आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये गणपतीविषयक गाण्यांचा आढावा घेणारी गीतगणेश ही लेखमालिका सुरू झाली आहे. ११ सप्टेंबरच्या मुंबई वृत्तान्तात त्याचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. तो भाग आजच्या ब्लॉगवर मी देत आहे.
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाचे वर्णन व गुणगान पौराणिक काळापासून विविध प्रकारे करण्यात येत आहे. वेद, उपनिषदे, शहिरी काव्य, संतसाहित्य ते अगदी चित्रपटगीते, सुगम संगीत आणि भक्तीसंगीतातून गणेशाचा महिमा कथन करण्यात आला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठीतील गणेशगीतांचा हा आढावा..
गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी गणपतीवरील नव्या आणि जुन्या कॅसेट्स, सीडीज् बाजारात विक्रीसाठी येत असतात. गणपती ही प्राचीन देवता असून वेद, उपनिषदांतूनही गणपतीचे गुणगान करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतानाही गणेशस्तुती केली आहे. त्याचप्रमाणे विविध शाहीर, कवी, गीतकार यांनीही गणपती या दैवतावर काव्यरचना केली आहे. आज सुमारे तीनशे वर्षांनंतरही गणपतीवरील एक रचना लोकप्रिय असून गणेशोत्सवात किंवा घरातील कोणत्याही पूजेच्यावेळी सर्वप्रथम तीच म्हटली जाते. ही रचना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली असून ती गणपतीची लोकप्रिय आरती आहे. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची’ या आरतीला गणेशोत्सवात तसेच कोणत्याही मंगलप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेतही अग्रमान मिळालेला आहे.
समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. या आरतीची तीन कडवी सर्वत्र म्हटली जात असून ती अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाना तोंडपाठ आहेत. रामदास स्वामी यांनी या आरतीत गणपतीचे वर्णन केले असून शब्दरचना सोपी आहे. हे गणेशा केवळ तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगताना समर्थानी ‘जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामना पूर्ती’ असे म्हटले आहे.
आरतीच्या शेवटी रामदास स्वामी यांनी आपले नाव गुंफले असून ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ असे सांगून त्याच्याकडे ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ अशी आळवणीही केली आहे. रामदास स्वामी यांची रचलेली ही आरती अनेक घरांमधून पारंपरिक चालीत म्हटली जाते. रामदास स्वामी यांची ही रचना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अजरामर केली असून या आरतीची लोकप्रियता आजच्या काळातही कमी झालेली नाही. प्रासादिक शब्दरचना असलेली ही आरती लता मंगेशकर यांनी तितक्याच प्रभावीपणे आपल्या स्वरातून सादर केली आहे.
गणेशोत्सव आणि लतादिदींच्या आवाजातील ही आरती यांचे अतूट नाते तयार झाले आहे. या आरतीच्या शेवटी मंत्रपुष्पांजली असून ती गायक-संगीतकार यशवंत देव यांनी म्हटली आहे. स्वच्छ, स्पष्ट, शब्दोच्चार आणि आवाजातील भारदस्तपणाने आरतीबरोबरच मंत्रपुष्पांजलीही रसिकांच्या आणि भक्तांच्या मनात घर करून राहिली आहे.
No comments:
Post a Comment