23 July 2010

हा तर लोकमान्य टिळकांचा अपमान

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या राजकारणावर आणि समाजकारणावर सलग तीन टर्म आपला ठसा उमटवल्याबद्दल तसेच समाज सुधारणेसाठी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून मोलाचा सहभाग दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे.

केसरी-मराठा ट्रस्टतर्फे देशाच्या विकासात आणि सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. एक लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या राजकारणावर आणि विकासावर काय ठसा उमटवला असेल तो असू द्या. पण शीला दीक्षित यांनी अलीकडेच अफजल गुरू प्रकरणी जी बोटचेपी आणि मुस्लिम लांगुचालनाची भूमिका घेतली होती, त्याचे काय, त्या बद्दल त्यांना कोण जाब विचारणार आहे की नाही, असे प्रश्न मनात येतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव त्यांनीच सुरू करून एका नव्या अध्यायाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जातीपातीच्या समाजाला त्यांनी एकत्र आणले. लोकमान्य टिळक हे प्रखर राष्ट्रवादी, तत्वनिष्ठ होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांची तत्वे आणि विचार पुढे नेणाऱया व्यक्तीला देणे हे अधिक योग्य ठरले असते.

काही दिवसांपूर्वीच संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुच्या फाशी प्रकरणावरून चर्चा रंगली होती. अफजल गुरुला फाशी होऊ नये असे दीक्षित यांना वाटत होते. कारण त्यांना म्हणजे दिल्ली सरकारने याबाबतचा अर्ज केंद्रीय गृहमंत्री/गृहमंत्रालयाकडे पाठवलाच नाही. याविषयी वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमातून माहिती जाहीर झाल्यानंतरचच हे सर्व उघड झाले. अफजल गुरुच्या फाशीबाबतचा अर्ज पुढे न पाठवून शीला दिक्षित यांनी कॉंग्रेसी मुस्लिम तुष्टीकरणाचा कित्ता गिरवला आहे.

भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुच्या फाशीसंदर्भात वेळकाढूपणा करणाऱया शीला दिक्षित यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा हा पुरस्कार देणे म्हणूनच योग्य वाटत नाही. मग भले त्यांनी खूप काही सामाजिक व राजकीय काम केले असले तरी शीला दिक्षित यांनी अफजल गुरुबाबत केलेल्या चुकीमुळे त्या लोकमान्य टिळकांच्या नावे देण्यात येणाऱया या सन्मानास पात्र ठरत नाहीत. त्यांना पुरस्कार देणे म्हणजे लोकमान्य टिळकांचाही अपमान आहे.

        

5 comments:

  1. पूर्ण सहमत.. हा सरळ सरळ लोकमान्यांचा अपमान आहे !!!!

    ReplyDelete
  2. खरं आहे. आणखी एक आठवड्यानंतर पुणेरी पगडाचाही परत अपमान होईल. कितव्यांदा माहित नाही.

    ReplyDelete
  3. हेरंब, देविदास
    नमस्कार
    प्रतिसादाबद्दल आभार.

    ReplyDelete
  4. Aplya matashi purnapane sahmat

    ReplyDelete
  5. दहशवादी एक प्रकारे पाढीबा देऊन असा पुरस्कार मिळतो काय? अजब प्रकार आहे दुसरे कोणी नव्हते का?लोकमान्य तिलकाचा पुरस्कार मिळाला म्हणजे काय आपण मोठे होत नाही याची जाणशीला दीक्षित यांनी ठेववी म्हणजे झाले

    ReplyDelete