11 January 2010

नाहक वाद

आमीर खानची प्रमुख भूमिका असलेल्या थ्री इडियट्स हा चित्रपट सध्या चर्चेत आणि वदाता सापडला आहे. मुंबई आणि परिसरात सध्या विद्यार्थ्यांच्या ज्या आत्महत्या घडत आहेत, त्यास हा चित्रपट कारणीभूत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. चित्रपटात रॅगींग दाखविण्यात आलेले रॅगिंग, चित्रपटात एका विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि अन्य काही बाबी या खटकणाऱया असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. हा चित्रपट मी ही पाहिला. परंतु चित्रपटात कुठेही रॅगींगचे उदात्तीकरण करण्यात आलेले नाही. तसेच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या कराव्यात, असे या चित्रपटात काहीही नाही, असे मला वाटते. या चित्रपटाचे प्रदर्शन आणि सध्या होणाऱया आत्महत्या  हा निव्वळ योगायोग आहे समजा आत्ता हा चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर कदाचित या आत्महत्यांना या चित्रपटाला जबाबदार धरले गेले नसते. चित्रपटावरुन वाद निर्माण करण्यासारखे किंवा त्यावर बंदी घालण्यासारखे काहीही आक्षेपार्ह असे या चित्रपटात नाही.


चित्रपटातील रॅगींगची दृश्ये काही जणांना आक्षेपार्ह वाटू शकतील. परंतु चित्रपटात जे दाखवले आहे, त्यापेक्षाही भयानक आणि अश्लील प्रकारे सिनिअर्स विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांचे रॅगींग केले जाते. मेडिकल आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, हॉस्टेल येथे ते नियमित घडत असते. कधी वृत्तपत्रांच्या माध्यमातून असे प्रकार सगळ्यांना माहिती होतात. मुळात अशा प्रकारे रॅगींग करणे हेच चुकीचे आहे. नव्या विद्यार्थ्यांची थोडक्यात गंमत केली तर ठिक आहे. पण थोडक्यात गंमत आणि रॅगींग यातील अंतर कधी पुसले जाते, हेच गंमत करणाऱयांना कळत नाही. कधी तर असे प्रकार मुद्दामहून केले जातात.


त्यामुळे थ्री इडियट्समध्ये जे दाखवले आहे, ते नेहमीच आपल्या आजूबाजूला घडणारे आहे. त्यात नवीन काही नाही. आता कोंबडी आधी की अंडे आधी त्याप्रमाणे समाजातील घटनांचे प्रतिबिंब चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून उमटते की यात जे दाखवतात त्याचे अनुकरण समाज करत असतो हा नक्कीच वादाचा मुद्दा होऊ शकतो. चित्रपटात आमीर खानची व्यक्तिरेखा जे सांगतेय तेही काही चुकीचे नाही. आजच्या शिक्षणपद्धतीत आपण केवळ यांत्रिकपद्धतीने विद्यार्थी घडवत आहोत, केवळ पुस्तकी आणि परीक्षेतील मार्क म्हणजे त्या मुलाची/मुलीची हुशारी असेच आपण समजत आहोत. दहावी, बारावी तर जाऊ दे पण अगदी त्या खालच्या वर्गातूनही मुलांमध्ये आपण जीवघेणी स्पर्धा आज पाहतो आहोत. सगळेच रॅटरसेमध्ये आहेत. आपला मुलगा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगलाच जायला पाहिजे, असा सगळ्या पालकांचा तरी अट्टाहास का, आपल्या इच्छा आपण का म्हणून मुलांवर लादायच्या, असे अनेक प्रश्न आजही समाजात चर्चिले जात आहेत. शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर, मानसोपचार तज्ज्ञ यांनीही अभ्यास आणि मिळणारे यश यातील ही जीवघेणी स्पर्धा चुकीची असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे.
शी

थ्री इडियट्समधील आमीर खान तेच तर सांगतोय असे म्हणतात की एखादी गोष्ट किंवा सल्ला शिक्षक, आई-वडील किंवा मोठ्या माणसांनी दिला तर तो मुलांच्या पचनी पडत नाही. पण चित्रपट, नाटक किंवा एखाद्या मोठ्या सेलिब्रेटीकडून जर असा सल्ला दिला गेला तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो. चित्रपटाच्या द्वारे आमीर तेच सांगतोय. आई-वडिलांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू नका, त्याला ज्या विषयात आवड असेल तो विषय आणि तो अभ्यासक्रम त्याला करिअर म्हणून निवडू द्यावा. मुलांनीही आपले पालक, शिक्षक यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, पालकानाही आपल्या मुलांना नेहमी विश्वासात घ्यावे. काहीही झाले तरी आपण आपल्या जीवाचे बरेवाईट करणार नाही, असे वचन आमीरखान चित्रपटातील आर. माधवनकडून घेतो. त्यासाठी त्याच्या पाकिटात त्याच्या आई-वडिलांचा फोटो ठेवतो आणि आत्महत्येचा विचार मनात आला तर पहिल्यांदा आई-वडिलांच्या या फोटोकडे पाहा, असा सल्ला तो देतो.


आजची शिक्षणपद्धती, रॅगींग आणि अन्य संबंधित विषय यात मनोरंजकतेने हाताळले आहेत. खरे तर आत्महत्येसारखा विचार मनात येण्यापूर्वी आपल्या पाल्याने किमान आपल्याशी बोलावे इतका विश्वास आपण त्याच्या मनात निर्माण केला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे निराशेने न पाहता आनंदाने पाहायला शिकले पाहिजे. अधाशी आणि असमाधानी वृत्ती सोडून जे मिळाले  आहे त्यात आनंद मानायला शिकले पाहिजे. नेहमी आपल्यापेक्षा वरच्या माणसांकडे पाहण्यापेक्षा आपल्यापेक्षा जे काही पायऱया खाली आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जीवनाकडे नेहमी आशेने, आनंदाने पाहायला शिकले पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे.


मराठीतील एक ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता मला या ठिकाणी आठवतेय. सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत. खूप सुंदर कविता आहे. खरे तर प्रत्येकानेच ती आपल्या मनावर कोरुन ठेवायला पाहिजे.  सगळ्यांसाठी मी ती कविता येथे देत आहे.


तेव्हा विचार करा आणि आपल्या मनाशी ठरवा...     

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!


डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!


काळ्याकुट्ट काळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!


पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!


पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.

      

6 comments:

  1. अप्रतिम भाष्य शेखरजी..सलाम

    ReplyDelete
  2. सुहासजी
    नमस्कार
    आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. खऱ सांगू मला तो चित्रपट पाहिल्यानंतर जे वाटले ते लिहिले. काही कारण नसताना नाहक वाद निर्माण करण्यात काय अर्थ आहे.
    शेखर

    ReplyDelete
  3. > डोळे भरुन तुमची आठवण
    > कोणीतरी काढतंच ना?
    >
    ही एक अजीर्ण होईल इतकी गोऽड-गोऽऽऽड पाडगावकरी प्रचारकी थाटाची कविता आहे; पण त्यामुळे काही आत्महत्या कमी होत असतील किंवा लोकांना आनन्द, धीर वगैरे मिळत असेल, तर काय हरकत?


    "जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे निराशेने न पाहता आनंदाने पाहायला शिकले पाहिजे." असं काही करता येतं यावर तुमचा विश्वास आहे? 'प्रत्येक' गोष्टीकडे आनंदाने पहा? अहो कसं शक्य आहे? ही तर पाडगावकरी शैली झाली. आनंदाइतकाच निराशाही आयुष्याचा भाग आहे. ती भीषण असू शकते.

    अनेक लोकांनी आत्महत्या केला तर तो प्रश्न समज़ावा, किंवा समाज़ातल्या दोषामुळे हे घडू शकेल, हे मला मान्य आहे. तरीही मी अशा कितीही बातम्या ऐकल्या तरी कोरडा राहतो. आणि बरेचदा त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही, हे सत्य आहे. माझ्या एका मित्रानी (अनेक वर्षांपूर्वी) गळफास लावला. आम्हां मित्रांना दु:ख झालं. पण ते दु:ख इतर कोणाला ज़ाणवावं अशी माझी अपेक्षा नाही. या गोष्टी होतातच. तो तशी धमकी देत होता. वडिलांनी प्रयत्न केला. मानसोपचार वाल्याकडे घेऊन गेले. फायदा झाला नाही. 'नामू परीट' मधे एक बासरी वाज़वणारा शामू कुलकर्णी कोण्या कमलनी फसवलं म्हणून आत्महत्या करतो. नामू परीटाची प्रतिक्रिया साधी आहे : 'भित्रं तिच्या आयला.' हे नामूचं 'प्रत्येक गोष्टीकडे आनंदाने पाहणे' झालं बुवा.

    स्कायलॅब जुलै १९७९ सुमारास कोसळली तेव्हा मोरारजी देसाईंनी 'याबाबत सरकार काही करू शकत नाही, आणि करणार नाही' अशी टिप्पणी केली होती. निरक्षर जनतेच्या एका नेत्यानी असं उघड बोलावं का, हा प्रश्न रास्त आहे. पण देसाईंची प्रतिक्रिया काटेकोररित्या पाहिल्यास बरोबर होती.

    आता हे आत्महत्या प्रकरण. सरकार त्याबाबत काही करू शकत नाही. एखाद्‌या मंत्र्याला त्यबाबत विचारलं तर त्यानी खणखणीत आवाज़ात पाडगावकरांच्या दोन ओळी फेकून पुढल्या कामाला लागावं.

    ReplyDelete
  4. नानीवडेकर
    नमस्कार
    आपण लेख वाचून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.
    १)पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता मला खूप आवडते. आपल्याला ती पाडगावकरी शैलीतील गोड गोड कविता वाटत असली तरी मला तरी तशी ती वाटत नाही. अर्थात हे आपले मत झाले.
    २)आनंदाइतकीच निराशेचीही भावना प्रत्येकाच्या जीवनात येते हे मला मान्य. निराशेबरोबरच काही वाईट घटनाही आपल्या आयुष्यात घडत असतात.ज्याच्यावर हा प्रसंग येतो, त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना व जवळच्या मंडळींना तो सहन करावा लागतो. त्यामुळे निराशा किंवा वाईट घटना घडली तरी त्याकडेही आनंदाने पाहा, असे सांगायला दुसऱयांचे काय जाते, असे म्हणण्याचा माझा उद्देश नाही. मला इतकेच म्हणायचे होते की जे घडून गेले ते घडून गेले, त्याची काळजी, चिंता करु नका. त्यात कुढत बसू नका. म्हणजे काळजी वाटूनच घ्यायची नाही, असेही नाही किंवा एखादी वाईट घटना घडली तर वाईट वाटून घेऊ नका, असा प्रसंगही मजेत घ्या,हसत राहा,असेही मला म्हणायचे नाही. अशा निराशेतून किंवा वाईट प्रसंगातून त्या व्यक्तीने लवकरात लवकर सावरावे इतकाच हे लिहिण्यामागचा उद्देश आहे. अशा प्रसंगात माणसे जीवाचे बरेवाईट करुन घेतात, वैफल्यग्रस्त होतात तसे त्यांनी आपल्याबाबतीत घडू देऊ नये, इतकचे माझे म्हणणे आहे.
    असो. आपल्या मार्मिक आणि सविस्तर टिप्पणीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
    शेखर जोशी

    ReplyDelete
  5. शेखरजी, अतिशय सुंदर झालाय लेख.

    ReplyDelete
  6. तुमचा लीहलेल खरेच आहे. या चित्रपटातून लोक खरेच कांही घेत नाहित. त्यातले चांगल्या भागांचे उदात्तीकरण का केले जात नाही हा प्रश्न आहे.

    ReplyDelete