विधानपरिषदेच्या ठाणे मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे हे बिनिवरोध निवडून आले. मतांच्या आकडेवारीनुसार निवडणूक झाली तर डावखरे निवडून आले असते. मात्र शिवसेनेने आपल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेऊन लढाईपूर्वीच तलवार म्यान केली आणि पुन्हा एकदा राजकारणात सर्व काही अगदी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले तरी चालते, कारण मतदार हे विसरभोळे असतात किंवा त्यांना गृहीत धरले तरी चालते, हे दाखवून दिले आहे. त्याच वेळी डावखरे यांच्या विरोधात निवडणुक लढविण्यासाठी घोड्यावर मारुनमुटकून बसवलेल्या रमेश जाधव यांचाही बळीचा बकरा केला आहे.
मुळात जाधव हे काही डावखरे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नव्हते. जे तुल्यबळ उमेदवार होते, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नाही. निवडणुकीसाठी अर्ज भरताना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रमेश जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्मही दिला गेला नाही. त्यामुळे जाधव हे अपक्ष उमेदवार ठरले. ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य विधानपरिषदेसाठी मतदान करणार होते. शिवसेना-भाजप यांच्या तुलनेत कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मतदार जास्त होते. त्यामुळे डावखरे निवडून आले असतेच. पण निवडणूक लढवून ते जिंकले अशते तर त्यात खरी गंमत आली असती. पण शिवसेनेने लाढाईपूर्वीच रणांगणातून पळ काढला आणि आपली तलवार म्यान करुन टाकली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या एका प्रचार सभेत डावखरे यांच्या विरोधातील सीडी दाखविण्यात आली होती. त्यात डावखरे हे निवडणुक जिंकण्यासाठी मारा, झोडा काहीही करा, असे सांगत होते. शिवसेनेने या सीडीचे खूप भांडवल केले आणि डावखरे यांच्या विरोधात रान उठवले. मात्र हे सगळे इतक्या लवकर कसे विसरले गेले की कोणा दादा आणि बंटीचा ठाणे जिल्ह्यातील प्रभाव रोखण्यासाठी आणि आपलेही बस्तान बसविण्यासाठी डावखरे मदतीला असलेले बरे, या उद्देशाने तलवार म्यान केली गेली, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.
राजकारणी आणि राजकीय पक्ष हे गेंड्यांच्या कातडीचे आणि कोडगे असतात. जनाची नव्हेच पण मनाचीही त्यांना लाज नसते. आपल्या फायद्यासाठी ते कमरेचे सोडून डोक्यालाही गुंडाळतात आणि वर निर्लज्जपणे त्याचे समर्थनही करतात, असे सर्वसामान्य नागरिक आणि मतदार नेहमीच पाहत असतात. डावखरे यांना बिनविरोध निवडून देऊन शिवसेनेच्या नेत्यांनी तेच सिद्ध केले आहे.
No comments:
Post a Comment