अनंत चतुर्दशीनंतर असलेली पौर्णिमा संपली की त्या दिवसापासून सुरू होणारा पंधरवडा हा ‘पितृपंधरवडा’ म्हणून ओळखला जातो. पंचागानुसार सांगायचे झाले तर भाद्रपद महिन्यातील भाद्रपद कृष्ण एक ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून पाळण्यात येतो.
पितृपंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा, त्यांची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवडा मानण्यात येतो. गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणारा पितृपंधरवडा हा काही जणांच्या दृष्टीने शुभकार्यासाठी निषिद्ध मानण्यात येतो. त्यामुळे या पंधरा दिवसांत कोणतेही शुभकार्य, नवीन खरेदी, लग्न जुळविणे, गृहखरेदी इत्यादी कामे केली जात नाहीत.
गणेशोत्सवकाळात किंवा पितृपंधरवडा संपल्यानंतर सुरू होणारा नवरात्रौत्सव, दसरा किंवा दिवाळीत व्यापारी, दुकानदार यांच्यादृष्टीने ‘खरेदीचा सीझन’ तेजीत असतो. या दिवसात बाजारपेठेत अक्षरश: कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. तर पितृपंधरवडय़ाचा कालावधी नवीन खरेदी आणि व्यापाऱ्यांसाठी मंदीचा काळ समजला जातो.
धार्मिक ग्रंथांत दिलेल्या माहितीनुसार आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता किंवा आदर व्यक्त करण्याच्या या दिवसांना पितृपंधरवडा किंवा श्राद्धपक्ष असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी २४ सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू झाला असून तो ७ ऑक्टोबपर्यंत आहे. ७ ऑक्टोबर रोजी भाद्रपद अमावास्या असून ती सर्वपित्री अमावास्या म्हणूनही ओळखली जाते.
कोणाला पितृपंधरवडय़ात पूर्वजांचे स्मरण करण्यास जमले नाही, या काळात श्राद्ध करता आले नाही तर किमान शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येला तरी ते केले जावे, असे मानले जाते. पितृपंधरवडय़ात ज्या तिथीला व्यक्ती निधन पावली असेल त्या तिथीला श्राद्ध, तर्पण असे विधी केले जातात. जेवणाचे ताट कावळ्यासाठी ठेवले जाते. कावळ्याच्या रुपाने ते आपल्या पितरांना पोहोचते, अशी समजूत आहे.
पितृपंधरवडय़ात आपल्या पितरांचे स्मरण आणि पूजन केले तर त्यांना गती मिळते, ते संतुष्ट होतात अशी सर्वसामान्यांची श्रद्धा आहे. या काळात आपले पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांकडे येत असतात. त्यामुळे या दिवसांत ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध, तर्पण केले तर आपले पितर सुखी होतात, आपल्या कुटुंबियांनी आपली आठवण ठेवली आहे, हे पाहून त्यांना आनंद होतो, अशी पूर्वापार समजूत हिंदू धर्मात आहे. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपंधरवडय़ाला खूप महत्त्व आहे.
पितृपंधरवडय़ाच्या काळात भाद्रपद कृष्ण नवमी ही अविधवा नवमी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद त्रयोदशी / चतुर्दशी या दिवशी शस्त्राने मरण पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. या कालावधीत निधन पावलेल्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध, तर्पण केले जाते.
रुढी-परंपरेचा पगडा असणारी किंवा हे केल्याने आपले काही नुकसान तर होणार नाही ना, मग परंपरेने जे सांगितले आहे, ते केले तर काय बिघडले? असे मानणाराही मोठा वर्ग समाजात आहे. तो कोणत्याही एका विशिष्ट जातीचा नाही. हिंदू धर्मातील बहुतेक प्रत्येक जातीमध्ये त्यांच्या परंपरेनुसार पितृपंधरवडय़ात पितरांचे स्मरण केले जाते. तर काही मंडळींचा या गोष्टींवर विश्वास नसतो. त्यांच्या दृष्टीने हे सर्व थोतांड असून काही मूठभर मंडळींनी धर्माच्या नावावर पैसे कमाविण्यासाठी निर्माण केलेल्या रूढी व परंपरा असल्याचेही त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे ही मंडळी कोणताही धार्मिक विधी किंवा कर्मकांड न करता आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने समाजातील स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशांच्या, कपडय़ांच्या स्वरूपात मदत करतात.
समाज कितीही पुढारला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी धार्मिक रूढी आणि परंपरांचा पगडा जोपर्यंत आपल्या समाजावर आहे तोपर्यंत पितृपंधरवडा पाळला जाणार. फक्त त्यात काळानुरूप काही बदल होत जातील हे नक्की.
(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २५ सप्टेंबर २०१० च्या अंकात पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे)
wa wa.... chaan ch mahiti ahe....
ReplyDelete