14 September 2011

आठवणींचा आल्बम

ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांना प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी वाहिलेली श्रद्धांजली आठवणींचा आल्बम
माझी  ही बातमी लोकसत्ता- १४ सप्टेंबर २०११ च्या मुख्य अंकात पान २ वर प्रसिद्ध झाली आहे. 
------
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित ते काजोल आणि अन्य ‘तारांगणा’बरोबरच लष्करी शिस्तीचे सॅम माणकेशा, भारतातील विमान उद्योगाचे जनक जे. आर. डी.टाटा, उद्योगपती रतन टाटा, क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर ते कला, उद्योग, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे खरे तर अशा मान्यवरांचे व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव आणि साक्षात ती व्यक्ती छायाचित्रातून उलगडणारे ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष आज आपल्यात नाहीत, यावर खरेतर विश्वासच बसत नाही.
गेल्या तीन दशकात छायाचित्रण, लेखनात त्यांनी केलेली मुशाफिरी आणि छायाचित्रण कलेत केलेले काम विसरता येणे शक्य नाही. माझ्यासाठी ते श्रद्धास्थान होते. मी त्यांच्याकडे पाहूनच छायाचित्रकार झालो. छायाचित्रण कलेच्या पलिकडेही ते माणूस म्हणून खूप मोठे होते. माझे भाग्य की मला त्यांच्या सहवासात खूप काळ घालवता आला. गौतम राजाध्यक्ष हे छायाचित्रण कलेतील माझे आदर्श होते. मोठे झाल्यावर ‘गौतम राजाध्यक्ष’ व्हायचे, असे मी मनाशी ठरवले होते.
आमीर खान याचा ‘बाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी नवखा होतो. छायाचित्रणाला नुकतीच सुरुवात केली होती. या चित्रपटात आमीर खानवर स्त्री वेषात एक गाणे चित्रित करण्यात आले होते. त्या गाण्याचे करण्यात आलेले चित्रिकरण पाहण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी मी पहिल्यांदा त्यांना पाहिले. त्यांना पाहून मी भारावून गेलो होतो. या प्रसंगानंतर माझी आणि त्यांची दोन-चार वेळा भेट झाली. आमचा परिचय वाढला. मी काढलेली छायाचित्रे घेऊन त्यांना दाखवायला त्यांच्या घरी जायचो. छायाचित्रे पाहून ते त्यांचे स्पष्ट मत व्यक्त करत असत. छायाचित्रे आवडली तर मनापासून कौतूक करायचे आणि आवडली नाहीत तर ते सुद्धा सांगायचे.
गौतम राजाध्यक्ष यांच्या छायाचित्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या छायाचित्रात साधेपणा होता. त्यांच्या छायाचित्रांत कोणतेही ‘गिमिक्स’ नसायचे.त्यांनी काढलेल्या छायाचित्रातून ती व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव अलगद उमटायचा. कोणतेही गिमिक्स न करताही चांगले छायाचित्र कसे काढायचे, हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांच्यासमोर खुलतात कसे? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण त्यांचे व्यक्तिमत्वच असे होते की ते त्यांच्यासमोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तिला आपलेसे करायचे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती त्यांच्यापुढे खुलायची. ‘शब्देविणू संवादू’ अशी त्यांची खासियत होती. त्यांची छायाचित्रे साधी असूनही ती खूप बोलकी होती. ते ही डिजिटल कॅमेऱ्यावर छायाचित्रे काढायचे. पण त्यातही आपले वेगळेपण त्यांनी शेवटपर्यंत जपले.
अन्य क्षेत्रातील एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेली तर त्या व्यक्तिचा वारसा पुढे चालवला जातो. पण छायाचित्रण हा असा एक व्यवसाय आहे की, राजाध्यक्ष यांच्याबरोबरच ती कला आता संपली आहे. त्यांनी काढलेल्या छायाचित्रातून ते आपल्या सदैव बरोबर असतील आणि स्मरणातही राहतील. पण आता त्यांनी काढलेली छायाचित्रे आपल्याला पाहता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. लवकरच ते माझा नवा स्टडिओ पाहण्यासाठी येणार होते. पण त्यांच्या अचानक जाण्याने आता ते कधीच घडू शकणार नाही आणि ही खंत माझ्या कायम मनात राहील..
(शब्दांकन-शेखर जोशी)

या बातमीची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181838:2011-09-13-17-01-49&catid=212:2009-08-18-16-27-

No comments:

Post a Comment