आमच्या कार्यालयातील सुनील डिंगणकर आणि नमिता देशपांडे यांचा विवाह नुकताच (९ मे) पार पडला. परंपरागत पुरोहित, भटजी यांनी लग्न लावले नाही तर ज्ञान प्रबोधिनीच्या महिला कार्यकर्तीने लग्नाचे सोपस्कार पार पाडले. अनेकदा असे दिसते की लग्नाच्या विधितील सर्व मंत्र हे संस्कृत भाषेतील असल्याने आणि पौरोहित्य करणारे गुरुजी योग्य प्रकारे सांगणारे नसतील तर त्यांचे मंत्र म्हणणे आणि सर्व विधि हे केवळ नुसती बडबड ठरते. वधू किंवा वर आणि त्यांच्या नातेवाईकांचे त्या विधिंकडे आणि गुरुजींच्या सांगण्याकडे लक्ष नसते. अर्थात याला सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत. पण हे अपवाद सोडले तर चित्र सारखेच असते. डिंगणकर-देशपांडे यांच्या लग्नात ज्ञानप्रबोधिनीच्या महिला पुरोहितानी सर्व विधि त्यामागील अर्थ मराठीतूनच सांगितले.
तसेच लग्नात वधू-वर यांच्यावर उपिस्थतांकडून अक्षता टाकल्या जातात. हॉलमध्ये इतकी प्रचंड गर्दी असते की कोणाच्याच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पोहोचत नाही. त्या खाली पडून पायदळीच तुडवल्या जातात. सुनील आणि नमिताच्या लग्नात ते टाळले गेले. महिला पुरोहितानी सांगितले की आत्ता अक्षता कोणालाच देणार नाही. लग्न लागल्यानंतर वधू-वरांना भेटायला जेव्हा तुम्ही व्यासपीठावर याल तेव्हा तबकात फुलांच्या पाकळ्या व अक्षत ठेवलेल्या असतील. त्या वधू-वरांच्या डोक्यावर टाकून त्यांना आशीर्वाद द्या. ही पद्धतही आज अनेक लग्नात दिसून येत आहे.
सुनील आणि नमिता यांचा प्रेमविवाह. दोघेही आमच्याच कार्यालयात काम करतात. त्यांनी एकमेकांना प्रपोज केले ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱया लोकल गाडीतून प्रवास करताना. ही गोष्ट ९ डिसेंबर २००९ ची. अंबरनाथहून सीएसटीला जाणाऱया १२.२२ च्या लोकलमधील. त्यामुळे दोघांनीही विचार करुन लग्नाची तारीख आणि मुहूर्तही त्याच वेळचा ठरवला. आम्ही त्यांना गमतीने म्हटलेही अरे मग लग्न एखाद्या हॉलमध्ये करण्याऐवजी लोकलगाडीत का नाही केले.
या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही वेगळ्या प्रकारची आणि हटके होती. सर्वसामान्यपणे कोणत्याही लग्नाच्या पत्रिकेवर श्री गजानन प्रसन्न किंवा कुलदेवतेचे नाव असते. आमच्या येथे आमचा नातू, पुतण्या किंवा मुलगा अशी सुरुवात करून (घरातील मोठ्या व्यक्तीच्या नावे ) पुढील मजकूर लिहिलेला असतो. सुनील आणि नमिताच्या पत्रिकेत हे काहीही नव्हते. ही पत्रिका ज्या पाकिटात घालून देण्यात आली त्या पाकिटावर मात्र कुलस्वामिनी अंबाबाई प्रसन्न असे आवर्जून लिहिलेले आहे. त्या पाकिटावरही एका लग्नाची गोष्ट असे लिहून शेजारी दोन स्वस्तीके आहेत. वृत्तपत्रातील बायलाईनची (म्हणजे त्या रिपोर्टरच्या नावाने) बातमी जशी असते, त्या बातमीची ज्या प्रकारे मांडणी केलेली असते, तशी या पत्रिकेची मांडणी करण्यात आली आहे. पत्रिकेच्या सगळ्यात वरती लालबागचा राजा, टू स्टेट्स, लव्ह बर्डस आणि १२.२२ ची सीएसटी लोकल प्रसन्न असे लिहिलेले आहे.
