छायाचित्रण अर्थातच फोटोग्राफी ही एक कला असून त्याचा वापर किंवा उपयोग म्हटले तर स्वताच्या आनंदासाठी आणि पैसे मिळविण्यासाठीही करता येऊ शकतो. प्रसारमाध्यमात किंवा एखादा विषय घेऊन त्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अनेक छायाचित्रकार आहेत. वृत्तपत्रातील छायाचित्राबाबत असे म्हणतात की एखादी बातमी किंवा अग्रलेख जे शब्दात सांगू शकणार नाही ते एखादे छायाचित्र सांगू शकते. छायाचित्र हे खूप बोलके असते. त्यामुळे छायाचित्र एखादे जळजळीत वास्तव किंवा सामाजिक प्रश्न जितक्या ताकदीने मांडू शकते तितक्याच ताकदीने व्यक्तीविषयक किंवा अन्य प्रसंग चपखलपणे टिपू शकते. आज हे सांगायचे कारण म्हणजे केवळ छायाचित्र या विषयाला वाहिलेला एक ब्लॉग.
मराठीमध्ये आज विविध विषयांवर लेखन करणारे ब्लॉगर्स तयार झाले आहेत. ते नियिमतपणे ब्लॉगवर लेखन करत असतात. विलास आंबेकर यांनी मात्र आपल्या अभिव्यक्तीसाठी लेखनाऐवजी छायाचित्रांचे माध्यम निवडले आणि त्यांनी फक्त छायाचित्रे असलेला आपला ब्लॉग सुरु केला. आंबेकर हे एअर इंडियामध्ये इंजिनीअरिंग डिपार्टमेंटला व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. नोकरी सांभाळून त्यांनी आपला छायाचित्रणकलेचा छंद जोपासला आहे. हजारो विविध छायाचित्रे आज त्यांच्या संग्रहात आहेत. आपल्याकडे असलेल्या या छायाचित्रांचा खजिना त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांसाठी खुला केला आहे. एक्स्प्रेस डॉट ए मायनस थ्री डॉट कॉम या संकेतस्थळावर त्यांनी आपला ब्लॉग सुरु केला. जागतिक पातळीवर कोणीही या संकेतस्थळावर आपण काढलेली छायाचित्रे अपलोड करु शकतो. याहू किंवा गुगलप्रमाणे या संकेतस्थळाने जागा उपलब्ध करुन दिली आहे. हे संकेतस्थळ केवळ छायाचित्रांसाठीचे असून अन्य ब्लॉगप्रमाणे येथे कोणालाही छायाचित्रांसाठीचा आपला ब्लॉग सुरु करता येऊ शकतो.
१९७७ मध्ये आंबेकर एअर इंडियात एअरक्राफ्ट टेक्निशियन म्हणून नोकरीला लागले. एअर इंडियात नोकरीला लागल्यानंतरच त्यांच्या छायाचित्रण कलेला व छंदाला चांगला वाव मिळाला. एअर इंडियात असल्यामुळे परदेशातही त्यांना जाता आले. तेथेही त्यांनी भरपूर छायाचित्रे काढली. आंबेकर यांना मूळात हायकिंग व ट्रेकिंगची आवड होती. या आवडीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि भारतात विविध ठिकाणी त्यांचे जाणे झाले होतेच. या सर्व ठिकाणीही त्यांनी निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेला खजिना आपल्या कॅमेरात बंदिस्त केला. हायकिंग व ट्रेकिंगनंतर त्यांना बायकिंगही केले. मित्रांसमवेत मोटारबाईकवरुन त्यांनी मुंबई ते मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तरपूर्व भारत पालथा घातला. नुकताच त्यांनी कुटुंबीयांसमवेत लेह-लडाखचाही दौरा केला. या सर्व प्रवासात त्यांना खूप चांगली छायाचित्रे मिळाली. मित्र, परिचित, नातेवाईक यांच्याकडून त्यांच्या छायाचित्रांचेही कौतुक झाले. तुमच्याकडे असलेली ही सर्व छायाचित्रे लोकांना पाहण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना त्यांना अनेकांनी केली आणि त्यातूनच आंबेकर यांचा हा ब्लॉग तयार झाला आहे. आंबेकर यांच्याकडे सध्या डीएसएलआर ४०० डी हा कॅनन कंपनीचा कॅमेरा आहे. त्यांच्याकडे असलेली हजारो छायाचित्रे त्यांनी कॉम्प्युटरवर टाकली असून काही फोटोंच्या सीडीही तयार केल्या आहेत. २६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या अस्मानी संकटात त्यांच्या घरातही पाणी गेले आणि त्यात त्यांच्याकडील छायाचित्रांचा संग्रह, अनेक फोटो शब्दश पाण्यात गेला.
ऑक्टोबर महिन्यात आंबेकर यांनी ब्लॉग सुरु केला असून त्यावर दररोज एक नवीन छायाचित्र ब्लॉगला भेट देणाऱयांना पाहायला मिळते. निसर्ग, पर्यावरण, फुले, वाहतूक अशा विविध गटातील छायाचित्रे आंबेकर यांच्या ब्लॉगवर पाहायला मिळतात. छायाचित्राबाबतची थोडक्यात माहितीही ते कधी देतात. प्रत्येक फोटो काढताना आपण नेहमीच काहीतरी वेगळे टिपण्याचा प्रयत्न करतो. सुर्योदय किंवा सूर्यास्ताचे फोटो सगळेच काढतात पण त्यातही काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर फोटो अधिक चांगला होऊ शकतो. आंबेकर हे नुकतेच दिवेआगर, हरिहरेश्वर येथे गेले होते. समुद्रात मासेमारी करणाऱया कोळ्यांनी लावलेल्या जाळीला एका ठिकाणी काठी होती. त्यांनी ती काठी आणि सूर्य यांचा एकत्र आणले त्यामुळे काठीवर दिवा लावावा, असा सूर्य त्यांना टिपता आला. काही वर्षांपूर्वी ते माथेरान येथे गेले होते. तेथे पहाटेच्या वेळेस त्यांना आकाशात एकाच दिशेला चंद्र आणि सूर्य टिपता आले. कोणतेही छायाचित्र काढण्यासाठी आपल्याकडे संयम असला पाहिजे. तरच ते छायाचित्र उत्कृष्ट निघू शकते. तसेच हातात कॅमेरा आहे म्हणून वाटेल तसे फोटो न काढता त्यात वेगळेपण कसे येईल, ते पाहावे, व्यक्तींचे फोटो काढताना ते पोझ देऊन काढण्यापेक्षा त्यांच्या सहज आविर्भावात काढले तर जास्त चांगले येतात, असे आंबेकर यांचे म्हणणे आहे. आंबेकर यांनी छायाचित्रण कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. हौस आणि छंदातून व नवनवीन अनुभव घेत, कधी चुका करत, त्यातून शिकत आपली छायाचित्रण कला समृद्ध केली आहे.
आंबेकर यांच्या फोटोंच्या ब्लॉगची लींक अशी
http://ekspressions.aminus3.com/
आंबेकर यांच्याशी संपर्कासाठी त्यांचा ई-मेल असा
spmangomaker@yahoo.com
No comments:
Post a Comment