06 December 2009

पहाटवारा

सध्या आपल्याकडेही मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे अजिबातच थंडी पडली नाही आणि त्याच्या गेल्यावर्षी मुंबई, ठाणे परिसरात वाढत्या थंडीने उच्चांक गाठला होता. मला स्वतला थंडीचा हा ऋतू खूप आवडतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. सकाळी  विशेषत पहाटेच्या वेळेस तर खूपच छान वाटते. थंडीच्या दिवसातील हा पहाटवारा प्रत्येकाने तरी अनुभवावा असाच असतो.


खरे तर पावसाळ्याचे दोन-तीन महिने सोडले तर मी पहाटे फिरायला जात नाही. पावसाळा संपला की दरवर्षी ऑक्टोबरपासून  मी पहाटेचे फिरणे सुरु करतो. पावसाळा सुरु होईपर्यंत जून अखेरपर्यंत माझे पहाटेचे फिरणे सुरु असते.  पण यावर्षी मी ऑक्टोबरऐवजी १ डिसेंबरपासून पहाटे फिरायला सुरुवात केली. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याचा अनुभव छान असतो. रस्त्यावर फारशी वर्दळ वाहने आणि माणसांचीही नसते. रस्ते जणू काही आपल्यासाठीच आहेत, असे ते मोकळे असतात. या मोकळ्या रस्त्यांवरुन चालायला आणि फिरायला मला खूप आवडते.


थंडी सुरु झाली की त्या ठराविक काळापुरती बाहेर फिरायला जाणारीही मंडळी असतात. मुंबईत फारशी थंडी नसली तरी कानटोपी, मफलर, हात व पायमोजे, शाली, स्वेटर बहुतेक जणांच्या अंगावर दिसायला लागतात. मोकळी मैदाने, समुद्र किनारे, खाडी किनारा, बागा, जॉगिंग पार्क आदी ठिकाणी पहाटे पाच-साडेपाच वाजल्यापासून माणसे दिसायला लागतात. या प्रत्येक व्यक्तीची फिरण्याची, फेऱया मारण्याची किंवा जॉगिंग करण्याची स्वताची अशी खास पद्धत असते. काही जण वॉकमन, एमपी थ्री प्लेअर किंवा मोबाईलवरची गाणी ऐकत फेऱया मारतात. सकाळी फिरायला आलेल्या मंडळींमध्ये लहान मुलांपासून ते आजोबा-आजींपर्यंत सर्व वयोगटातील माणसे असतात. काही ठिकाणी योग वर्ग, हास्यक्लब सुरु असतात. मैदाने, क्लबच्या बाहेर कारले, आवळा आणि अन्य फळे किंवा पालेभाज्यांचे रस विकणारी मंडळी बसलेली असतात.


पहाटेच्या वेळेस किंवा सकाळी वातावरणात झाडे, पाने आणि फुलांचा एक धुंद करणारा सुगंध पसरलेला असतो. सोसायटी, बंगला किंवा मोकळ्या मैदानात असलेल्या अनंत, पारिजातक आणि अन्य काही फुलांचा सुगंध मनाला प्रफुल्लीत आणि उल्हसित करत असतो. दीर्घ श्वास घेऊन ही मोकळी हवा, पहाटवारा आणि सुगंध भरुन घेतला की तो दिवस एकदम मजेत, आनंदात आणि उत्साहातच जातो. सकाळी फिरून आल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. मला वाटते की ही सारी निसर्गाची किमया आहे. प्रत्येक ऋतू बदलताना असे वेगळे वातावरण निसर्ग तयार करत असतो. थंडीनंतर उन्हाळा आणि नंतर पावसाळा सुरु होतो. बदलणारा हा प्रत्येक ऋतू नवा रंग, नवा गंध घेऊन येत असतो.


हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये मला हिवाळा खूप आवडतो. माझ्याप्रमाणेच इतरांचेही तसेच मत असेल. अनेक जण थंडी सुरू झाली की पहाटे लवकर उठून फिरायला जाण्याचा मनाशी निश्चय करतात. लवकर उठण्यासाठी गजर लावतात. पण गुलाबी थंडीत गजर झाल्यावर जाऊ दे,  असे म्हणून पुन्हा पांघरुणात गुरफटून झोपी जातात. तो एक क्षण असा असतो की आळस झटकून आपण उठायचे मनाशी एकदा नक्की केले की पहाटेच्या वेळेस बाहेर फिरण्यातला आणि पहाटवारा अंगावर घेण्याचा आनंद काय असतो, ते कळेल. फर्त त्यासाठी मनाची निर्दार पक्का केला पाहिजे.


मग काय उद्यापासून पहाटे लवकर उठून फिरायला सुरुवात करताय ना...         

No comments:

Post a Comment