09 January 2010

पदयात्रा अर्थात चालणे

पंढरीची वारी करणाऱया मंडळींमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षित मंडळीही सहभागी होऊ लागली आहेत. यामध्ये तरुणांचाही सहभाग वाढला आहे. वारीचा एकदा तरी अनुभव घेण्याची माझीही इच्छा आहे. पाहू या कधी योग येतो तो. पंढरीच्या वारीप्रमाणेच हल्ली अनेक संस्था, मंडळे शिर्डी, शेगाव आदी ठिकाणीही पदयात्रा आयोजित करत असतात. त्याचेही प्रमाण वाढले असून या पदयात्रेतही मोठ्या प्रमाणात तरुण, सुशिक्षित मंडळी सहभागी होत आहेत.


आपण राहतो त्या ठिकाणापासून पायी शिर्डीला किंवा आपण ठरवू त्या ठिकाणी  चालत जाणे, म्हणजे पदयात्रा. मधुमेह झालेल्या रुग्णांना औषधोपचाराबरोबरच भरपूर चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मधुमेही क्लब अथवा मंडळांतर्फेही इतक्या मोठ्या नाही पण एक दिवसात सहज चालून जाता येईल, इतक्या अंतरावर एखादी फेरी आयोजित केली जाते. देवस्थानाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झालेली मंडळी ही धार्मिक उद्देशाने व त्या दैवतावरील श्रद्धेने सहभागी झालेली असतात. यात तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी होतात. शारिरिक क्षमता, मनाची जिद्द आणि अतुट श्रद्धेच्या जोरावर पदयात्रेतील मंडळी यशस्वीपणे पदयात्रा पूर्ण करत असतात.


पहाटे लवकर उठून चालायला सुरुवात करणे, दिवस मावळेपर्यंत जेवढे चालणे शक्य असेल तितके चालणे आणि रात्रीच्या वेळेस धर्मशाळा, शाळा किंवा देवळात तर कधी उघड्यावर मुक्काम करणे असा या मंडळींचा दिनक्रम असतो. दररोज २५ ते ३० किलोमीटर चालायचे, उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेले असते. त्यामुळे साहजिकच आठ ते दहा दिवसात पदयात्रा पूर्ण होते. आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळे म्हणूनही काही जण पदयात्रेत सहभागी होत असतात. अनेक संस्था आणि मंडळे आपल्या बरोबर स्वयंपाक, नाश्ता, चहापाणी करण्यासाठी खास आचारी ठेवतात तर काही मंडळी मुक्कामाला थांबल्यानंतर आपला स्वयंपाक करतात.


चालण्यासारखा चांगला व्यायाम नाही, असे डॉक्टरलोकही सांगतात. सध्याच्या काळात स्वताचे दोन चाकी किंवा चारचाकी वाहन, रिक्षा, बेस्ट, सायकल यामुळे आपल्या सर्वांचेच चालणे खूप कमी झाले आहे. कधी कधी आश्चर्य वाटते की पूर्वीच्या काळी वाहतुकीची विशेष साधने नसताना त्या लोकांनी प्रवास कसा केला असेल. काशीयात्रा, चारधाम यात्रा आता खूप सोपी झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी चालून ती पूर्ण करणे किती त्रासदायक असेल, त्याची केवळ आपण कल्पनाच करु शकतो. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम,  समर्थ रामदास स्वामी आणि अन्य अनेक संतांनीही महाराष्ट्र व देशभर भ्रमण केले. त्यांचा काळ तर आणखीनच कठीण. तरीही पायी फिरून त्यांनी भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचा प्रसार केला. समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरा नाहीशा करण्यासाठी लोकांचे प्रबोधन केले.  त्यांचे हे कार्य खूप मोठे आहे.


या मंडळींच्या तुलनेत आज आपण इतके फिरूही शकणार नाही. पण तरीही कधी संधी मिळाली तर अशी पदयात्रा जरुर करावी. त्या निमित्ताने आपण काही दिवस एका वेगळ्या वातावरणात असतो. आजूबाजूची गावे, त्यातील नागरिक, चालीरिती आणि समाजाचे जवळून दर्शन होते. त्यातही आपण आपली ओळख काही काळ तरी विसरतो नव्हे ती पदयात्रेत विसरली पाहिजे. स्वावलंबनाचे, आपली कामे आपण करण्याचे  धडे गिरवले जातात, नवीन ओळखी होतात आणि आपणही अनुभव समृद्ध होतो. अर्थात हे करत असताना आपल्या तिथे जाण्याने स्थानिक नागरिकांना आपला त्रास होणार नाही, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपले वर्तन, बोलणे हे कोणाला त्रास होणार नाही, असे असले पाहिजे.


मला स्वतालाही चालायला खूप आवडते. नवीन शहरात गेल्यानंतर किंवा मी राहतो तिथेही मी सगळीकडे चालतच फिरतो. तर कधी मुद्दामहून एखाद्या लांबच्या ठिकाणी (फार नाही आठ ते दहा किलोमीटर) चालत जातो. त्यातन एक वेगळाच आनंद मिळतो. पहाटेच्या वेळेस फिरण्यातील आनंद तर काही वेगळाच असतो. प्रसन्न वातावरण, पक्षांचा किलबिलाट, रस्त्यावर माणसे आणि वाहनांची नसलेली वर्दळ यामुळे मन अधिक प्रसन्न होते आणि संपूर्ण दिवस उत्साहात  जातो.        
 

No comments:

Post a Comment