मुंबई आणि डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी कोणाही सुजाण आणि संवेदनशील माणसाचे मन हळहळल्यावाचून राहणार नाही. सातवी, सहावी आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱया या मुलांनी आपले जीवन संपवले. परिक्षेत चार विषयात नापास झाला म्हणून एकाने, तर नृत्याचा क्लास बंद करुन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे घरच्यांनी सांगितले म्हणून एका मुलीने आणि दोन विषयात नापास झाल्यामुळे एमबीबीएस करणाऱया एका तरुणीने आत्महत्या केली. अशा प्रकारच्या दुर्देवी घटना अधूनमधून आपल्या सभोवताली घडत असतात. आपण त्या वाचतो आणि सोडून देतो. साध्या आणि क्षुल्लक वाटणाऱया या घटनांमध्ये या मुलांनी आयुष्य संपविण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला हे कळत नाही.
परीक्षेतील किंवा प्रेमातील अपयश, नोकरीतील जाच, वरिष्ठांचा त्रास, मानहानी, अपेक्षित यश न मिळणे, नोकरीच नसणे, सततचे आजारपण, घरातील भांडणे आणि कटकटी, कुटुंबातील बेबनाव, सर्व क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, जीवनातील नैराश्य आदी आणि या सारख्या काही कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. याला केवळ त्या व्यक्ती जबाबदार आहेत की आजूबाजूचा समाज, बदलती जीवनशैली, सभोवतालचे वातावरण, प्रसारमाध्यमे, हिंदी चित्रपट, मालिका, परस्परातील हरवलेला संवाद, अधिकाधीक मिळविण्याचा हव्यास, कोणत्याही गोष्टीत समाधान नसणे आदीही घटक त्यास कारणीभूत आहेत. खऱेतर आपण सर्वानीच याचा गंभीरपणे विचार करण्याची आज वेळ आली आहे.
बहुतेक घरातून आई-वडील नोकरीसाठी बाहेर आणि घरात मुले एकेकटी असे चित्र दिसते. करिअर आणि नोकरी, पैसा यातून पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. घरातील सदस्यांमध्ये संवाद नाही. मित्र, चित्रपट, हिंदी मालिका, मौज, मजा आणि मस्ती असे एक चित्र हल्लीच्या मुलांमध्ये दिसून येत आहे. अर्थात याला काही अपवाद असतीलही. लाहनसहान कारणा वरुन चिडचिड करणे, मोठ्यांचे न ऐकणे, आपलेच म्हणणे खरे करणे, शिक्षण आणि करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाटेल ते करणे असेही काही जणांच्या बाबतीत घडते. कदाचित अशा काही घटनांमधून मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असेल. आपण अपेक्षित यश मिळवले नाही, अभ्यासात मागे राहिलो तर आई-वडील ओरडतील, ही भीती कदाचित मुलांच्या मनात असेल.
खरे म्हणजे आपण अजूनही जो मुलगा अभ्यासात हुशार तोच श्रेष्ठ, या मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही. सध्याच्या जगात चांगली नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास आणि किमान पदवी पर्यंतचे शिक्षण आणि त्यानंतर काही अभ्यासक्रम करणे आवश्यकच आहे. पण एखाद्या मुलाला अभ्यासात गती नसेल, त्याची आवड नसेल पण तो अन्य एखाद्या कलेत निष्णात असेल, त्यात तो अन्य अभ्यासू मुलांपैक्षा जास्त हुशार असेल, तर त्यात चुकीचे काय आहे. त्याला त्या विषयाच पुढे येऊ द्या. त्याच्यातील सुप्तकलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यात त्याला यशाचे शिखऱ गाठू द्या, बिघडले कोठे. पण तसे घडत नाही,. कधी कधी आई-वडिलांच्या इच्छेखातर मुलांना आवड आणि कुवत नसतानाही कॉमर्स, मेडिकल, किंवा इंजिनिअरिंगला पाठवले जाते. का, त्याला त्याचा आवडीचा विषय निवडू द्या ना. आपल्या इच्छा त्यांच्यावर आपण का लादतो.
खरे म्हणजे आपल्या मुलाचा नेमका कल आणि आवड लक्षात घेऊन त्याला त्याचा मार्ग निवडू द्यावा. परिक्षेतील यश म्हणजे सर्वस्व नाही किंवा तो जीवनमरणाचा प्रश्न नाही, परमेश्वराने दिलेला माणसाचा जन्म असा अविचाराने एका क्षणात वाया घालवू नका, कोणत्याही अपयशाने निराश न होता झाले ते झाले, अजून वेळ गेलेली नाही, पुन्हा प्रयत्न करु या, असे या मुलांवर बिंबवण्याची गरज आहे. बाहेरच्या जगात जे काही घडेल, त्यामुळे निराश आणि वैफल्यग्रस्त न होता पहिल्यांदा तुझ्या मनात जे काही आहे, ते आमच्याशी किंवा घरातील मोठ्या माणसांशी, बरोबरीच्या मित्रांशी मोकळेपणाने बोल, अशी शिकवण मुलांना द्यायला पाहिजे. पालकांनी तसा विश्वास आपल्या मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे. एखाद्यापाशी आपले मन मोकळे केले की मनावरचा ताण आणि दडपण, नैराश्य नाहीसे होते, याचे बाळकडून लहानपणापासूनच आपल्या मुलांना द्या.
यश हे सर्वस्व नाही. ते मिळाले तरी आनंद आणि नाही मिळाले तरी आनंद, जे मिळाले असेल त्यात समाधानी राहायला शिका. आपल्यापेक्षा वरती असलेल्या माणसाकडे पाहण्यापेक्षा जो माणूस आपल्यापेक्षा एक पायरी खाली आहे, त्याच्याकडे पाहा. जगण्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. प्रत्येक घराघरांमधून तसे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. तसे झाल तर अशा घटना टाळता येऊ शकतील. हे जीवन सुंदर आहे, ते क्षुल्लक कारणावरुन संपवू नका...
No comments:
Post a Comment