30 January 2010

मागोवा महाराष्ट्राचा

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांचा समग्र मागोवा घेणारी पन्नास पुस्तके प्रकाशित करण्याचा पुण्याच्या ‘डायमंड पब्लिकेशन्स’चा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला असून ३१ जानेवारी रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. ‘डायमंड पब्लिकेशन्स’चे दत्तात्रय पाष्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राचा समग्र मागोवा आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल आस्था असणारे रसिक, विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्यांसाठीही ही सर्व पुस्तके म्हणजे आपली संस्कृती, इतिहास, सद्यस्थिती यांचा संदर्भ ठेवा ठरणार आहे.



महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने काहीतरी वेगळे करण्याचे पाष्टे यांच्या मनात होते. पाष्टे यांनी २००५ मध्ये ‘डायमंड पब्लिकेशन्स’ची स्थापना केली आणि अल्पावधीतच शैक्षणिक पुस्तके व कोशवाङ्मय प्रकाशित करणारे एक दर्जेदार प्रकाशक म्हणून त्यांनी आपली आणि आपल्या प्रकाशन संस्थेची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आत्तापर्यंत त्यांनी सुमारे साडेचारशे पुस्तके प्रकाशित केली असून तीस कोशही प्रकाशित केले आहेत. पाष्टे यांच्या घरी पुस्तक प्रकाशन व्यवसायची परंपरा नव्हती. पाष्टे यांनी स्वत: पुण्याच्या स. प. महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काही वर्षे नोकरी केली. नोकरी सोडून देऊन नंतर ते पुस्तकविक्री व्यवसायात उतरले. गेली २५ ते ३० वर्षे ते पुस्तकविक्रीच्या व्यवसायात आहेत. तेव्हा ते अन्य प्रकाशकांची पुस्तके विकत होते. या व्यवसायातील अनुभवानंतर त्यांनी स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु करण्याचे ठरवले आणि जिद्दीने ते यात उतरले. सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि मुख्यत्वे कोशवाङ्मय प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून त्यांची ख्याती आहे.


‘डायमंड पब्लिकेशन्स’ प्रकाशित करणार असणाऱ्या या पुस्तकांच्या नावावरुन केवळ एक दृष्टीक्षेप टाकला तरी हे काम किती मोठे आहे, त्याची कल्पना येऊ शकते आणि केवळ पुस्तकांच्या नावावरुन पुस्तकात काय आहे, ते सहज कळू शकते. ठरविण्यात आलेल्या प्रत्येक विषयावर तज्ज्ञ लेखक/अभ्यासकाकडून ते पुस्तक लिहून घेण्यात आले आहे. रविकिरण साने, निलिमा साने, डॉ. शुभदा कुलकर्णी, डॉ. श्री. वि. कडवेकर, प्रा. पद्माकर प्रभुणे, प्रा. शिल्पा कुलकर्णी, मंजुषा जोशी-पाटील, संभाजी पाटील, वि. ना. होनप, प्रा. गणेश राऊत, प्रा. सु. ह. जोशी, प्रा. ज्योती राऊत, प्रा. डॉ. शुभांगना अत्रे, प्रा. कल्पना रायरीकर, सौमित्र केंजळे, प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म.रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक, अनिल बळेल, डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर, प्रा. एस. व्ही. ढमढेरे, डॉ. सुनील मायी, डॉ. आरती दातार, य. न. केळकर, ज. शं. आपटे, प्रा. शैलजा सांगळे, ऋता बावडेकर, संजय कोल्हटकर, प्रसाद कुलकर्णी, डॉ. एम. आर. कुलकर्णी, डॉ. द. ग. देशपांडे, शिल्पा कुलथे, सुहास आगरकर, अनुजा जोशी, प्रा. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. डॉ. शरद आहेर, प्रा. डॉ. बालाजी पोटे, जयप्रकाश झेंडे, डॉ. नीलम ताटके, प्रा. मंजिरी भालेराव, प्रा. डॉ. एम. यू. मुलाणी, प्रतापराव अहिरराव, निलिमा शिकारखाने, एस. के. कुलकर्णी, प्रा. डॉ. शौनक कुलकर्णी, प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. राजा दीक्षित, डॉ. दुर्गा दीक्षित या लेखक मंडळींनी या पुस्तकांचे लेखन केले आहे.


