वाट पाहणे, प्रतिक्षा करणे, आस लागणे, डोळे लावून बसणे, हुरहूर लागणे या मराठीतील शब्दप्रयोगाचा अनुभव यापूर्वी आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थितीत घेतला असेलच. प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी, अनेक महिने घराबाहेर राहिलेला मुलगा घरी येणार असेल तर वाट पाहणारी आई, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पती दौऱ्यावर गेला असेल तर वाट पाहणारी पत्नी, दहावी-बारावी किंवा तत्सम महत्त्वाच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी.. ही यादी आणखीही बरीच वाढवता येईल. सध्या सर्वजण पाऊस कधी येईल, त्याकडे डोळे लावून बसले आहेत. पण प्रत्यक्षात ‘घनघनमाला नभी दाटल्या परी कोसळती न धारा’ असा अनुभव सगळेजण घेत आहेत.
माणसाचे मन खरोखरच अनाकलनीय असते. त्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येत असतो. म्हणजे बघा ना, आत्ता अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे कधी एकदा पाऊस येतो आहे, असे वाटत असले तरी एकदा का पावसाळा सुरू झाला की तो नकोसा होतो. कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या एका कवितेत सर्वसामान्यांच्या या मनोवस्थेचे
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
अन दारात सायली
असे यथार्थ वर्णन केले आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आता धरणातील पाणीसाठाही संपत चालला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आला नाही तर लोकांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात तर पावसाचे महत्त्व सगळ्यात जास्त आहे. शेतकरी अर्थात बळीराजाही या दिवसात आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे.
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
हे आपल्याकडील पावसाची प्रतिक्षा करायला लावणारे पारंपरिक गाणे. गेली अनेक वर्षे लहान मुले याच गाण्याने पावसाची आळवणी करत आहेत.
दिवंगत ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनीही
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैशाचा घे खाऊ
दूर नको जाऊ
अशा शब्दांत त्याला आवाहन केले आहे.
तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी
सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय
अशा शब्दांत लहान मुलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक, कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनीही ‘मेघास’ या आपल्या कवितेत,
थांब थांब परतु नको रे घना कृपाळा
अजुनी जाळतोच जगा तीव्र उन्हाळा
अजुनी पायी भासतात पसरलेले निखारे
उसळतात अजुनी गगनी पेटलेले वारे
मरूनी पडतात तरूवरूनी पाखरे
असे म्हटले आहे.
या कवितेच्या शेवटी पावसाला आवाहन करताना ते म्हणतात,
गर्जत ये, ओढित ये, आसूड तडीतेचा
गवरेन्मत्त माथा तो नमव भास्कराचा
लोकाग्रणी नमवी जरा मातल्या नृपाळा
‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्या ‘गदिमा’ यांनी ‘आज कुणीतरी यावे’ या गीतात प्रेयसी प्रियकराची कशी आतुरतेने वाट पाहत आहे, त्याचे वर्णन केले आहे. त्या गाण्यातील एका कडव्यात
जशी अचानक या धरणीवर
गर्जत यावी वळवाची सर
तसे तयाने यावे
आज कुणीतरी यावे
असे म्हटले आहे. हे वर्णन पावसाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्य माणसांबरोबरच शेतक ऱ्यालाही तंतोतंत लागू पडते. गदिमांनीच लिहिलेल्या एका धनगरी गीतात त्यांनी पाऊस येऊ दे अशी विनवणी केली आहे. ते म्हणतात,
आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती
आता पाऊस पाड गा
पाऊस पाड..
मराठवाडय़ातील प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनीही आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आणि पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्याचे मनोगत
भरू दे यंदा मृगाचं आभाळ
नावाचा तुझ्या यळकोट करीन
पीकू दे यंदा धनधान्याची रास
नावाचा तुझ्या येळकोट करीन
अंगावर चढू दे मुठभर मास
नावाचा तुझ्या येळकोट करेन
अशा शब्दांत व्यक्त केले आहे.
तर कवी राम मोरे यांनी
पवन अती दाहक हा
छळी मजला तूच पाहा
रात रात लोचनात नीज येईना
बरस रे घना, बरस रे घना
अशी आर्त हाक पावसाला घातली आहे.
‘आठवणीतील गाणी’ या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातही पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या दोन कविता असून त्याचे कवी अज्ञात आहेत. यातील ‘सृष्टीचे चमत्कार’ या कवितेत कवीने
वैशाखमासी प्रतिवर्षी येती
आकाशमार्गे नव मेघपंक्ती
नेमेची येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
असे सांगितले आहे.
तर अन्य एका कवीने ‘शेतकरी व भाताचे पीक’ या कवितेत
किती ऊन कडकडीत पडले पाहा
सुकली की सर्वाची तोंडे अहा
कधी कोसळेल समजेना मेघ हा
अशी संवेदना व्यक्त केली आहे. कवी वसंत सावंत यांनी
असा मत्त पाऊस यावा मृगाचा
उरींचे उन्हाळेच जावे लया
अशी वीज झाडातूनी कोसळावी
झळातून जन्मास यावे पुन्हा
असे वर्णन केले आहे.
शांताबाई शेळके यासुद्धा पावसाला ये अशी प्रेमाने विनंती करताना म्हणतात,
ये रे ये रे पावसा
नको दूर राहू
कवळाया तुला
पसरले बाहू
कधीची उभी मी
पदर कसून
नको रे लाडक्या
जाऊ तू रूसून..
कवी आरती प्रभू यांनीही
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना..
अशी पावसाला साद घातली आहे.
आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणे अजरामर झाले आहे.
सर्वसामान्यांप्रमाणेच शेतकरीवर्गही पावसाकडे डोळे लावून बसलेला असतो. आपल्याकडे असा एक समज आहे की, ‘पावशा’ पक्षी दिसला की पाऊस येतो. जणू काही या पक्षाला पावसाची चाहूल लागलेली असते. हा पक्षी ओरडायला लागला की, शेतकरी शेतीची अवजारे काढून पेरणीसाठी सज्ज होतो. बहिणाबाई चौधरी यांनीही ‘पेरनी’ या कवितेत शेतकऱ्यांच्या भावना समर्पक शब्दांत व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात,
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेरते व्हा रे
पेरते व्हा रे
पेरनी पेरनी
आले आभाळात ढग
ढगात वाकडी
ईज करे झगमगाट
काही वेळेस आकाशात नुसतेच ढग येतात, सोसाटय़ाचा वारा सुटतो आणि हे सर्व ढग दूर कुठेतरी निघून जातात. त्याबाबत बहिणाबाई सांगतात,
पेरनी पेरनी
आभाळात गडबड
बरस बरस
माझ्या उरी धडधड
यंदाच्या वर्षी हवामान खात्याने पाऊस लवकर येणार असल्याचे जाहीर केले आहे. नैऋत्य मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखलही झाला असून ३० मेपर्यंत हा पाऊस केरळमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर सात दिवसात म्हणजे ७ जूनला तो मुंबई-कोकणात येईल, असा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी तरी हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरो, अशी प्रार्थना प्रत्येकजण देवाजवळ करत आहे. आता जो पाऊस सुरू होईल तो धो धो पडावा अशीच भावना सर्वाची आहे. पाहू या काय होते ते..
(माझा हा लेख लोकसत्ता, रविवार वृत्तान्तमध्ये ३० मे २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)
No comments:
Post a Comment