02 November 2011

प्रयोग ध्वनिचित्रमुद्रित मासिकाचा

संगणक, लॅपटॉप आणि सोशल नेटवर्किंग साईट्स ही आजच्या तरुणाईची ओळख झाली आहे. अनेक तरुण, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या गोष्टींचा सहज वापर करत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आणि मराठी साहित्यात एक वेगळा प्रयोग ठरेल असे ध्वनिचित्रमुद्रित ‘तुतारी’ हे मासिक येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. या प्रयोगाची सुरुवात ‘तुतारी’च्या ध्वनिचित्रमुद्रित दिवाळी अंकापासून झाली आहे.
या अनोख्या ध्वनिचित्रमुद्रित मासिकाची संकल्पना आणि संपादन शिवा घुगे यांचे आहे.
प्रभात प्रकाशनातर्फे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणारे तरुण प्रकाशक म्हणून घुगे यांची मराठी साहित्यविश्वाला ओळख आहे. ‘समकालीन संस्कृती’ हे मासिकही त्यांनी काही काळ चालवले. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘कागदी बाण’ या पुस्तकाने त्यांनी प्रकाशनास सुरुवात केली. नवीन काही तरी करावे या एकमात्र उद्देशाने आपण ध्वनिचित्रमुद्रित मासिकाचा प्रयोग करण्याचे ठरवले असल्याचे घुगे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
‘तुतारी’च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी ‘पोवाडा आणि लावणी’ याविषयी केलेले विवेचन, कुमार सप्तर्षी यांनी ‘जागतिक क्रांती आणि देशातील आंदोलने’ या विषयावर व्यक्त केलेले मनोगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सकपाळ यांनी कवितांचे केलेले निरूपण, शाहीर लीलाधर हेगडे यांनी सादर केलेला ‘गांधी हत्या’ आणि स्वातंत्र्यावरील पोवाडा, बाल्या नृत्य, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या जाहीर कार्यक्रमातील काही अंश आदी साहित्य असल्याचे सांगून घुगे म्हणाले की, अंकातील सहभागी मान्यवरांनी कोणतेही मानधन न घेता आपला सहभाग दिला आहे.
दर महिन्याला एक विषय घेऊन ‘तुतारी’ हे ध्वनिचित्रमुद्रित मासिक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. डिसेंबर महिन्यातील अंक ‘निवडणूक’ विशेष तर जानेवारी महिन्यातील अंक ‘कविता’ या विषयावरील असेल.  मासिकासाठी एक हजार सभासदांकडून शंभर रुपये घेऊन ‘तुतारी’चे अंक डीव्हीडी स्वरूपात देण्याचा विचार आहे. तसेच या उपक्रमास कोणा प्रायोजकाकडून आर्थिक मदत मिळाली तर ‘तुतारी’चा दिवाळी अंक आणि प्रकाशित होणारे पुढील अंक ‘फेसबुक’वर टाकण्याचा प्रयत्न असल्याचेही घुगे यांनी सांगितले.
कवी केशवसुत यांनी आपल्या ‘तुतारी’ या कवितेत ‘एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने’ असे म्हटले होते. अपघातामुळे डाव्या पायाला झालेले फ्रॅक्चर आणि त्यामुळे पायाला आलेले अपंगत्व, फीट येणे अशा शारीरिक व्याधींवर मात करून जिद्दीने घुगे यांनी ध्वनिचित्रमुद्रित मासिकाच्या अनोख्या मासिकाची ‘तुतारी’ तर फुंकली आहे.. घुगे यांचा संपर्क- ८१०८२६१५२५/ ८६५५५२३४३०

(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

No comments:

Post a Comment