23 February 2010

वरातीमागून घोडे

हातात अधिकार आणि सत्ता असताना काहीही ठोस कृती न करता केवळ तोंडपाटीलक्या आणि गप्पा मारायच्या. आणि सत्ता गेल्यानंतर मात्र  हे काम कसे झाले पाहिजे, ते काम आम्हीच कसे मार्गी लावू शकतो,  याच्या निव्वळ घोषणा करायच्या. हा कोणत्याही राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा हातखंडा प्रयोग असतो. सर्वसामान्य मतदार आणि नागरिक हे मूर्ख आहेत, या गैरसमजातून किंवा आपण काहीही बोललो तरी काय फरक पडतोय, आपले कोण काय वाकडे करू शकते या वृत्तीतून हे घडत असते. भाजप आणि शिवसेनेच्या अशा दोन गोष्टी नुकत्याच समोर आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे आहे.


काही वर्षांपूर्वी अस्तित्व संपलेल्या भारतीय जनता पक्षाला राम मंदिराचा हुकमी एक्का सापडला. लालकृष्ण अडवाणी यांनी भारतभर रथयात्रा काढून वातावरण तापवले, नंतर कारसेवा करुन बाबरी मशिद पाडण्यातही आली. त्यानंतर देशभर दंगली झाल्या. (बाबरी पाडली  गेल्याचे अजिबात वाईट वाटत नाही.खऱे तर कॉंग्रेस पक्षानेच मुस्लिमांचे लांगूनचालन न करता ठोस भूमिका घेऊन तेव्हाच हा प्रश्न सोडवला असता तर या प्रश्नाचा भस्मासूर आज झाला नसता. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या प्रमुख उपिस्थतीत सोरटी सोमनाथ या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेलाच ना ) वेळोवेळी राम मंदिर उभारणीच्या भावनीक मुद्यावर भाजपने राजकारण केले.


आता इंदूर येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात कोलांटी उडी मारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन गडकरी यांनी एक नवा उपाय सांगितला.  हा उपाय काय तर मुस्लिमांनी रामजन्मभूमीची जागा हिंदूना देऊन टाकावी आणि त्या ठिकाणी राम मंदिर उभारु द्यायचे. मग त्या बदल्यात  त्याच्याच बाजूला भव्य मशिद त्यांना बांधून देण्यात येईल. अरे वा, गडकरी. तुमचा हा उपाय म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. तुमचा पक्षही पाच वर्षे सत्तेत होता, हा वाद सोडवण्यासाठी समाजातील काही मान्यवरांनी तेव्हाही असा विचार मांडला होता. मग त्यावेळेस त्यावर विचार का नाही केला, केंद्रात तुमची सत्ता असल्याने आणि या पर्यायाला सत्तेतील तुमच्या घटक पक्षानीही विरोध केला नसता. मग तेव्हापासून आजतागायत राम मंदिराचे राजकारण का करत राहिलात. हा सर्व प्रकार पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर स्वतला पुरोगामी सिद्ध करण्यासाठीची खेळी आहे का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही यावर आपली परखड प्रतिक्रिया दिलेली नाही.  त्याचे प्रमुख आता गप्प का


ज्या राम मंदिरासाठी सर्वसामान्य स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी आपले रक्त सांडले, या लढ्यात झोकून दिले, त्यांच्या भावनांशी हा खेळ नाही का, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे नाही का, हेच तुम्हाला करायचे होते, तर इतकी वर्षे का थांबलात, या प्रश्नाचे राजकारण का केले, पण याची उत्तरे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना कधीच मिळणार नाहीत.


असेच वरातीमागून घोडे शिवसेनेने केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अभावी तेथे अधूनमधून अपघात घडत आहेत. येथे जवळपास सुसज्ज रुग्णालय नसल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना मुंबईला आणावे लागत आहे. त्यासाठी आता शिवसेना जागी झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आजच  मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शिवसेनेचे रणशिंग. वडखळजवळ ट्रॉमा सेंटर बांधणार, अशी बातमी वाचनात आली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा दिला आहे.


अरे हे अपघात काय गेल्या चार-सहा महिन्यांपासून होत आहेत का, यापू्र्वी ते होत नव्हते का, मग या अगोदर या कामासाठी रणशिंग का नाही फुंकावेसे वाटले, महाराष्ट्रात पाच वर्षे तुमची सत्ता होती, मग तेव्हा का नाही हा प्रश्न मार्गी लावावासा वाटला, आता सत्ता गेल्यावर या प्रश्नाची तुम्हाला आठवण झाली का,


आज भाजप-शिवसेना आहेत तर  उद्या दोन्ही कॉंग्रेसचे वरातीमागून घोडे असेल. गेंड्याच्या कातडीचे  आणि सर्वसामान्यांच्या सुखदुखाशी कसलेही देणेघेणे नसलेले राजकीय पक्ष आणि त्यांचे निर्लज्ज पुढारी आपल्या देशात असतील आणि त्याना निवडून देणारे आपण सूज्ञ मतदार असू तर काय होणार, वर्षानुवर्षे हे असेच सुरु राहणार.                

4 comments:

  1. > काही वर्षांपूर्वी अस्तित्व संपलेल्या भारतीय जनता पक्षाला राम मंदिराचा हुकमी एक्का सापडला.
    >---

    I had typed a longish response in Marathi but it has disappeared. Anyway, it is pure fantasy on your part that BJP had lost relevance at any point of time whatever.

    Mandir Movement had offered to rebuild the mosque somewhere far from the Mandir site in Ayodhya in 1989-90 but Muslims thought the Govt would bail them out.

    BJP's allies would not have taken it kindly during Vajpayee's rule if the issue had been raised again. Some amount of subversion is called for while pursuing the Mandir agenda. BJP has many faults, but it has been fairly consistent on the Ayodhya issue. Personally I do not like Gadkari's proposal to build the mosque close to the temple. But this is just a balloon floated by BJP and it remains to be seen how the situation plays out.

    ReplyDelete
  2. > हातात अधिकार आणि सत्ता असताना काहीही ठोस कृती न करता केवळ तोंडपाटीलक्या आणि गप्पा मारायच्या ...
    >---

    हा दावा चूक आहे. उत्तर प्रदेशात हातात सत्ता आल्याचा फायदा घेऊन भाजपनी मशीद पाडली. ते सरकार बरखास्त झालं. मित्रपक्षांमुळे वाजपेयी सरकारचे हात मन्दिर प्रश्नावर बांधले गेले होते.

    ReplyDelete
  3. शेखरजी, गडकरींनीकडून जरा अपेक्षा होत्या. पण त्यांनीही आल्याआल्या सवंग घोषणा आणि 'राहुल गांधी टाईप' दिखाऊ भोजनावळी घातल्याने अपेक्षाभंगच होणार असं दिसतंय

    ReplyDelete
  4. गडकरींकडून काही अपेक्षा आहे, ,राष्टीय स्वयंसेवक संघाकडे त्यांना बघावेच लागेल,

    ReplyDelete