पुणे येथे येत्या मार्च महिन्यात होणाऱया ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या हस्ते होणार आहे. लोकसत्ताच्या प्रतिनिधी म्हणून मला या निमित्ताने विंदांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा करता आल्या. विंदांचे वय आज ९२ वर्षे आहे, वयोपरत्वे आता मला जास्त वेळ बोलणे आणि बसणे शक्य होत नाही. त्यामुळे पाच ते दहा मिनिटेच मी बोलू शकेन. चालेल ना. मराठी साहित्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर पाच ते दहा मिनिटे का होईना आपल्याला बोलायला मिळते आहे, हा एक चांगला योग होता. मी त्यांना हो म्हटले आणि बुधवारी सकाळी विंदांच्या घरी ही भेट ठरली.
विंदांशी वांद्रे येथील साहित्य सहवासमधील त्यांच्या निवासस्थानी मी बरोबर साडेअकरा वाजता पोहोचलो. घरी स्थानापन्न झाल्यानंतर पाढंराशुभ्र लेंगा व हाफ कु़डते अशा वेशात विंदा हॉलमध्ये प्रवेश करते झाले. गप्पांच्या सुरुवातीला साहित्य संमेलनाचे उद््घाटन तुमच्या सारख्या कवीच्या हस्ते होत आहे, ही चांगली सुरुवात असल्याचे सांगून मी बोलायला सुरुवात केली. त्यावर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राजकारणी किंवा मंत्र्यांना बोलाविण्याची आजवरची परंपरा होती. माझ्यामुळे ती आता मोडली जाणार असल्याचे ते मिश्कीलपणे म्हणाले.
हा योग कसा जुळून आला, त्याबाबत विचारले असता विंदा म्हणाले की, संमेलन आयोजकांनी प्रत्यक्ष भेटून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितले की, उद्घाटन कार्यक्रमाला भाषण वगैरे करणार नाही. काव्यवाचन करेन आणि तेच संमेलनाचे उद्घाटन असेल. तुम्हाला चालेल का? संमेलन आयोजकांनीही त्यास मान्यता दिल्यामुळे मी या आमंत्रणाचा स्वीकार केला.
माझ्याच काही कवितांचे वाचन मी या वेळी करणार असून तो कार्यक्रम म्हणजेच साहित्य संमेलनाचा उद््घाटन सोहळा असेल. आता वयोपरत्वे काव्यवाचनाचे कार्यक्रम मी करत नाही. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा एक मोठा सोहळा असतो. हजारो रसिक, वाचक आणि साहित्यप्रेमी तेथे उपस्थित असतात. हे साहित्य संमेलन आपल्या मराठी भाषेचे, वाङ्मयाचे असते. त्यामुळे मराठी भाषेसाठी कर्तव्य म्हणून या वयात मी संयोजकांचे हे आमंत्रण स्वीकारले, असेही विंदानी सांगितले.
पूर्वी मी अडीच ते तीन तास इतका वेळ काव्यवाचनाचे कार्यक्रम करत असे. आता वयोपरत्वे इतका वेळ बसणे, बोलणे शक्य होत नाही. तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमात अर्धा ते पाऊतास मी काव्यवाचन करेन. कोणत्या कविता वाचायच्या, ते ठरवले आहे का, असे विचारले असता, विंदा म्हणाले की, असे काही ठरवलेले नाही. ज्या नेहमी वाचतो आणि सगळ्यांना माहितीच्या आहेत, त्या कविता सादर करेन.
गप्पांच्या ओघात आपण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला असलेल्या सरखोतांच्या चाळीत राहात होतो. माझी पत्नी सुमा तेव्हा कल्याणला शाळेत नोकरी करत होती आणि मी नोकरीसाठी मुंबईला येत होतो. काही महिने आम्ही डोंबिवलीला राहिलो. त्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्तानेही मी डोंबिवलीला आलो होतो, अशा आठवणीनाही विंदानी या वेळी उजाळा दिला.
सध्या नवीन काही लिखाण करता का, या प्रश्नावर ते म्हणाले की, नाही हो, नवे लेखन करणे काही वर्षांपूर्वीच थांबवले. त्यामुळे सध्या नवीन कविता लेखन काही नाही. दिवाळी अंकातून माझ्या काही कविता येत असल्या तरी त्या जुन्याच असतात. खरे सांगू का ओढूनताणून अवसान आणायला मला पटत नाही. तो खोटेपणा वाटतो.
विंदांनी भेटण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचाच वेळ दिला होता. गप्पांच्या ओघात वेळ संपत आली तेव्हा त्यांनीच त्यांच्या परखड स्वभावानुसार त्याची जाणीव करुन दिली. वयोपरत्वे आता फार वेळ बोलता आणि बसता येत नाही, म्हणूनच वेळेची ही मर्यादा घालावी लागते असे सांगून मी आता थोडा वेळ विश्रांती घेतो असेही ते प्रांजळपणाने सांगून टाकतात. वयोपरत्वे ते थकले असले, आवाजही थोडा हळू झाला असला तरी त्यांचे विचार व मूल्यांतील ठामपणा आणि नवीन काही करण्याची जिद्द, गप्पा मारण्याचा उत्साह आजही कायम आहे. त्याची प्रचिती या गप्पांमधूनही येत होती.
गप्पांचा समारोप करताना विंदानी ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ ही आपली गाजलेली कविता त्याच उत्साहात आणि खणखणीत आवाजात म्हटली आणि मराठी साहित्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाशी झालेली ही छोटेखानी भेटही लाखमोलाची ठरली...
विंदाशी झालेल्या या गप्पांच्या आधारे मी केलेली बातमी लोकसत्ता, ७ जानेवारी २०१०च्या मुख्य अंकात पान क्रमांक चारवर प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=37830:2010-01-06-16-59-51&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
Lucky
ReplyDeleteहरेकृष्णजी
ReplyDeleteधन्यवाद