१२.२२ च्या त्या लोकल प्रवासात माझ्या आणि नमिताच्या आय़ुष्याची गाडी एका वेगळ्या ट्रॅकवर जाणार आहे किंवा आमच्या दोघांची गाडी एकाच ट्रॅकवरून जाईल हे कोणाच्या गावीही नव्हते. त्याच गाडीत मुलुंड ते कांजुरमार्ग या स्थानकांदरम्यान स्टॅण्डिंग स्थितीत सर्वांसमक्ष नमिताशी झालेला छोटेखानी संवाद लवकरच भव्य विवाहसोहळ्याच्या स्वरुपात साजरा होणार आहे. तारीख आणि वेळ तीच आहे, फक्त महिना आणि आपल्या सर्वाच्या सोयीसाठी स्थळ बदलले आहे, अशी या पत्रिकेची सुरुवात आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोघांनी लालबागच्या राजाची एकत्र पाहिलेली मिरवणूक, चार दिवस घऱी पाहुणचारासाठी आलेले लव्हबर्ड हे पक्षी, या विषयावर पाच महिने एकमेकांशी सुरु असलेली चर्चा, टु स्टेटस हे पुस्तक याचेही काय महत्व आहे, ते पत्रिकेत पुढे सांगितले आहे. पत्रिकेच्या शेवटीही सर्व नातेवाईकांची नावे न देता येथे आम्ही (सुनील डिंगणकर, नमिता देशपांडे, वसुधा डिंगणकर, निलिमा देशपांडे, प्रदीप देशपांडे, तन्मय देशपांडे) आपली वाट पाहात आहोत, असे सांगून अधिक माहितीसाठी घरचा पत्ता व दूरध्वनी दिला आहे. पत्रिकेत इंडिकेटर, पुस्तक, लव्ह बर्ड आणि लालबागचा राजा यांचीही छायाचित्रे देण्यात आली आहेत.
आपण नेहमी पाहात असलेल्या लग्नाच्या पत्रिकांमध्ये या पत्रिकेचे जाणवलेले हे वेगळेपण. आता काहीतरी हटके करायचे किंवा पारंपरिक पद्धतीची पत्रिका नको, म्हणून हे केले का, लग्नाच्या पत्रिकेवर सुरुवातीला श्री गजाजन प्रसन्न असे न लिहिणे योग्य की अयोग्य असे आणि इतरही काही प्रश्न अनेकांच्या मनात येतील. काही जणांना हा नवीन प्रकार आवडेल तर काही नाक मुरडतील. असो. ते चालायचेच.
लग्नाच्या नेहमीच्या पारंपरिक पत्रिकेपेक्षा ही पत्रिका आगळी आणि वेगळी वाटली म्हणूनच ही एका लग्नाची गोष्ट...
अरे वा.. दोघांनाही आमच्या शुभेच्छा कळवा.
ReplyDeleteएक वेगळा लेख... मस्त...
ReplyDeleteपत्रिकेवर आम्ही कुठे भेटलो, त्या लोकलची वेळ ही माहिती टाकणे वगैरे निव्वळ आचरटपणा आहे. 'आमचे अनोखे ध्यान म्हणजे एकदम सॅम्पल आहे हो. तो एकदा चुकून लेडीज टॉयलेटमधे शिरला आणि तीच आमची पहिली भेट, खा खा खि खि खू खू' किंवा 'आम्ही पहिले गणपतीपुळ्याच्या मन्दिरात भेटलो होतो, बरं का' अशी पत्रिका वाचली तर तुम्ही काय म्हणाल?
ReplyDeleteमहिला पुरोहित बोलवणे, अक्षतांचा गैरवापर टाळणे या स्वागतार्ह गोष्टींशी पुढली पत्रिकेतली लव्हबर्डस्, कोल्हे-कुत्रे, गरूड-गांडूळ इत्यादि आचरट माहिती पूर्ण विसंगत आहे.
महेंद्र, गजानन, नानीवडेकर
ReplyDeleteआपले मत कळले. आभार.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteप्रत्येक बाब हटके करून दाखवण्याच्या नादात वाटेल ते करायचे आणि त्याचे समर्थन रूढी परंपरांना काहीच माहीत नसताना नाव ठेऊन करायचे . पत्रिकेत काही तरी वेगवेगळे नावे व फोटो देऊन लोकल प्रसन्न सारखा मजकूर टाकणे लग्न समारंभाचे गांभीर्य घालवते. कुलदेवता प्रसन्न वगैरे पाकीटावर लिहून , त्याच बरोबर सर्व धार्मिक विधी कोणाचे तरी करवी करून ते तथाकथित पुरोगामित्व मिळण्याचे श्रेयही घालवून टाकतात.प्रत्येक लग्नाची काही तरी गोष्ट असते ती लिहायची ठरवल्यास पत्रिके ऐवजी पुस्तके छापावी लागतील ते वेगळेच.
ReplyDelete