मुकेश आणि अनिल अंबानी बंधुंच्या वादातून धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमुहाची विभागणी झाली. दोघे भाऊ वेगवेगळे झाले. दोघांनी आपले स्वतंत्र साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात अलिकडेच मुकेश अंबानी यांनी मुंबई सर्वांची असे वक्तव्य करुन आपला वेगळा बाणा दाखवून दिला तर आता अनिल अंबानी हे आपल्या बिग टीव्ही (डीटीएचसेवा)च्या माध्यमातून मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न करणार आहेत. (लोकमत-मुंबई, ५ फेब्रुवारी २०१०च्या अंकात प्रसिद्ध झालेली बातमी) सध्याच्या मुंबई कोणाची, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यावर होणारा अन्याय या पाश्वर्भूमीवर अनिल अंबानी यांचा हा निर्णय त्यांच्यातील मुत्सद्दीपणाची आणि व्यावयायिक दृष्टीकोनाची साक्ष देत आहे.
अनिल अंबानी यांच्या बिग टीव्हीने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा जनमानसावरील प्रभाव ओळखून निवडक पु. ल. देशपांडे, बटाट्याची चाळ, ती फुलराणी तसेच अन्य दर्जेदार मराठी चित्रपट व नाटके बिग टीव्हीवर दाखविण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात/मुंबईत अनेक लोकांनी आता टाटा स्काय, बिग टीव्ही, झीची डीश टीव्ही आणि अन्य कंपन्यांची सेवा घेतलेली आहे. केबल चालकांची मनमानी आणि खराब प्रक्षेपणापेक्षा यांचा दर्जा चांगला असल्याने अनेक लोक त्याकडे वळत आहेत. मात्र सर्वच कंपन्यांच्या डिश सेवेवर मराठीमध्ये सुरु असलेल्या सर्व दूरिचत्रवाहिन्या पाहायला मिळत नाहीत. त्याच वेळी कन्नड, तामिळ, तेलगु आदी भाषांच्या वाहिन्या मात्र मोठ्या संख्येत पाहायला मिळतात. त्या पाश्वभूमीवर मराठी प्रेक्षकांना आकर्षित करुन घेऊन आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अनिल अंबानी यांनी हे पाऊल उचलले आहे. यात त्यांची व्यावसायिकता आहेच पण सध्याच्या परिस्थितीत अंबानी यांचे हे पाऊल मराठी लोकांसाठी दिलासादायक ठरु शकते.
मराठीतील दर्जेदार चित्रपट, नाटके आणि अन्य कलाकृतींचे हक्क मिळविण्यासाठी बिग टीव्ही कामाला लागले आहे. या सर्व कलाकृती बिग टीव्हीवर मराठी प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतील, अशी व्ववस्था करण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेल्या अशा कलाकृती त्यांना अत्यल्प किंमतीत आणि उत्कृष्ट दर्जासह घरबसल्या पुन्हा पाहायला मिळाल्या तर त्याला नक्कीच मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अनिल अंबानी यांना नक्कीच वाटत असावा. आणि म्हणूनच त्यानी आपल्या बिग टीव्हीच्या माध्यमातून हे पाऊल उचलले आहे. मराठी प्रेक्षकांना स्मरणरंजन आवडते त्यातही मराठी नाटक, संगीतविषयक कार्यक्रम, संगीत मैफली, जुने चित्रपट, संगीत नाटके हा त्यांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, हे ओळखुनच अंबानी यांनी बिग टीव्हीच्या माध्यमातून मराठी प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यासाठी हा धोरणी निर्णय घेतला आहे.
खरे तर डीश टीव्हीच्या अन्य उत्पादकांनाही असे पाऊल यापूर्वीच उचलता आले असते. किमान मराठीत सध्या जितक्या वाहिन्या सुरु आहेत, त्या सर्व आम्ही दाखवतो, अशी प्रसिद्धी करुन अनेक मराठी ग्राहक त्यांना मिळवता आले असते. मराठी वृत्तपत्रातूनही या विषयी अनेक बातम्याही वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र अद्यापही कोणत्याच डिश टीव्हीवर मराठीत सुरु असलेल्या सगळ्या वाहिन्या दिसू शकत नाहीत.
अनिल अंबानी यांच्या या मराठी बाण्याला मराठी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, यामुळे बिग टीव्हीची सेवा घेणाऱया प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होते का, सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही तरी अनिल अंबानी आपले मराठी बाण्याचे धोऱण पुढे सुरु ठेवणार की काही महिन्यात ते गुंडाळणार याची उत्तरे लवकरच मिळतील. आता अंबानी यांना टक्कर देण्यासाठी अन्य एखादी कंपनी काही वेगळे करते का, तेही लवकरच पाहायला मिळेल. तसे झाले तर या स्पर्धेतून मराठी प्रेक्षकांचाच फायदा होणार आहे हे मात्र ठामपणे म्हणता येईल.
अनिल साहेब,
ReplyDeleteजियो यार, आणि हि माहिती ईथे लिहल्या बद्दल तुमचे आभार.
रामटेके
ReplyDeleteनमस्कार आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शेखर जोशी