12 January 2010

नटरंगचे रंग दिसलेच नाहीत

झी टॉकीजच्या नटरंग या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत अनेक वर्षांच्या कालावधीनंतर एक उत्कृष्ट तमाशापट तयार झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्याच नटरंग या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. तमाशातील नाच्या ही भूमिका रंगविणाऱया नटाच्या वाट्याला येणारे दुख, मानहानी, त्याचा जीवनसंघर्ष यात मांडण्यात आला आहे. चित्रपटातील अतुल कुलकर्णी यांच्यासह सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अजय-अतुल यांचे संगीत, महेश लिमये यांचे कॅमेरामन म्हणून असलेले काम, रवींद्र जाधव यांचे दिग्दर्शन, बेला शेंडे व अजय-अतुल यांचे पार्श्वगायन, गुरु ठाकूर यांचे संवाद व गीते आदी सर्वच उत्तम. एक चांगली कलाकृती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.


गुणा पैलवान याला तमाशाचे वेड असते. त्या वेडापायी तो घराकडेही नीट लक्ष देत नाही. तमाशाचा फड/वग उभा करण्याच्या जिद्दीने तो घरही सोडतो आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पिळदार शरीर कमी करुन, मिशी उतरवून अखेर नाच्याची भूमिका करायलाही तयार होतो. त्यात तो यशस्वीही होतो. पण नाच्या म्हणून काम करताना होणारी अवहेलना, घरच्यांकडून केली जाणारी निर्भत्सना, नाच्या म्हणजे तो तसाच असणार अशा शब्दात त्याची केली जाणारी टवाळी, प्रत्यक्षात तमाशाचा फड उभा केल्यानंतर त्याला येणारे विविध अनुभव, नाच्याबरोबर संपूर्ण आयुष्य कसे काढायचे म्हणून नयनाने दिलेला नकार, अरे मी खऱा पुरुषच आहे, पण परिस्थितीमुळे ही भूमिका करायला लागली असल्याबद्दलचे त्याचे सांगणे आदी सर्व गोष्टी चित्रपटातून चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत.


पण नाच्यावर झालेला बलात्कार, वृत्तपत्रातून त्या संदर्भात आलेल्या बातम्या, बायको, सासरा आणि पोटच्या मुलाकडून झालेला अपमान, दोन राजकारण्यांच्या भांडणातून त्यांच्या तमाशाची झालेली वाताहत, सहकाऱयांनी सोडलेली साथ यातूनही हा नाच्या एका जिद्दीने पुन्हा चित्रपट, नाटक या क्षेत्रात आपले नाव मोठे करतो, इतके मोठे करतो की त्याला आजवरच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात येते. मात्र चित्रपटाचा हा शेवट अवघ्या काही मिनिटात गुंडाळला गेला आहे. नाच्या म्हणून सर्व अपमान आणि अवहेलना झाल्यानंतरही हा नाच्या ज्या जिद्दीने पुन्हा नव्याने सुरुवात करतो, तो संघर्ष काही प्रसंगातून चित्रपटात यायला पाहिजे होता असे वाटते. मात्र हे सगळे एका गाण्याच्या कडव्यातून सांगण्यात आले आहे. त्यात नाच्याने केलेल्या वेगवेगळ्या भूमिका, वृत्तपत्रातून त्याच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्या उडतउडत दाखवल्या गेल्या आहेत. नाच्या म्हणून बसलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी त्याने केलेले परिश्रम, नाच्याखेरीज साकार केलेल्या आणि प्रेक्षकांनीही गौरवलेल्या त्याच्या अन्य भूमिका, त्या त्याने कशा केल्या, त्यासाठी कसे परिश्रम घेतले हे यायला पाहिजे होते. तसे झाले असते तर खऱया अर्थाने नटरंग या शीर्षकाला साजेसे नाच्याच्या जीवनातील विविध रंग, त्याचे कलागुण दिसून आले असते.


डॉ. आनंद यादव यांची मूळ कादंबरी मी वाचलेली नाही. मूळ कादंबरीतही नाच्या म्हणून झालेली अवहेलना आणि अपमान यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या त्या कलाकाराचा प्रवास दाखवला आहे की नाही ते माहिती नाही. पण कादंबरीत जरी नसता तरी चित्रपटात तो दाखवायला हवा होता, असे वाटते. अतुल कुलकर्णी यांनी गुणा पैलवान आणि नाच्या या दोन्ही भूमिका उत्कृष्टपणे सादर केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, भूमिकेची केलेली तयारी याबाबत प्रसारमाध्यमातून बरेच काही येऊन गेले आहे. प्रत्येक कलाकाराचेच अशा प्रकारची आव्हानात्मक भूमिका एकदा तरी करण्याचे स्वप्न असते. अतुल कुलकर्णी यांना ती संधी मिळाली. या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत, अभिनय याबाबत संपू्र्ण आधर राखत एक गोष्ट जी मला खटकली ती सांगतो. अतुल कुलकर्णी यांची ग्रामीण बोली ग्राणीण ढंगातील वाटत नाही. तसेच नाच्या झाल्यानंतर त्यांचे बोलण्यात  बायकी सहजता जाणवत नाही. आता त्यांना खरोखऱच तसे बोलता आले नाही की एका पैलवनाचा नाच्या झाल्यामुळे मुद्दामहून तसे दाखवले आहे ते माहिती नाही.


