दिवसेंदिवस मुंबईत येणारे लोंढे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईची जुनी ओळख हरवली जात आहे. अरुण पुराणिक यांनी याच हरवलेल्या मुंबईचा शोध ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकात घेतला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशन नुकतेच हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शाहीर पठ्ठे बापुराव यांनी ‘मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका’ अशा शब्दात मुंबईवर लावणी लिहिली तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची’ असे मुंबईचे वर्णनकेले. काळ बदलतो, सामाजिक गरजा बदलतात, वस्ती बदलते तशीच तेथील स्थानिक संस्कृतीही बदलते. म्हणूनच तिथे राहिलेल्या वयोवृद्ध मंडळींना मुंबई आता परकी वाटते. अशा या मुंबईच्या हरविलेल्या पैलूंवर पुराणिक यांनी प्रकाश टाकला असून पुस्तकातील काही लेख यापूर्वी ‘लोकसत्ता’, ‘साप्ताहिक लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. पुराणिक यांनी आपले हरविलेले बालपण परत जोपासण्यासाठी आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याकरिता अनेक ठिकाणी भेटी दिल्या, वयोवृद्धांच्या मुलाखती घेतल्या, संदर्भपत्रे, कागदपत्रे पाहिले. मुंबईची दुर्मिळ छायाचित्रे मिळवली आणि यातून ‘हरवलेली मुंबई’ हे पुस्तक साकार झाले आहे. पुराणिक यांचे मुंबईवरील विविध लेख वाचून ‘मॅजेस्टिक पब्लिकेशन’चे अनिल कोठावळे स्वत: त्यांना भेटायला गेले आणि यातून हे पुस्तक तयार झाले. स्मरणरंजनात घेऊन जाणारी मोठी कृष्णधवल छायाचित्रे हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. चाळ संस्कृती, गिरगाव चौपाटी, पानसुपारी, नाक्यावरचे इराणी, चोरबाजार, पानवाले, क्षुधाशांती गृहे, मुंबईतील गणेशोत्सव, सार्वजनिक शौचालये, रामागडी, मुंबईतील वारांगना आणि अन्य विषयातून पुराणिक यांनी हरवलेल्या मुंबईचा शोध घेतला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशन- संपर्क (०२२२४३०५९१४)
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झालेली बातमी)
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झालेली बातमी)
No comments:
Post a Comment