शिवसेनेचे सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर ज्या प्रकारे कारभार सुरू आहे, ते पाहता एक ना एक दिवस शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे दोघेच राहतील, असे विधान नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर केले होते. राणे यांच्या सारखा मासबेस असलेला नेता बाहेर पडल्यानंतर नाही म्हटले तरी शिवसेनेला धक्का होता. राणे यांच्यापूर्वी छगन भुजबळ यांनी मोठे बंड करुन काही आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर गणेश नाईक बाहेर पडले. राणे यांच्यानंतर शिवसेनेत सारे काही आलबेल असल्याचे चित्र रंगविण्यात येत होते. मात्र ते फार काळ टिकले नाही. राणे यांच्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि आता राणे व राज यांच्यासारखे पक्षात कोणतेही पद नसलेल्या परंतु काही काळ पर्यायी सत्ताकेंद्र असलेल्या स्मिता ठाकरे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत.
शिवसेनाप्रमुख यांनी आपला राजकीय वारसा पुत्राकडे अर्थात उद्धव यांच्याकडे जेव्हा सोपवला तेव्हापासूनच शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु झाली होती. केवळ पुत्रप्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतील अन्य नेते आणि राज यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केल्याचे तेव्हाही बोलले गेले होते. कारण तोपर्यंत शिवसेनेत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आपले बस्तान चांगल्यापैकी बसवले होते. अन्य ज्येष्ठ नेतेही कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. शिवसेनेत राज आणि अन्य ज्येष्ठ नेते आंदोलने करतांना रस्त्यावर उतरत होते तेव्हा उद्धव हे फोटोग्राफी करण्यात मग्न होते. शिवसेना किंवा राजकारणाशी त्यांचा संबंध नव्हता. शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, जोपासली आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाचा, कार्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या शब्दाला संघटनेत मान आणि वजन होते. पक्षावर, पक्षातील नेत्यांवर आणि शिवसैनिकांवरही त्यांची पकड व जरब होती. उद्धव यांनी शिवसेनेत सक्रीय होऊन काही वर्षेच झाली होती. तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ पुत्रप्रेमापोटी उद्धव यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि तेथेच चुकले, असे आता उघडपणे बोलले जात आहे.
राणे यांच्यानंतर राज यांच्यारुपाने एक ठाकरे पक्षाबाहेर गेले. उद्धव यांना सर्व काही आयते मिळाले. वडिलांची पुण्याई त्यांना कामाला आली. मात्र राज ठाकरे यांनी स्वबळावर पक्षाला मतदारांमध्ये विशेष म्हणजे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांमध्ये मनसेची क्रेझ निर्माण केली. पक्षातून बाहेर पडल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवकही निवडून आणले. त्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेत प्रत्येक वेळी शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याची संधी सोडली नाही. त्यात ते यशस्वीही होत गेले. लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची सर्व गणिते चुकत गेली. मात्र या पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण न करता मराठी माणसालाच दोष दिला. नेमके काय करायचे ते कळत नसल्याने किंवा उद्धव व त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली.
आता स्मिता ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडत आहे. त्यांची ताकद किती, त्यामुळे शिवसेनेला किती फटका बसू शकेल, राज यांच्यामागे शिवसेनेतील काही मंडळी जशी गेली, तशी स्मिता ठाकरे यांच्या मागोमाग किती जण बाहेर पडतील याबाबत आत्ता काहीच सांगता येत नसले तरी शिवसेनेचे मुख्यत उद्धव यांचे विरोधक उद्धव यांच्याच नाकर्तेपणामुळे स्मिता यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांना ती सोडायला भाग पाडण्यात आले, असा प्रचार करण्यासाठी आता आणखी कोलीत मिळेल. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत चालली असल्याचे सर्वाना पाहायला मिळत आहे. प्रत्येकवेळी उद्धव यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे, उद्धव हे स्वतच्या ताकदीवर काहीही करु शकत नाही, शिवसेनेसारख्या संघटनेचे नेतेपद सांभाळण्याची त्यांची खरोखरच कुवत आहे की नाही, कोणताही निर्णय़ घेताना खुषमस्कऱया सल्लागारांचे किती काळ ऐकणार, शिवसेनाप्रमुखांनी कष्टाने उभी केलेली संघटना ते खरोखरच रसातळाला नेणार का, असे अनेक प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला, मुंबईतही शिवसेनेला शह देत मनसेचे उमेदवार निवडून आले, विधानसभा आणि विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाल्याने शिवसेनेला दोन्ही ठिकाणच्या विरोधीपक्षनेतेपदावरही पाणी सोडावे लागले.
खरे म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव यांनी जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगत आपण कार्यकारी अध्यक्ष झाल्यापासूनचा जमाखर्च एकदा मांडावा. जमा किती आणि खर्च किती याचा तसेच आपण खरोखरच ही जबाबदारी पेलायला समर्थ आहोत का त्याचाही गंभीरपणे विचार करावा. अन्यथा एक दिवस नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे शिवसेनेत फक्त उद्धव, त्यांची पत्नी रश्मी, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत आणि अन्य खुषमस्करेच राहतील. वेळीच सावध होऊन पावले उचलली नाहीत तर राणे यांचे भाकीत खरे व्हायला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना रसातळाला जायला आणि तिची शकले व्हायलाही फार वेळ लागणार नाही...
Maharashtrala Raj shivay paryay nahi aahe he trikalbadhit satya aahe.
ReplyDeleteVinod
khara bolalat... pan vinash kale viparit buddhi mhantaat tasach shivasenech hot ahe... congressch asa zal asat tar mala anand vatalaa asata pan shivasenech asa kahi hotay yach dukkha aahe..
ReplyDeleteAtaa fakta MaNaSe kade laksha ahe... baghuya kay kartaat te.
विनोद, विजय
ReplyDeleteआपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.
Maharashtra Shivsene shivay prayay nahi raj thakre sarkhe kitek shivsenetun gelet ani alet shivsenela kahi farak padat nahi, balasahebana manacha mujra
ReplyDelete