शब्दभ्रमकला अर्थातच बोलक्या बाहुल्या म्हटले की आपल्या सर्वाच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे! दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून पाध्ये यांनी ‘अर्धवटराव आणि आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम रसिकांच्या अद्यापही स्मरणात आहेत. रामदास पाध्ये यांच्या पत्नी अपर्णाही त्यांना कार्यक्रमात साथ देत असतात. काळानुरूप पाध्ये यांनी आपल्या कार्यक्रमात आणि सादरीकरणातही बदल केले असून त्यांच्या बाहुल्या आजच्या पिढीलाही माहीत झाल्या आहेत.
‘टाटा स्काय’ने आमिर खानला घेऊन जी जाहिरात केली होती त्यात आमिर खानला रामदास पाध्ये यांचाच गेटअप देण्यात आला होता. हा रामदास पाध्ये यांच्या कलेचा गौरव आहे. अनेक जाहिरातीमधूनही रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तात्या विंचू’ ही बाहुली रामदास पाध्ये यांचीच होती. ‘शब्दभ्रम’ या कलेचा वारसा रामदास पाध्ये यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजीत याच्या रूपाने आता तिसरी पिढीही आपली कला लोकांपुढे सादर करत आहे. शब्दभ्रमकला सादर करणारी जी काही मोजकी मंडळी भारतात आहेत, त्यात रामदास पाध्ये यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागले. प्रचंड अभ्यास, मेहनत आणि अनुभवातून पाध्ये यांनी आज या क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
शब्दभ्रमकला आणि या बोलक्या बाहुल्यांचा भारतात जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि ही कला सादर करणारे नवीन कलाकार तयार व्हावेत, या उद्देशाने रामदास पाध्ये फाऊण्डेशनतर्फे ‘शब्दभ्रमकला आणि बाहुली नाटय़’ याचे प्रशिक्षण देणारी एक संस्था मुंबईत राधिका रेसिडेन्सी, ए - ३०१, लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ, म. फुले नगर, चेंबूर येथे सुरू होत आहे. या संस्थेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते आणि नाना पाटेकर यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी होत आहे.
या निमित्ताने ‘मुंबई वृत्तान्त’शी बोलताना रामदास पाध्ये यांनी सांगितले की, शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्या यांना सध्याच्या काळात जगभरातून खूप मागणी आहे. आपल्याकडे या कलेचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. या कलेची जाण असणारे आणि प्रत्यक्ष कार्यक्रम करणारे आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कलाकार आहेत. जोपर्यंत नवीन कलाकार या क्षेत्रात येत नाहीत, तोपर्यंत ही कला वाढू शकणार नाही. आमच्या फाऊण्डेशनतर्फे आम्ही शब्दभ्रमकलेबाबत शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करत असतो. त्यातून या कलेची प्राथमिक माहिती शिकवली जाते. मात्र ते प्रयत्न अपुरे आहेत.
अमेरिका, जपान, इंग्लंड इत्यादी देशांत या कलेचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र आपल्या देशात अशा प्रकारे प्रशिक्षण देणारी एकही संस्था नाही. त्यामुळे या कलेचे प्रशिक्षण देणारी एखादी कायमस्वरूपी संस्था असावी आणि नवीन कलाकार तयार व्हावेत या उद्देशाने आपण ही संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आमच्या या संस्थेत शब्दभ्रमकलेचे शिक्षण देणारा एक वर्षांचा अभ्यासक्रम असेल. तीन पातळ्यांवर हा अभ्यासक्रम असेल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा कोणत्याही भाषेतून त्याचे शिक्षण घेता येईल.
या अभ्यासक्रमाला आपण क्लासचे स्वरूप देणार नाही. त्यामुळे अभ्यासक्रमासाठी एका वेळेस फक्त दहा विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. कमी विद्यार्थी असल्याने आम्हाला प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देता येईल. मी आणि माझी पत्नी अपर्णा दोघेजण येथे शिकवणार असल्याचेही पाध्ये म्हणाले.
शब्दभ्रमकला किंवा बोलक्या बाहुल्या ही मुळात भारतीय कला आहे. आपल्याकडूनच ती परदेशात गेली. ही कला शिकण्यासाठी कठीण आहे. ज्याला शिकायची इच्छा आहे, त्याने यावर प्रचंड मेहनत आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. आज परदेशातूनही त्याला मागणी आहे. मी बोलक्या बाहुल्यांचे परदेशातही अनेक कार्यक्रम केले आहेत. जगभरातील अनेक देशांकडूनही आपल्याकडे बोलक्या बाहुल्या बनविण्यासाठी विचारणा केली जाते. जगभरात या कलेला खूप मागणी असल्याचा माझा अनुभव आहे. मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्या यात काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. विद्यार्थी आणि तरुणांनी या कलेकडे मोठय़ा संख्येत वळले पाहिजे. हा नफा मिळवून देणारा व्यवसाय होऊ शकतो, याची जाणीव तरुणांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही पाध्ये यांनी सांगितले.
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२२ मे २०१०) मध्ये पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)
No comments:
Post a Comment