14 January 2010

प्रामाणिकतेची हत्त्या

विविध घोटाळे, राजकारणी आणि शासकीय अधिकाऱयांचे गैरव्यवहार तसेच अन्य माहीतीच्या अधिकाराअंतर्गत बाहेर काढणारे प्रामाणिक व निर्भिड सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी  यांच्या हत्येची बातमी आजच्या वृत्तपत्रात आल्या आहेत. शेट्टी यांच्यासारख्या कार्यकर्त्याची झालेली ही हत्या समाजासाठी निर्भिडपणे काम करणाऱया अन्य लोकांसाठी मोठा धक्का असून ही हत्या म्हणजे प्रामाणिकता, निर्भिडतेवर झालेला नियोजित आणि अमानुष असा हल्ला  आहे. 


भ्रष्टाचार निर्मूलन हा एक आता धंदा झाला असून माहितीच्या अधिकाराचा धाक दाखवून मध्यस्ती व सेटलमेंट करणारी काही मंडळी समाजात आपल्याला पाहायला मिळतात. या कायद्याचा वापर करुन शासकीय अधिकारी, पोलीस यांना ब्लॅकमेल करण्याचेही तंत्र काही जणानी अवलंबले आहे. म्हणजे सर्वसामान्यांसाठी तयार करण्यात आलेला हा कायदा या मंडळींमुळे बदनाम झाला आहे. अर्थात सर्वच मंडळी अशा प्रकारची सेटर आहेत, असे नाही. त्यातही समाजासाठी निस्पृह व निर्भिडतेने काम करणारेही काही जण आहेत. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रनाथ दुबे ही नावे अशाच प्रामाणिक आणि निस्पृहपणे काम करणाऱया कार्यकर्त्यांची. त्यांनी उघड केलेला भ्रष्टाचार हा राष्ट्रीय पातळीवरचा आणि मोठा असा होता. षण्मुगम यांनी पेट्रोलियम कंपन्यांचा तर दुबे यांनी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणारा भ्रष्टाचार बाहेर काढला.      


हत्या झालेले सतीश शेट्टी यांचे कामही राज्य आणि स्थानिक पातळीवर मोठे होते. हजारो एकर शासकीय जमिनीच्या परस्पर खरेदी-विक्रीचा घोटाळा, शिधावाटप दुकांवरील रॉकेलचा काळाबाजार आणि भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी उघडकीस आणली. अशी प्रकरणे उघडकीस आणणारे लोक हे शासकीय अधिकारी, पोलीस, राजकारणी यांना नकोसे असतात. त्यामुळे त्यांना संपविण्यासाठी राजकारणी, गुंड, पोलीस अशी अभद्र युती नेहमीच होत असते. अशा प्रकारचे हल्ले झाल्यानंतर किंवा हल्ल्यात असा प्रामाणिक कार्यकर्ता मरण पावल्यानंतर राजकीय नेते मानभावीपणे प्रतिक्रिया देत असतात. मराठी किंवा हिंदी चित्रपटांमधूनही आपण ते पाहिले आहे. अशा प्रकरणी खरे गुन्हेगार कधीच सापडत नाहीत. लोकांपुढे डमी गुन्हेगार आणले जातात. कारवाई करण्याचे नाटक केले जाते आणि काही दिवसांनंतर सर्वजण झालेले विसरुन जातात आणि तेथेच राजकारणी नेते, राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी यांचे फावते.


खरे म्हणजे अशा प्रकरणात कोणीही आणि कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्याकडे तसे कधी घडणार नाही. राजकीय लागेबांधे, राजकीय नेत्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा,  भ्रष्ट पोलीस आणि शासकीय अधिकारी यांचे संबंधच अशा घटनांना कारणीभूत असल्याचे उघड सत्य सगळ्यानाच माहिती असते. क्वचित अशा एखाद्या दुर्घटनेनंतर समाजात मोठे आंदोलन किंवा लढा उभा राहतो. प्रसारमाध्यमेही काही दिवसांपुरता हा विषय लावून धरतात. पुन्हा एखादे नवे प्रकरण घडले की जुने विसरले जाते. त्याप्रमाणे अशा घटनांचा प्रसारमाध्यमांकडूनही पाहिजे त्या प्रमाणात पाठपुरावा केला जात नाही.


अशा प्रकरणी दोषी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असेच घडत राहणार. प्रामाणिक, निस्पृह आणि समाजासाठी काम करणाऱऱया लोकांच्या हत्या होणे, त्यांच्यावर हल्ले करुन त्यांना कायमचे अपंग करणे,  असे घडतच राहणार. कारण ते जे काम करत असतात ते राजकारणी, शासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यासाठी तोट्याचे असते. आपल्या मार्गात येणाऱयांचा काटा कसा दूर करायचा हे या मंडळींना चांगलेच माहिती असते. हे चित्र कधी बदलणार, अशा घटनांनतर प्रामाणिकपणे काम करणाऱया लोकांचे मनोधैर्य खच्ची होत असते आणि तेच काहीजणांना हवे असते हे आपलेच नव्हे तर समाजाचेही दुर्दैव आहे.             

4 comments:

  1. खूप वाईट झालं. सतीश शेट्टी हे अण्णा हजारे यांचे शिष्य होते असंही वाचलं मी कुठेतरी.

    ReplyDelete
  2. मित्रहो,
    असं एकट दुकट लढत राहिलो तर भ्रष्टाचारी लोकांचे फावणारच. यासाठी अधिक चांगल्या संघटनाची आणि माहितीबद्दल व्यवस्थित प्रसिद्धीची गरज आहे.
    इथे: http://www.livehindustan.com/news/desh/national/39-39-90811.html काहीतरी मित्रा संघटनेबद्दल म्हटलंय... तसं काहितरी आणखी काय काय आहे? सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेउन, माहिती गुपित ठेउन भ्रष्टाचार उघडकीस आणला पाहिजे.
    भ्रष्टाचारींचे उद्दीष्ट मुळीच साध्य होउ देउ नये. जेणे करुन असल्या हल्ल्यांपासून त्यांना काहीच फायदा होणार नाही हे त्यांना कळेल.

    ReplyDelete
  3. हेच ते ज्यांनी अण्णा हजारेंची सुपारी घेतली. पैश्याचा माज एवढा की आपलं कुणीही वाकडं करू शकणार नाही अशी दर्पोक्ती. स्व.सतीश शेट्टी मोलाचा माणूस होता.

    ReplyDelete
  4. हेरंभ,प्रशांत, नरेंद्र
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
    शेखर

    ReplyDelete