08 November 2011

पुलकित गाणी

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच पु. ल. देशपांडे यांचा परिसस्पर्श ज्याला झाला, त्याचे सोने झाले. पुलंनी लिहिलेली नाटक, कथाकथन, चित्रपट पटकथा-संवाद, चित्रपटातील अभिनय किंवा एकपात्री अभिनय असो. पुलंनी या सर्वावर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांनी ‘पुल’कित केलेल्या गाण्यांबद्दलही असेच म्हणता  येईल. पुलंनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही तितकीच टवटवीत आणि गुणगुणावी वाटतात, यातच सर्व काही आले. पुलं म्हटले की सगळ्यांच्या ओठावर असलेले आणि मराठी वाद्यवृंदात सादर केल्या जाणाऱ्या गाण्यांमधील हमखास वन्समोअर घेणारे गाणे म्हणजे ‘नाच रे मोरा’. ‘देवबाप्पा’या चित्रपटातील हे गीत ग.
दि.मा. यांचे असून स्वर आशा भोसले यांचा आहे. आज ५८ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेला आणि ज्या
चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली असा ‘सबकुछ’ चित्रपट म्हणजे ‘गुळाचा गणपती’. या चित्रपटातील ‘ही कुणी छेडिली तार’ (आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे), श्रीहरी विदुराघरी पाहुणा (माणिक वर्मा), इथेच टाका तंबू (आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे), केतकीच्या बनात, उतरत्या उन्हात (आशा भोसले) या गाण्यांचा उल्लेख करता येईल. याच चित्रपटातील पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘इंद्रायणी काठी’ हे गाणेही न विसरता येणारे. शाळेत असताना पाठ केलेली
‘इवल्या इवल्याश्या, टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी’ही कविता आपल्या आठवणीत आहे. ‘देवबाप्पा’ या चित्रपटातील हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे. पुलंकडे माणिक वर्मा यांनी गायलेली ‘कबिराचे विणतो शेले’, (देवपावला) ‘कुणी म्हणेल वेडा तुला कुणी म्हणेल वेडी मला’ (देवपावला) ‘जा मुली
शकुंतले सासरी’ (देवपावला), ‘तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं’, ‘हसले मनी चांदणे’ ही गाणीही रसिकांना माहितीची आहेत. मंगेश पाडगावकर यांचे शब्द आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर लाभलेली पुलंची आणखी दोन लोकप्रिय गाणी ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ आणि ‘माझे जीवन गाणे’. या गाण्यांची गोडी अविट आहे. ‘माझिया माहेरा जा रे पाखरा’ (ज्योत्स्ना भोळे) हे गाणेही रसिकांना माहिती आहे. या सह ‘दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया’ (आशा भोसले), ‘माझ्या कोंबडय़ाची शान’ (पं. वसंतराव देशपांडे) आणि अन्य ‘पुल’कित गाणीही आहेत. साहित्यिक, नाटककार, एकपात्री प्रयोगकर्ते आणि कथाकथनकार पुल अशी त्यांची प्रामुख्याने ओळख असली तरीही गायक, हार्मोनिअम वादक आणि संगीतकार पुल अशी असलेली त्यांची ओळख या गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न. 

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर माझी ही बातमी प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/16135/indian-express/08-11-2011#p=page:n=15:z=1

No comments:

Post a Comment