गीतगणेश-६
मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठय़ा कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. एवढेच नव्हे तर अनेक वर्षांनंतरही आजही अशी गाणी लोकप्रिय असून त्या गाण्यांवर रसिकांचे पाय थिरकायला लागतात. पहाडी आवाजासह गाण्याच्या वेगळ्या शैलीमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली.
‘ऐका सत्यनारायणाची कथा’, पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी’ आणि शिंदे यांची इतर गाणीही सार्वजनिक उत्सवांमध्ये हमखास वाजविली जातात. विशेषत: ग्रामीण भागांत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी हमखास वाजतातच. आजच्या ‘गीतगणेश’ मध्ये शिंदे यांनी गायलेल्या ‘तूच सुखकर्ता, तूच द:ुखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे’ या गाण्याविषयी. हे गीत हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे. त्याचे संगीत मधुकर पाठक यांचे असून ते गायले आहे, अर्थातच प्रल्हाद शिंदे यांनी.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडपांमधून किंवा गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या वेळी बॅण्ड, ढोल-ताशा किंवा डिजेंकडून वाजविल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यांचा समावेश असतो. अनेक वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्ताच्या मनातील भावना गीतकार हरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.
गाण्यात कठीण शब्द अजिबात नाहीत. सर्वसामान्यांचे जगणे, ते करत असलेली गणपती बाप्पाची भक्ती आणि गरिबांची व्यथा, त्यांच्या मनातील संवेदना जाधव यांनी या गाण्यातून व्यक्त केली आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा गणपतीचा भक्त त्याची व्यथा गणपतीकडे मांडतो आहे आणि हाच गणपती बाप्पा आपल्याला सुखाचे दिवस नक्की दाखवेल, असा आशावादही त्याच्या मनातून व्यक्त होत आहे.
‘तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता’ हे लोकगीत असून लोकगीतामध्ये असलेला विशिष्ट संगीताचा ठेका, उडती चाल आणि गाणे ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपल्याही नकळत ताल धरायला लागणारी आपली पावले हे यश संगीतकार मधुकर पाठक आणि आपल्या पहाडी आवाजाने या गाण्याला लोकप्रिय करणारे प्रल्हाद शिंदे यांचे आहे.
हे संपूर्ण गाणे असे
तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा ।।ध्रु।।
पाहा पुरे झाले हो एक वर्ष, वर्षाने होतो एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणूनी परामर्ष
पुऱय़ा वर्षाची. साऱया दुखाची, वाचावी कशी ही गाथा ।।१।।
पाहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ
गुळ, फुटाणे, खोबरं नी केळ, साऱया प्रसादाची केली भेळ
कर रक्षण आणि भक्षण, तूच पिता आणि तूच माता ।।२।।
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱया घराचे, कधी येतील दिवस सुखाचे
सेवा जाणूनी, गोड मानुनी, द्यावा आशिर्वाद आता ।।३।।
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १८ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)
माझ्या आठवणीप्रमाणे आशालता वाबगांवकर यानी एका नाटकात
ReplyDeleteगणेशवंदना गायली आहे.
अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी गायलेले तू सुखकर्ता तू दुखहर्ता, विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया ही आरती खूप प्रसिद्ध आहे. आजही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात ही आरती लावली जाते. दोन वर्षांपूर्वी (२००८) मध्ये गणेशोत्सवातच मी आशालता वाबगावकर यांच्याशी बोलून त्याविषयी सविस्तर लिहिले होते.
ReplyDelete