11 September 2011

श्लोक गणेश-९ स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम्

लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अष्टविनायक स्थानांची नावे असलेला श्लोक घेतला आहे.  महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांप्रमाणेच गणपतीची ही आठ स्वयंभू स्थाने प्रसिद्ध आहेत. भाविक आणि गणेशभक्त अष्टविनायकाची ही यात्रा नेमाने करत असतात. या आठ स्थानांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्य़ात (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री), दोन रायगड जिल्ह्य़ात (महड व पाली)आणि एक अहमदनगर (सिद्धटेक) जिल्ह्य़ात आहे. अष्टविनायक स्थानातील प्रत्येक गणपती स्वतंत्र नावाने ओळखला जातो. अष्टविनायकातील पहिला गणपती हा मोरगावचा ‘मयुरेश्वर’ आहे. थेऊरचा दुसरा गणपती हा  ‘चिंतामणी’, सिद्धटेकचा तिसरा गणपती ‘सिद्धिविनायक’, रांजणगावचा चौथा गणपती ‘महागणपती’, ओझरचा पाचवा गणपती हा ‘विघ्नेश्वर’ या नावाने भक्तांमध्ये परिचित आहे. सहावा गणपती हा लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मक’म्हणून, महडचा सातवा गणपती ‘वरदविनायक’ आणि शेवटचा पाली येथील आठवा गणपती ‘बल्लाळेश्वर’ नावाने माहितीचा आहे.  अष्टविनायकांतील सर्व स्थानांचे वर्णन करणारा श्लोक आपल्या सर्वाच्या परिचयाचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात किंवा घरोघरीही आरतीनंतर हा श्लोक म्हटला जातो. अभिनेता-दिग्दर्शक सचिन यांचे वडील शरद पिळगावकर यांच्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटाच्या अखेरीस या सर्व अष्टविनायकांचे दर्शन घडविणारे गाणे आहे. हे गीत जगदीश खेबूडकर यांचे असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. या गाण्यातील प्रत्येक कडव्याला मराठीतील आघाडीच्या गायकांनी आपला आवाज दिला असून मराठीतील अनेक अभिनेते-अभिनेत्री यांच्यावर यातील प्रत्येक कडवे चित्रित करण्यात आले आहे. आज इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या गाण्याच्या सुरुवातीला अष्टविनायकातील सर्व गणपतींची नावे गुंफलेला
स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम्  मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्
हा प्रसिद्ध श्लोक आहे. हा श्लोक संस्कृत भाषेतील असून या रचनेला ‘अष्टक’ रचना असे म्हणतात. गणपतीचा हा श्लोक आपण लग्नकार्यात वर्षांनुवर्षे ‘मंगलाष्टक’ म्हणून ऐकत आणि म्हणत आलो आहोत.  या श्लोकाचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे हा श्लोक केवळ विशेष नामांनी तयार झाला आहे. श्लोकाच्या अखेरीस सर्व काही मंगलमय होवो, एवढी एकच ओळ येते. संपूर्ण श्लोकात अष्टविनायक स्थाने आणि नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. आरतीनंतर हा श्लोक किंवा अष्टविनायकाच्या या स्थानांच्या प्रत्येक गणपतीचे नाव घेऊन त्याचा गजर केला जातो. 

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई रविवार वृत्तान्तमध्ये ११ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181463:2011-09-10-17-01-26&catid=41:2009-07-15-03-58-1

No comments:

Post a Comment