वाचन हा कधीही, कुठेही आणि केव्हाही जोपासता येणारा छंद असून सुजाण आणि सुबुद्ध व्यक्तीला वाचनातून खूप आनंद मिळत असतो. अर्थात डोळे असूनही अक्षरशत्रू असणारी आणि डोळे नसूनही वाचन करणारी, करवून घेणारीही मंडळीही कमी नाहीत. दृष्टीहीन अर्थात अंध व्यक्ती या ब्रेल लिपीमार्फत किंवा अन्य डोळस व्यक्तींकडून वाचून घेऊन आपली वाचनाची आवड पूर्ण करत असतात. आता अंध व्यक्तीनाही ताज्या घडामोडी आणि अन्य साहित्य वाचण्याचा आनंद घेता यावा, त्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड अर्थातच नॅबने मराठीत ब्रेल साप्ताहिक सुरु केले आहे. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच साप्ताहिक असल्याचा नॅबचा दावा आहे.
खरे म्हणजे अशा साप्ताहिकाची गरज होतीच. नॅबकडून पाक्षिके चालविण्यात येण्यात येत असली तरी पंधरा दिवसांचा हा कालावधी तसा खूप मोठा वाटतो. त्यामुळे दर आठवड्याला काहीतरी नवीन मजकूर देण्याचा प्रयत्न या ब्रेल साप्ताहिकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत दहा रुपये असलून वार्षिक वर्गणी पाचशे रुपये इतकी आहे. नॅबचे स्वताचे मुद्णालय असल्यामुळे साप्ताहिकाला मागणी वाढली तरी आम्ही ती पूर्ण करू शकू, या साप्ताहिकातील सर्व मजकूराचे संकलन नॅबचे मनाद सचिव आनंद आठलेकर करणार असल्याचेही रमणशंकर यांनी सांगितले.
साप्ताहिकाचे निश्चित असे स्वरुप ठरविण्यात आलेले नाही. एखादा अंक संपूर्णपणे राजकारण या विषयावर असेल तर कधी क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, सामाजिक, आरोग्य असेही विविध विषय हाताळण्यात येतील. कधी मराठी वृत्तपत्रातील अग्रलेखही देण्याचा विचार असल्याचे रमणशंकर म्हणाले.
या साप्ताहिकाची पृष्ठसंख्या सुमारे वीस इतकी असेल. या ब्रेल साप्ताहिकामुळे अंध व्यक्तीनाही आपले हक्काचे साप्ताहिक उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अंध व्यक्तीही आता वाचनाचा आणि ताज्या घडामोडींचा निर्भेळ आनंद घेऊ शकणार आहेत.
ब्हेल साप्ताहिकाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क
रमणशंकर (संचालक-नॅब)-०९९२०१५८३७५
No comments:
Post a Comment