04 November 2011

आवाजाची ग्राफिक स्टोरी

दिवाळी अंकामध्ये ‘खिडकी चित्रे’ देण्याची सुरुवात करणाऱ्या ‘आवाज’ने पुढील वर्षीच्या ‘आवाज’च्या दिवाळी अंकात ‘ग्राफिक स्टोरी’ (चित्ररूप कथा) देण्याचा नवा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. दिवाळी अंकासाठी असा प्रयोग पहिलाच ठरणार असल्याचा दावा ‘आवाज’चे संपादक भारतभूषण पाटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
दिवंगत मधुकर पाटकर यांनी सुरू केलेल्या ‘आवाज’ची यंदा एकसष्टी होती. केवळ ‘विनोद’ विषयालाच वाहिलेल्या या मासिकाची धुरा आता पाटकर यांचे सुपुत्र भारतभूषण पाटकर पाहात आहेत. यंदाच्या वर्षी ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या ३५ हजार प्रतींची विक्री झाली आहे.
आमच्या वडिलांनी ‘आवाज’ची घडी बसवून दिली. आम्ही तीच परंपरा पुढे सुरू ठेवली असून काळानुरूप अंकात काही बदल करत गेलो आहोत. मराठीतील तरुण वाचक (जो विशीच्या पुढे आहे) ‘आवाज’कडे वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षीच्या दिवाळी अंकात आम्ही ‘ग्राफिक स्टोरी’ देणार असल्याचे सांगून पाटकर म्हणाले की, ‘चित्ररूप कथा’ असे त्याचे स्वरूप असेल. ही कथा किमान आठ पानांची आणि जास्तीत जास्त सोळा किंवा त्यापेक्षा अधिक पानांची असेल. आजच्या तरुणांना आवडेल असा कथेचा विषय असेल. या नव्या प्रयोगाविषयी सध्या आमची ‘आवाज’च्या परिवारातील विनय ब्राह्मणीया, गजू तायडे यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. आपल्याकडे लहान मुलांसाठी ‘कॉमिक्स’ पुस्तके आता बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहेत, पण मोठय़ांसाठी मात्र अशा प्रकारची पुस्तके/कथा नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग करत आहोत.
आमची नक्कल करणारे काहीजण नामसाधम्र्यासह बाजारात आपले अंक विक्रीस आणत आहेत. मात्र असे असले तरी ६१ व्या वर्षांतही ‘आवाज’ची लोकप्रियता कायम आहे हे यंदाच्या वर्षी जी विक्री झाली त्यावरून दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागांबरोबरच राज्यभरातील ग्रामीण भागांत आणि गावांमध्ये ‘आवाज’ला मागणी आहे. ग्रंथालयांबरोबरच वैयक्तिकपणे ‘आवाज’ विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे पाटकर म्हणाले.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ४ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/15791/indian-express/04-11-2011#p=page:n=17:z=1

No comments:

Post a Comment