तमाशामध्ये नाच्या हा पाहिजेच, हा नयनाच्या आईचा हट्ट हा जितक्या प्रभावीपणे समोर यायला पाहिजे होता, तसा तो येत नाही. तसा एखादा प्रसंग दाखवायला हवा होता. किंवा नाच्या नसला तर काय बिघडते,  तो नसला तरी तमाशा चालवता येईल,  असे गुणाच्या तोंडी एक वाक्य आहे. गुणा व नयनाच्या तमाशाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर बऱयाच वर्षांनी गुणाला आता आपण नाच्यासोडून राजा किंवा अन्य भूमिका कराव्यात असे वाटल्याचे दाखवले आहे. हेच गुणाला अगोदर म्हणता आले असते, तसे तो का म्हणत नाही, कारण त्याचे लेखन आणि लावण्यांवरच त्यांच्या फडाला लोकप्रियता मिळाली असल्याचे पांडोबा, नयनाची आई यांचे म्हणणे असल्याचे चित्रपटात दाखवले आहे. मग गुणाही आपण नाच्याची भूमिका करणार नाही, असे अगोदर ठामपणे  का सांगत नाही किंवा  नाच्या म्हणून आपली अवहेलना होत आहे, हे समजल्यानंतरही तो यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना का दाखवला नाही,



हे कुठेतरी अगोदर समोर यायला पाहिजे होते. मात्र ते येते चित्रपटाच्या शेवटाकडे. गुणाचे वडील गेल्यानंतरचा प्रसंग किंवा नयनाबरोबरच्या काही प्रसंगात, त्याचे चालणे, बोलणे यात पुरुषीपणा दिसत नाही. तो नाच्याच्याच भूमिकेत दिसतो. म्हणजे गुणा आपले पुरुषपण विसरुन नाच्या हीच भूमिका वास्तव जीवनातही जगत असतो का,  ढोलकीवाला त्याच्यावर जबरदस्ती करण्याच्या प्रसंगात गुणामधील पुरुषीपणा दाखवला आहे.  नाच्यावर होणाऱया बलात्काराच्या प्रसंगातही तो त्याचा प्रभावीपणे विरोध करताना दाखवलेला नाही. कार्यक्रमाची सुपारी मिळविण्यासाठी गुणाला नाच्या म्हणून का पुढे केले आहे,  असे काही प्रश्न मनात उभे राहतात.  म्हणजे तो केवळ तमाशात नाच्या आहे की वास्तव जीवनातही तो तसाच झाला आहे, याचा गोंधळ उडालेला दिसतो. 


असो, असे असले तरी या निमित्ताने तमाशातील नाच्या या कलाकाराचे दुख मोठ्या पडद्यावर आले आहे. मराठीत पूर्वी अनेक तमाशाप्रधान चित्रपट तयार झाले. त्यातील अनेक गाजलेही. तमाशाप्रधान मराठी चित्रपट हे एकेकाळी सुवर्णयुग होते. नटरंगच्या निमत्ताने कदाचित यापुढे आणखी काही अशा विषयावरील मराठी चित्रपट तयार होतील,  चित्रपटातील मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा, अप्सरा आदी लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत. आता पुढेही मराठी चित्रपटातून पुन्हा नव्या लावण्या  ऐकू येतील. तसे झाले तर ते नटरंगचेच यश असेल. पुन्हा एकदा नटरंगच्या सर्व टीमचे आणि कलाकारांचे अभिनंदन...                                

2 comments:

  1. kadambari sarkha ha movie nahi banlela...patkatha ajun hi tight karta ali asti. sagle kase fatafat urkalyasarkhe vatte. kadambari madhe guna purna pane udwast hoto. ase dakhavle ahe. chitrapatacha shevat sukhad karnyat ala ahe.

    kadambari far far taragic ahe. tyamanane chitrapat far masaledar vatto.

    Although its a good movie with excellent music.

    ReplyDelete
  2. Mi aadhi kadambari vachli navati, pan chitrapat okay vatala. Uttaraardha ajun sundar karata ala asata. Aaplya baryachasha matanshee sahamat aahe. Havi tevdhi unchee hya chitrapatala gaathata aali naahi. Pan ekandarit prayatna changla hota asech mhanave lagel.

    ReplyDelete