09 April 2012

अनुवाद अकादमीला साडेसाती

मुंबईत रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच विधिमंडळात केली. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र ही घोषणा मराठी साहित्य अनुवाद अकादमीच्या घोषणेप्रमाणे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात न राहो’, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.


ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये पोहोचविण्यासाठी साहित्यविषयक संस्थांनी योजना सादर केली तर त्याला राज्य शासनाकडून जरुर मदत केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र त्या वेळी चव्हाण यांना त्यांचेच एक ‘आदर्श’सहकारी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याच विषयी केलेल्या घोषणेचा आणि त्याच्या पूर्ततेचा विसर पडला असल्याची प्रतिक्रिया त्या वेळी साहित्य रसिकांमध्ये उमटली होती. 

मार्च २००५ मध्ये मुंबईत झालेल्या राज्य ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळ्यात तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चव्हाण हे मुख्यमंत्रीही झाले. पण मराठी साहित्य अनुवाद अकादमी अद्याप स्थापन झालेली नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही काही वर्षांपूर्वी राज्य शासनाला मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके भारतातील अन्य प्रादेशिक भाषेत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावरही अद्याप अनुवाद अकादमी स्थापनेच्या स्वरूपात   कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान या संदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, केवळ मराठीतील कथा, कादंबरी नव्हे तर विविध क्षेत्रात (माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान वगैरे) जे लेखन होते ते मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे निवेदन आम्ही तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सादर केले होते. त्यावरही पुढे काही झालेले नाही. राज्य मराठी विकास संस्था आणि राज्य साहित्य-संस्कृती महामंडळ यांचे काम एकच आहे, असे गृहीत धरून त्यांचे विलिनीकरण करणाऱ्या राज्य शासनाकडून मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन न होणे हे मराठी भाषा-संस्कृतीविषयी असलेल्या शासकीय अनास्थेला सुसंगत असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई च्या मुख्य अंकात (९ एप्रिल २०१२)च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)

No comments:

Post a Comment