हे गाणे ठेवायचा अट्टाहास का. काहीतरी वेगळे करतो आहोत, असे दाखवयाचे म्हणून की कौशल यांच्या या अभिमान गीताचा प्रसारमाध्यमातून बोलबाला झाला आहे म्हणून...

जुनी महाराष्ट्र गीते आणि कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले मराठी अभिमान गीत यांची तुलना केली असता मला जुनीच गाणी अधिक जोशपूर्ण वाटतात. अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. ही सर्व गाणी येथे ऐकण्यासाठी मी खाली काही लिंक दिल्या आहेत.

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणे
 http://www.video4viet.com/music.html?act=play&id=ca6fa56a73ae2b08b807176dc13bf6eb
येथे ऐकता येईल.

बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय आमुचा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=64cb53bc-0b5b-45cf-b5d7-7027bca3ebd6&title=Priya%20Amucha%20Ek%20Maharashtra%20Desh%20Ha.mp3
 येथे ऐकता येईल.

गोविंदाग्रज यांचे मंगलदेशा पवित्रदेशा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=e639491e-d529-4aeb-99a1-3b0e9d448248&title=12%20Mangal%20Desha%20Pavitra%20Desha%20Maharashtra%20Desha.wma येथे ऐकू शकाल.

आणि या सगळ्या गाण्यांनंतर कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले हे गाणे ऐका. http://www.youtube.com/watch?v=Txa_J7lPRhg

हे गाणे ऐकल्यानंतर/ पाहिल्यानंतर आता तुम्हीच ठरवा जुनी महाराष्ट्र गाणी की हे गाणे अधिक प्रभावी आणि जोशपूर्ण वाटते.








  

2 comments:

  1. जुनी गाणी चांगलीच आहेत. पण तुम्हाला केवळ आवडलेली नाही म्हणून तुम्ही कौशल इनामदारांचं कार्य कमी का लेखताय? कौशल इनामदार यांची चाल अनेक लोकांना आवडतेय हे सत्य तुम्ही का नजरेआड करताय? अभिमानगीताच्या प्रकाशनसोहळ्याला मी हजर होते. कौशलने केलेल्या कामाची जादू मी याची देही याची डोळा अनुभवली आहे. ८००० लोक त्यादिवशी त्या गाण्याने मंत्रमुग्ध झालेले मी पाहिलेत. गाणं संपलं तेव्हां सगळ्यांचे कंठ दाटून आले होते, डोळे पाणावले होते. आणि मग आख्खा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे आपल्या पायांवर उभा राहिला आणि टाळ्यांच्या कडकडाटात या गीताचं स्वागत केलं. भाषेचा अभिमान वाटत होता. कौशल इनामदार यांनी दीड वर्ष अथक मेहनत करून हे अतिशय सुरेल, गोड गाणं केलं.माझ्या सारख्या इतर अनेक तरूण पिढीतल्या संगीताच्या चाहत्यांनी आणि मराठीच्या अभिमानी लोकांनी या गाण्याचं स्वागत केलं आहे कारण ते आम्हाला मनापासून आवडलं आहे. कुणाच्याही कामाला कमी लेखणं हे सोपंच असतं - विशेषत: "मर्केटिंग"चं वगरे नाव देऊन. पण मराठी अभिमानगीत शेकडो, कोट्यावधी लोकांवर मोहिनी घालतंय, ही बाब तितकीच खरी आहे. मी स्वत: सृजनाला टीकेपेक्षा वरचं स्थान देईन!

    आसावरी

    ReplyDelete
  2. कौशल इनामदार यांच्या अभिमान गीताला कमी लेखायचा प्रश्न नाही. लेखात म्हटल्याप्रमाणे या गाण्याविषयी मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. मला या गाण्याची चाल आवडलेली नाही आणि म्हणूनच मी लिहिताना अर्थात याविषयी प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते असे स्पष्ट म्हटले आहे. असो. आपण लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete