नर्मदा परिक्रमा हा विषय गेल्या काही वर्षात जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर या पुस्तकामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचला आङे. कुंटे यांच्यापूर्वीही या विषयावरील काही पुस्तके प्रकाशित झाली होती तसेच काही मंडळींनी नर्मदा परिक्रमाही केली होती. गो. नि. दांडेकर यांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा या खूप वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकातही याविषयी सांगण्यात आले आहे. नर्मदा परिक्रमा ही पायी किंवा बसमधून केली जाते. अनेक जणांनी ती केलीही असेल तर काही जणांच्या मनात करण्याची इच्छा असेल. सातारा येथील घाडगे दाम्पत्याने (प्रकाश आणि वासंती घाडगे) स्कुटरवरुन ही नर्मदा परिक्रमा केली म्हणून त्याचे वेगळेपण. स्कुटरवरील नर्मदा परिक्रमेवरचे नर्मदातीरी हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
वासंती प्रकाश घाडगे यांनी लिहिलेले हे पुस्तक ठाणे येथील उद्वेली बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. पंधरा दिवसातील स्कूटरवरुन केलेल्या नर्मदा परिक्रमेचे प्रवासवर्णन यात आहे. २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत घाडगे दाम्पत्याने ही परिक्रमा केली. या दोघांनी .ापूर्वी स्कुटरवरुन भारतात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. त्या प्रवास करण्याच्या वेडातूनच स्कुटरवरुन नर्मदा परिक्रमा करावी, असे त्यांच्या मनात आले आणि जिद्दीने, आलेल्या संकटांना तोंड देत दोघांनी ही परिक्रमा पूर्ण केली.
या पुस्तकात त्यांनी पंधरा दिवसातील स्कूटरवरील प्रवासाचा तक्ता दिला आहे. नर्मदा परिक्रमेचा पायी मार्ग २ हजार ८५६ किलोमीटर इतका असून वाहनाने काही ठिकाणी लांबून रस्ते असल्याने हे अंतर वाढते. घाडगे दाम्पत्याने सातारा ते धुळे (४४०), धुळे ते ओंकारेश्वर (२८०), ओंकारेश्वर ते शहादा (३००), शहादा ते कटपोर (२३०), कटपोर ते मनसर (७०), मनसर ते कुक्षी (३९०), कुक्षी ते इंदूर (२३०), इंदूर ते बरेली (२३०), बरेल ते कटनी (३७०), कटनी ते अमरकंटक (३६०), अमरकटंक ते महाराजपूर (१८०), सहाराजपूरह ते होशंगाबाद (३००), ओंकारेश्वर ते धुळे (३१०) आणि धुळे ते सातारा (४४०) असे अंतर स्कूटरवरुन पार केले. (कंसातील सर्व आकडे किलोमीटरमध्ये)
घाडगे दाम्पत्याने १९९८ पासून स्टूरवरुन भ्रमण करायला सुरुवात केली. नर्मदा परिक्रमेचा प्रवास या दोघांनी केला तेव्हा प्रकाश घाडगे यांनी साठी ओलांडली होती तर वासंती या साठीकडे झुकल्या होत्या. या वयाय नर्मदा परिक्रमेला जाणे आणि तेही स्कूटरच्या प्रवासाने म्हणजे खरोखऱच जिद्दीचे आणि धाडसाचे काम. पण दोघांनीही हिंमतीने ते पूर्ण केले. त्या अनुभवावर आधारित वासंती घाडगे यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय झाले आहे. प्रवासाची दैनंदिनी असे याचे स्वरुप असले तरी ओघवत्या भाषेमुळे ते वाचायला हातात घेतले की पुढे काय याची उत्सुकता निर्माण करते. यापूर्वी वासंदी घाडगे यांनी लिहिलेले कन्याकुमारी ते कैलास हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांच्या यादीत घाडगे दाम्पत्याच्या स्कूटरवरील नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकाची भर पडली आहे. बाईकिंग करणाऱया धाडसी तरुणांसाठी किंवा प्रवासाची आवड असणाऱयांकरता वासंती घाडगे यांचे हे पुस्तक संग्राह्य आणि उपयुक्त असे आहे. पुस्तकाच्या शेवटी नर्मदा परिक्रमेचा आराखडा नकाशाच्या स्वरुपात देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment