संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील तर प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता. दोघांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि भाषाही वेगळी. पण तरीही त्यांच्या विचारात आणि तत्वज्ञानात साम्य आहे, असे सांगितले तर कदाचित त्यावर पटकन विश्वास बसणार नाही. पण आता या दोघांचे तत्वज्ञान आणि विचार यांचे साम्य व तुलना करणारा ग्रंथच अभ्यासक आणि संशोधकांसाठी उपलब्ध झाला आहे. त्या ग्रंथात या दोघांच्या तत्वज्ञानातील साम्य उलगडण्यात आले आहे..
ज्ञानेश्वरांनी निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला आहे. माणूस आत्मसाक्षात्कारी किंवा ज्ञानी झाल्यानंतर त्यांने तेवढय़ावर थांबू नये किंवा ते ज्ञान स्वत:पुरतेही ठेवू नये. या ज्ञानाचा फायदा समाजासाठी करावा, असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. तसाचा विचार प्लेटोनी मांडला आहे. त्यासाठी त्यांनी एक रुपक कथा सांगितली आहे.
एका गुहेत काही लोकांना कोंडून ठेवलेले असते. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. गुहेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या एका पडद्यावर त्यांना बाहेरील जगातील माणसांच्या सावल्या फक्त दिसत असतात. गुहेत कोंडून ठेवलेल्यांपैकी एक माणूस तेथून बाहेर पडतो आणि बाहेरचे जग, वास्तवातील माणसे त्याला पाहायला मिळतात. आपण गुहेतून फक्त माणसांच्या सावल्या पाहात होतो, आता प्रत्यक्ष माणसे पाहतोय हे ज्ञान त्याला गुहेच्या बाहेर पडल्यानंतरच होते. आता त्या माणसाने गुहेतील माणसांना बाहेरच्या जगासंबंधीचे त्याला माहिती झालेले ज्ञान सांगितले पाहिजे. ते त्याचे कर्तव्य आहे.
ज्ञानेश्वरांचा निष्काम कर्मयोग आणि प्लेटोची ही रुपककथा यात जसे साम्य आहे तसेच ते ‘आत्मा अमर आहे’ या समजुतीबाबतही दोघांमध्ये आहे. माणसाचे निधन झाल्यानंतर त्याचे शरीर दहन किंवा दफन केले जाते. शरीर नष्ट झाले तरी माणसाचा आत्मा अमर असल्याचे भारतीय संस्कृती मानते. ज्ञानेश्वरानीही आत्मा अमर असल्याचे मानले आहे. प्लेटोनेही पुढे तोच विचार मांडला आहे.
प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस यांना विषप्राशन करण्याचा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा तेव्हा प्लेटो तेथे उपस्थित होते. विषप्राशन करायला लावणाऱ्या लोकांनी सॉक्रेटिस यांना आता तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या शरीराचे काय करायचे, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी माझ्या शरीराचे काही करा. मेल्यानंतर शरीर नष्ट झाले तरी आत्मा अमर राहणार असल्याचे उत्तर दिले होते पुढे प्लेटोनेही याचेच समर्थन केले आहे.. ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांचे विचार आणि तत्वज्ञानातील साम्य असलेली ही केवळ दोन ठळक उदाहरणे. पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळी यांनी पुनर्मुद्रीत केलेल्या ‘ज्ञानेश्वर आणि प्लेटो’ या पुस्तकातून या दोघांचे विचार आणि तत्वज्ञान अशा विविध उदाहरणातून ज्ञानेश्वरीचे अभ्यासक दिवंगत सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर यांनी उलगडून दाखविले आहेत.
दिवंगत सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात एका व्याख्यानमालेत या विषयावर सलग तीन दिवस व्याख्याने दिली होती. त्या व्याख्यानांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले असून ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांचे विचार आणि तत्वज्ञानातील साम्य या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळी व स.प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कौशिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते. चाळीस वर्षांपूर्वी आयोजित या व्याख्यानमालेत सोनोपंत दांडेकर यांची ‘ज्ञानेश्वर आणि प्लेटो’ या विषयावर व्याख्याने झाली होती. त्याचे संकलन असलेले पुस्तक शिक्षण प्रसारक मंडळींतर्फे १९६७ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. संत साहित्याचे अभ्यासक, मराठी साहित्याचा अभ्यास करणारे पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून पुस्तकाची आवृत्ती संपल्यामुळे ते अभ्यासकांसाठी दुर्मिळ होते. पुस्तकाचे महत्व लक्षात घेऊन शिक्षण प्रसार मंडळी संस्थेने ते पुनर्मुद्रीत करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती स.प. महाविद्यालयाचे निवृत्त सहाय्यक ग्रंथपाल वसंत गाडगीळ यांनी दिली.
शिक्षण प्रसारक मंडळींतर्फे स. प. महाविद्यालयात सोनापंत दांडेकर यांच्या नावाने एक अध्यासन केंद्र सुरु करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश सोमण हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहतात. पुनर्मुद्रीत करण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांची मोलाची मदत झाली आहे. या पुनर्मुद्रीत पुस्तकाला आचार्य किशोर व्यास यांची प्रस्तावना आहे. सुमारे दोनशे पानांच्या या ग्रंथात संत ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांच्या विचारांची तुलना असून या दोघांचा जीवन आणि तत्वज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, तत्वज्ञानासंदर्भातील त्यांचे विचार याचे विवेचन करण्यात आले आहे.
अभ्यासकांनी पुस्तकासाठी श्रीपाद तपस्वी यांच्याशी ९९६०५५८७०३ या क्रमांकावर किंवा बुकपॉइंट, देशमुखवाडी, सदाशिव पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
> ज्ञानेश्वरानीही आत्मा अमर असल्याचे मानले आहे. प्लेटोनेही पुढे तोच विचार मांडला आहे.
ReplyDelete>----
ज्ञानेश्वरांचा विचार 'प्लेटोने *पुढे*' माण्डणे शक्य नाही, कारण प्लेटो कितीतरी आधीचा. शिवाय ज्ञानेश्वरांच्या तोंडी मांडलेले अनेक विचार (उदा. निष्काम कर्मयोग) मूळ गीतेत किंवा इतर हिंदु ग्रंथांत मांडल्याचेही बोलले ज़ाते. तेव्हा त्या मूळ विचारांचे श्रेय ज्ञानदेवांना न ज़ाता त्यांनी पूर्वसूरींचा तसा अर्थ लावला, असे म्हणणे योग्य होणार नाही काय? शं दा पेंडसे यांच्या अभ्यासानुसार ज्ञानेश्वरांनी ७५ टक्के ठिकाणी शंकराचार्यांची टीका स्वीकारली आहे. इतर २५ टक्के ठिकाणीही स्वतंत्र अर्थ काढला असूनही आदि शंकराच्या विरुद्ध असा अर्थ कुठेच काढलेला नाही. पेंडसे यांची ही विधाने फक्त गीताभाष्यांनाच पुढे ठेऊन केली आहेत.
आत्माच्या अमरत्वाची कल्पना देखील हिंदु धर्मात ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच होती.
- नानिवडेकर
प्लेटोने आत्मा अमर असल्याच्या गृहीतावर आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली असली तरी या गृहीताचे विश्र्लेषण केलेले नाही. तेव्हा त्याची तुलना ज्ञानेश्र्वरांशी होऊ शकेल असे वाटत नाही.
ReplyDeleteनिष्काम कर्मयोग या शब्दप्रयोगांत ’निष्काम’ हा भाग फार महत्वाचा आहे. प्लेटोच्या प्रतिपादनात त्यावर भर दिलेला दिसत नाही. त्यामुळे साम्य फारसे आहे असे म्हणता येत नाही. ज्ञानेश्वर व प्लेटो दोघेही आपल्यापरीने थोरच एवढेच खरे.
ReplyDeleteअनामिक व प्रभाकर फडणीस
ReplyDeleteनमस्कार
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. प्लेटो आणि ज्ञानेश्वर यांचे विचार आणि तत्वज्ञानाची तुलना व साम्य ज्ञानेश्नरीचे अभ्यासक मामासाहेब दांडेकर यांनी एका व्याख्यानातून केली होती. त्याचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी फक्त त्याबद्दल माहिती दिल आहे.
शेखर
चांगली माहिती दिली. धन्यवाद!
ReplyDeleteSavadhan's blog
अतिशय सुंदर माहिती.सध्याचा काळात या गोष्टींवर विचार करणे अतिशय महत्वाचे आहे, अस मला वाटते.
ReplyDelete