11 April 2012

मराठी साहित्याला लाभले चित्रपटांचे कोंदण

मराठी वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड होत असतानाच मराठी साहित्यावर आधारित मराठी चित्रपटांना मात्र चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सकस आणि सशक्त अशा उत्तमोत्तम कथा, कादंबरी यावर चित्रपट निर्मिती करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘शाळा’ हा मराठी चित्रपट त्याचे ताजे उदाहरण ठरावे. 


मराठी साहित्य समृद्ध असून त्यात मराठी न समजणाऱ्या व्यक्तींच्याही काळजाला भिडण्याची ताकद आहे. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट तयार केला आणि भाषाभेदांच्या िभती ओलांडून या चित्रपटाने मराठीला राष्ट्रीयस्तरावर पहिले सुवणपदक मिळवून दिले. ज्येष्ठ साहित्यिक य. गो. जोशी, गो. नी. दांडेकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, वसंत सबनीस आदींच्याही कथा/कादंबऱ्यांवर चित्रपट झाले. मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा प्रवास त्यानंतरही असाच पुढे सुरू राहिला.



मराठीतील पहिला राजकीय आणि ‘मल्टिस्टारकास्ट’ म्हणता येईल, असा ‘सिंहासन’ हा चित्रपट अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यांवर आधारित होता. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट, रत्नाकर मतकरी यांच्या ‘जौळ’ कादंबरीवर आधारित ‘माझं घर माझा संसार’, बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शेलारखिंड’ या कादंबरीवर आधारित ‘सर्जा’, जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट ही काही निवडक उदाहरणे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘गोळाबेरीज’ आणि मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवरील याच नावाच्या चित्रपट हे साहित्यावर आधारित चित्रपटांचे अगदी अलीकडचे प्रयत्न म्हणता येतील.



या निमित्ताने मराठीतील उत्तमोत्तम साहित्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकांपुढे येत असून साहित्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाचकांकडूनही त्या पुस्तकाला चांगली मागणी येत आहे. काही वाचक त्या पुस्तकाकडे वळत आहेत. मराठी साहित्यासाठी ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.



दरम्यान, उत्तम बंडू तुपे यांच्या ‘भस्म’ आणि रमेश उद्राटकर यांच्या ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबऱ्यांवर निर्माण झालेल्या याच नावाच्या चित्रपटांचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार होत असले तरी मराठी साहित्यावर आधारित चित्रपटांची आता लाट येईल, असे मला वाटत नाही. एक मात्र नक्की की मराठी साहित्याची आवड आणि आस्था असलेले निर्माते-दिग्दर्शक अशा प्रकारचे चित्रपट तयार करण्याचे धाडस करताहेत, तसेच आजच्या पिढीतील तरुण निर्माते-दिग्दर्शक अशा ‘सिनेमॅटिक’ मराठी साहित्याचा शोध घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.



साहित्यावर आधारित चित्रपट/मराठी कादंबरी
श्वास- कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या कथेवर आधारित
नटरंग- डॉ. आनंद यादव यांच्या ‘नटरंग’वर आधारित
घर गंगेच्या काठी- ज्योत्स्ना देवधर यांची कादंबरी
बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकावर आधारित
पांगिरा- विश्वास पाटील यांच्या ‘पांगिरा’वर आधारित



आगामी
व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’वर आधारित श्री पार्टनर
डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर आधारित चरित्रपट
योगीराज बागुल लिखित पुस्तकावर आधारित विठाभाऊ नारायणगावकर यांच्यावरील चित्रपट ‘विठा’

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १० एप्रिल २०१२ च्या अंकात पान क्रमांक चार वर प्रसिद्ध झाली आहे) 

No comments:

Post a Comment