15 May 2010

रुचीने उलगडले वास्तव

मराठी भाषा आणि संस्कृतीचे भवितव्य, मातृभाषेतून शिक्षण, मराठी साहित्याचा खालावलेला दर्जा, भाषाशुद्धीची चळवळ याबाबतचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जसेच्या तसेच आहेत. त्यात काहीही बदल झालेला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या निवडक अध्यक्षांच्या भाषणातील काही उताऱ्यांचे संकलन ग्रंथाली वाचक चळवळीच्या ‘रुची’ या मासिकाने आपल्या मार्च महिन्याच्या अंकात केले असून त्यातून हे वास्तव प्रकर्षांने समोर आले आहे.



पुण्यात १८७८ मध्ये ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. त्याच संमेलनातून पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील ते उतारे वाचल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही मराठी भाषा, साहित्य याबाबतचे प्रश्न जसेच्या तसेच असल्याचे वास्तव दिसून येत आहे.


या अंकात माधवराव किबे, दत्तो वामन पोतदार, शिवराम महादेव परांजपे, नारायण गोविंद चापेकर, भवानराव पंतप्रतिनिधी, माधव त्र्यंबक पटवर्धन, दत्तो वामन पोतदार, ना. सि. फडके, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदी संमेलनाध्यक्षांचे विचार देण्यात आले आहेत. किबे यांनी १९३६ मध्ये सांगितले होते की, ‘सध्या मराठी भाषेत जी बजबजपुरी माजली आहे, तिला आळा घालणे जरुरीचे आहे’. तर परांजपे १९२९ मध्ये म्हणाले होते की, ‘श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या गीतेवरील भावार्थ दीपीकेपासून ते लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या पर्यंत ज्या मराठीमध्ये आत्तापर्यंत अनेक ओजस्वी ग्रंथ निर्माण झाले आहेत, ती भाषा मरण्याकरता जन्माला आलेली नाही. पराजंपे यांनी १९३४ मध्ये ‘वाङ्मय समाजाची नाडी असून कोणत्याही समाजाच्या वाङ्मयीन स्वरुपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे ते समजते’ असे सांगितले होते. तर ‘मूलगामी अभिमानाच्या अभावी मराठी भाषेची उपेक्षा होत आहे, यात तिळमात्र संदेह नसल्याचे’ परखड मत पटवर्धन यांनी १९३६ मध्ये व्यक्त केले होते.


दत्तो वामन पोतदार यांनी १९३९ मध्ये ‘आमच्या शिक्षणात मराठी शिक्षणाचा पाया उत्कृष्ट आणि भक्कम घातला गेला पाहिजे. माझ्या मते हिंदुस्थानात आपण बहुभाषिक झाले पाहिजे पण सर्वात प्रधान स्थान जन्मभाषेचे. तो पाया कच्चा ठेवून कोणतीच इतर भाषा शिकली आणि शिकवली जाता कामा नये’ असे परखडपणे सांगितले होते. तर आचार्य अत्रे यांनी १९४२ मध्ये सांगितले होते की, ‘अद्यापही साहित्य हा महाराष्ट्रातील साहित्यिकांचा उपजिविकेचा धंदा झालेला नसून तो हौसेचाच व्यवसाय आहे. लेखन हा मराठी लेखकांचा जोडधंदा आहे. साहित्यलेखन हा राज्यातील बुद्धीमान माणसांचा एकमेव व्यवसाय झाला पाहिजे. तरच मराठी भाषेचे आणि साहित्याचे त्यात कल्याण आहे.’


निवडक साहित्य संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणातील हे विचार बोलके असून त्यावर वेगळे काही भाष्य करण्याची गरज नाही. इतक्या वर्षांनंतरही आपण मराठी भाषा, संस्कृती, मराठी भाषेचे अस्तित्व यावर फक्त चर्चाच करत राहतो, हे आपले दुर्दैव.

No comments:

Post a Comment