मराठी साहित्य आणि ग्रंथव्यवहारात ११७ वर्षांचा वारसा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहाय, ठाणे यांनी दुर्मिळ ग्रंथांच्या खजिन्याची जपणूक केली आहे. संस्थेकडे आज सुमारे एक हजार २०० दुर्मिळ ग्रंथ आहेत. ‘प्रेस अॅक्ट’ कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी (१८६७) प्रकाशित झालेले विविध विषयांवरील ग्रंथ संस्थेकडे आहेत.संस्थेकडे असलेला हा पुस्तकांचा खजिना अत्यंत दुर्मिळ असून, त्याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातून अभ्यासक आणि विद्यार्थी ठाण्यात येत असतात. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य अभ्यासकांना घरी नेता येत नाहीत.
संस्थेकडे असलेल्या या दुर्मिळ पुस्तकांच्या खजिन्यात कादंबरी या गटातील पुस्तके कमी आहेत. सर्वाधिक पुस्तके इतिहास, गणित, ज्योतिष, भूमिती, बीजगणित, मराठी भाषा, व्याकरण, शेती, धर्म, पौराणिक आदी विषयांची आहेत.
ग्रंथसंग्रहालयाकडे असलेल्या खजिन्यात ‘मराठय़ांची खबर’ (१८२९), हिंदुस्थानचा विकास-बाळगंगाधर शास्त्री जांभेकर (१८४६), बाळाजी जर्नादन भानू ऊर्फ नाना फडणीस यांची बखर-मॅग्लोनल्ड (१८२७), दशम स्कंधाच्या आर्या, अथ विराट पर्व आर्या-मोरोपंत (१८४० व १८४८), अशौच विचार-बाळकृष्ण भिकाजी राजवाडे (१८४१), मराठी भाषेचे व्याकरण-दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८३६), मराठी भाषेचे व्याकरण-शास्त्री फडके (१८५०) या आणि अन्य अनेक पुस्तकांचा समावेश आहे.
ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष पां. के. दातार यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले की, संस्थेकडे असे दुर्मिळ सुमारे एक हजार २०० ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथांची आम्ही झेरॉक्स प्रत तयार केली आहे. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य कोणाला वाचण्यासाठी घरी देत नाही. ज्यांना हा ग्रंथ पाहायचा आहे, त्याला आम्ही त्याची झेरॉक्स प्रत उपलब्ध करून देतो. तीसुद्धा अभ्यासकाने ग्रंथालयात बसूनच वाचायची आम्ही वाचकाला परवानगी देतो.
संस्थेकडे असलेले सर्व ग्रंथ योग्य पद्धतीने जतन करायचे आहेत. अत्याधुनिक पद्धतीने हे काम करण्याचा विचार आहे. अर्थात त्यासाठी खर्चही खूप आहे. त्यामुळे सध्या तरी जमेल तसे हे काम आम्ही करत असल्याचेही दातार म्हणाले.
पां. के. दातार यांचा संपर्क ०९८३३६१२८४७
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे दूरध्वनी संपर्क
०२२-२५४०६७८७/२५४४२२५१
ई-मेल info@mgst.in
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाली आहे.)
No comments:
Post a Comment