25 May 2012

नकोसा उन्हाळा
तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील हे खरे असले तरी बहुतांश मंडळी हिवाळा आणि पावसाळा हेच उत्तर देतील. अगदी नक्की. आम्हाला उन्हाळा आवडतो, असे सांगणारी अगदी कमी मंडळी असतील. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा काढणारा, जीवाची तगमग करणारा, सगळीकडे रखरखीतपणा आणणारा हा उन्हाळा अगदी नकोसा होतो.
उन्हाळा संपून कधी एकदा पावसाळा सुरू होतो, याचे वेध आपल्याला एप्रिल महिन्यापासूनच लागतात. पावसाला सुरुवात झाली की रखरखीत झालेल्या वातावरणात एकदम बदल होतो. तप्त झालेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडतो, तेव्हा येणारा मातीचा सुगंध मन धुंद करून टाकतो. असं वाटतं की हा वास आपल्या श्वासात भरून घ्यावा किंवा कोणीतरी संशोधन करून पहिल्या पावसानंतर येणाऱया सुगंधाचं परफ्युम/अत्तर तयार करावे.
मे महिन्याच्या शेवटापासून पावसाचे वेध लागायला सुरुवात होते. आकाशात मळभ दाटून आलेले असते. उन-सावलीचा खेळ सुरू झालेला असतो आणि एकदाचा पाऊस सुरू होतो.
बघता बघता पावसाळा संपतो आणि थंडीचे दिवस सुरू होतात. पावसाळा संपून थंडी सुरू होण्यापूर्वीही वातावरणात आल्हाददायक बदल होतो. मोकळी शेते किंवा जमीन असेल तर वाऱयाच्या लहरींबरोबर एक वेगळा सुगंध आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. ही थंडी सुरू होण्याची चाहूल असते. थंडी हा ऋतू खरोखरच एकदम मस्त आहे. वातावरणात सुखद बदल झालेला असतो. बघा ना, उन्हाळ्यात आपल्याला कधी कधी एकदम गळून गेल्यासारखे वाटते, काम करण्याचा उत्साह नसतो, तसे थंडीचे नाही. झक्कास वातावरण असते. थंडी सुरू झाली की ती संपूच नये असे वाटते.
पण फेब्रुवारीच्या मध्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. आता पावसाला सुरुवात होईपर्यंत अशाच घामाच्या धारा आणि अंगाची काहिली होत राहणार, याची आपण मनाशी खुणगाठ बांधतो. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसातील तापमान वाढता वाढता वाढे असेच होत चालले असून अमूक ठिकामी तापामापकाने ४९ अंशाचा तर तमूक ठिकाणी पन्नाशी गाठली अशा बातम्या वाचायला मिळतात. ज्या ठिकाणी इतके तापमान जात असेल, तेथील लोकांचे काय हाल होत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांना आगीच्या ज्वाळांत वेढलो गेलोय, अशा पद्धतीने हा उन्हाळा भाजून काढत असतो.
गंमत म्हणजे उन्हाळा संपून आपण पावसाळा कधी सुरू होतोय त्याची तसेच पावसाळा संपून हिवाळा कधी सुरू होतोय, त्याची आतुरतेने वाट पाहात असतो. पण हिवाळा संपून कधी एकदाचा उन्हाळा सुरू होतोय, असे आपण चुकुनही म्हणत नाही.
एकूणच आपल्या सर्वांचा उन्हाळा हा नावडता आहे, तसाच तो कवी, गीतकार, लेखक यांचाही आहे. जरा आठवून पाहा. पाऊस, थंडी, वारा, चंद्र, चांदणे, गारवा, ढग याविषयी मराठी किंवा हिंदीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा किंवा उन या विषयी खूपच कमी आहेत. कविता किंवा लेखनातून उन्हाळ्यामुळे सगळीकडे झालेला रखरखीतपणा, सुकून गेलेली झाडे व धरती, शेतात पेरणी करण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी याचे वर्णन आलेले आहे. पण थंडी किंवा पाऊस जसा गुलाबीपणे रंगवलेला आहे तसे उन्हाळ्याबाबत झालेले नाही. असो.
पण असे असले तरी माणसाचे मन कसे असते पाहा. अंगाची काहिली करणारा उन्हाळा नकोसा होतो, आणि पावसाला कधी एकदा सुरुवात होते, असे वाटते. धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली की सगळीकडे होणारा चिखल, ओलेपण, सूर्याचे न घडणारे दर्शन यामुळे कधी कधी कधी एकदाचा पाऊस संपतोय, असेही मनाला वाटून जाते. थंडी मात्र हवीहवीशी आणि संपूच नये असे वाटते.
त्यामुळे उन्हाळा हा नकोसा वाटत असला आणि फक्त थंडी व पावसाळा हेच दोन ऋतू असावेत, असे वाटत असले तरी निसर्गचक्रानुसार हा प्रत्येक ऋतू वेळेवर सुरू होणे व संपणे गरजेचे असते. कारण निसर्गाने तशी योजना केलेली आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ऋतूचक्र पार बदलून गेले आहे. त्याला आपण माणसेच कारणीभूत आहोत. निसर्गाचा विनाश आणि पर्यावरणाची पार वाट लावल्यामुळे पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतही राहतो आणि थंडी मार्चपर्यंत पडते. तर जून संपून जुलै उजाडला तरी पाऊस सुरू होत नाही. अत्याधुनिक जीवनशैली, प्रगती आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरण पर्यायाने निसर्गाचा केलेला विनाश, नष्ट केलेली झाडे, डोंगर, प्रदुषित केलेल्या नद्या, तलाव, समुद्र यामुळे कोणकोणत्या समस्या समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि भविष्यात भेडसावणार आहेत हे आपण पाहतोय, आपल्याला सर्व काही कळतय पण वळत मात्र नाही हे आपले आणि भावी पिढीचेही दुर्देव...
(माझा हा मजकूर लोकसत्ता ब्लॉगवर २४ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228556:2012-05-24-12-57-03&catid=235:2009-09-14-09-37-24&Itemid=235

No comments:

Post a Comment