या प्रकल्पात महाराष्ट्राचे शासन व राजकारण, महाराष्ट्रातील संगीत परंपरा, उद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास, महाराष्ट्राचे समाजशास्त्र, महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्वे, महाराष्ट्रातील पर्यटन, महाराष्ट्र दिनविशेष, महाराष्ट्रातील लेणी, महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास, महाराष्ट्र संस्कृती-१८१८ पर्यंत, मध्ययुगीन महाराष्ट्र, मराठय़ांचे इतिहासकार, मराठय़ांचा इतिहास-साधन परिचय, उज्ज्वल महाराष्ट्रासाठी-भाग १ व २ (आर. आर. पाटील यांच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील निवडक भाषणांचा संग्रह), महाराष्ट्र-समाज व संस्कृती, मराठे आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील वक्ते, महाराष्ट्राची मंदिरशैली, महाराष्ट्रातील जलसंपदा, महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, महाराष्ट्रातील गरीबी, महाराष्ट्रातील संत परंपरा, ऐतिहासिक पोवाडे, महाराष्ट्राची लोकसंख्या-नियोजन आणि विकास, महाराष्ट्रातील महिला उद्योजक, लढा संयुक्त महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील प्रमुख संपादक, महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमे-काल आणि आज, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरदार घराणी, महाराष्ट्रातील किल्ले, महाराष्ट्रातील वैभवशाली दागिन्यांची परंपरा, महाराष्ट्रातील पंथ, महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास, महाराष्ट्रातील खेळ-आजचे आणि कालचे, महाराष्ट्रातील उद्योजक, महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार, महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील देव-देवता, महाराष्ट्रातील आधुनिक संत, महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र, महाराष्ट्रातील आदिवासी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील संत कवयित्री, महाराष्ट्रातील संतकवी, महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र संस्कृतीकेश, १९ व्या शतकातील महाराष्ट्र-मध्यमवर्गाचा उदय अशा विविध आणि सर्वकष विषयांचा समावेश आहे.

 
या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत ‘मुंबई वृत्तान्त’ला माहिती देताना पाष्टे यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकल्पासाठी मला आमच्या प्रकाशन संस्थेतील सर्व कर्मचारी व सहकारी, डॉ. अ. रा. कुलकर्णी (जे नुकतेच दिवंगत झाले), प्रा. सु. ह.जोशी आणि आमचे सर्व लेखक तसेच या पन्नास पुस्तकांची मुखपृष्ठे करणारे शामकांत भालेकर आणि सर्वाच्या सहकार्यानेच हा प्रकल्प आज पूर्ण होत आहे. कोशवाङ्मय प्रकाशित करण्याची आमची परंपरा असली तरी हा विषय आम्हाला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा होता. या पन्नास पुस्तकांची सर्व पाने एकत्रित केली तर ही संख्या सुमारे नऊ हजार इतकी होत आहे. हे सर्व खंड स्वरुपात प्रकाशित केले असते तर त्याची किंमतही हजारो रुपये ठेवावी लागली असती. हे सर्व विषय विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत जावेत आणि त्यांना ही पुस्तके खरेदी करता यावीत, या उद्देशाने मोठे खंड किंवा कोश न करता हे सर्व विषय स्वतंत्रपणे पुस्तकस्वरुपात प्रकाशित करण्याचे आम्ही ठरवले. किमान १०० आणि कमाल ३२८ अशी या पुस्तकांची पृष्ठसंख्या असून यातील फक्त एक पुस्तक सर्वात जास्त म्हणजे ७०० पानांचे आहे. या प्रकल्पातील पुस्तकांची किंमत अगदी ३० रुपये किमतीलाही एक पुस्तक असून अन्य काही पुस्तकांच्या किंमती ७०, ७५, १२५, १५०, २००, २५० रुपये अशा आहेत. तर काही मोजक्या पुस्तकांच्या किंमती ४००, ४२५, ५००, ७५० अशा आहेत.
 
 
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने आम्ही हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला तेव्हा गेल्यावर्षी १२ आणि गेल्या सहा महिन्यात ३८ पुस्तकांचे काम आम्ही मार्गी लावले. आम्ही जे विविध विषय ठरवले होते त्यापैकी ‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था’ हे एक पुस्तक मात्र पूर्ण होऊ शकले नाही. येत्या ३१ जानेवारी रोजी पुण्यातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार असून आमदार उल्हास पवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी कुलगुरु डॉ. शं. ना. नवलगुंदकर आणि ‘लोकसत्ता’ (पुणे)चे निवासी संपादक मुकुंद संगोराम हे यावेळी प्रमुख पाहुणे तर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही पाष्टे यांनी सांगितले.
 
 
माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये ३० जानेवारी २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=43665:2010-01-29-15-12-59&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

No comments:

Post a Comment