"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"
उद्या २५ जुलै रोजी आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरुला/शिक्षकाला खूप महत्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृतीतही गुरुचे महत्व सांगितले आहे.
आपण वयाने लहान असू किंवा मोठे. आयुष्याच्या आरंभापासून ते अंतापर्यंत आपण नेहमी शिकत असतो. आपली ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. त्यामुळे आपल्याला गुरु किंवा शिक्षक कोणीना कोणीतरी असतोच. लहान असताना आपली आई आपला गुरु असते. घरातील मंडळी आपले गुरू असतात. शाळेत जायला लागल्यानंतर शाळेतील शिक्षक, पुढे महाविद्यालयातील शिक्षक आपले गुरु होतात. एखाद्या कलेचे शिक्षण आपण घेत असू तर ती कला शिकण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातो, ते आपले गुरु असतात.
शिक्षण संपल्यानंतर आपण नोकरी-व्यवसायाला सुरुवात करतो. येथेही आपल्याला सुरुवातीला कोणीना कोणी शिकवत असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करून देतात. त्या शिदोरीवर आपण आपली प्रगती करून घेत असतो. गुरु हा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो. गुरु म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठाच असला पाहिजे असे नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याकडूनही आपण काही शिकत असतो.
आपल्या आय़ुष्यात तसेच समाजात वावरताना आपण शिकण्याची सवय ठेवावी. मला सर्व काही येते, अशी भावना ठेवणे योग्य नाही. आपल्यात काही कमीपणा असेल, तर तो मोकळेपणाने मान्य करण्यात काही चूक नाही. तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेल की आपल्याला न येणारी किंवा न जमणारी एखादी गोष्ट आपण दुसऱयाकडून शिकलो आहोत. जे दुसऱयाकडून शिकणे आहे, त्यालाच समोरच्याला मोठेपणा देणे आणि आपण शिष्यत्व पत्करणे असे म्हणता येईल.
ज्ञानदान एवढेच गुरूचे कार्य नाही. खरा गुरू तोच की जो आपल्या संकल्पानेच शिष्याची ज्ञानग्रहणाची इच्छा जागृत करतो. प्रत्यक्ष ज्ञानदान या प्रक्रियेपुढे दुय्यम मानले जाते.
ReplyDelete