जाणीव
मनाला भिडणारे लेखन आपल्या वाचनात येते. मग ते कधी एखाद्या पुस्तकातील, कादंबरीतील, मासिकातील कथा, कविता किंवा वृत्तपत्रातील लेखामधील असते. काही वेळेस असेही होते की कुठेतरी आपण एखादा चांगला उतारा, कविता वाचतो, पण ते लिहिणाऱयाचे नाव त्या खाली दिलेले नसते.
मात्र त्यातील आशय, शब्द आपल्या मनाला भावतात. मनात कुठेतरी घर करतात. असाच वाचनात आलेला एक परिच्छेद किंवा मुक्तछंदातील काव्य नुकतेच वाचनात आले. ते कोणाचे आहे, कोणी लिहिले आहे किंवा ते एखाद्या पुस्तकातील आहे का ते माहिती नाही.
सध्याच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीचे समर्पक वर्णन त्यात केले आहे. जीवघेणी स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण कशाकशाला मुकलो आहोत, ते यात सांगितले आहे. तोच परिच्छेद सर्वांच्या माहितीसाठी. या मजकुराला जाणीव असे नाव देण्यात आले होते.
जाणीव
दिवाणखान्यात टी.व्ही आल्याने बोलणे विसरलो आहे
घरात गाडी आल्यापासून चालणे विसरलो आहे
खिशात कॅल्कुलेटर आल्यापासून पाढे विसरलो आहे
ऑफीसमध्ये एसीत बसून झाडाखालचा गारवा विसरलो आहे
रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे
मनालाच इतके कष्ट होतात की शरीराचे कष्ट विसरलो आहे
कचकड्यांची नाती जपतांना प्रेम करायला विसरलो आहे
बॅंकांमधली खाती सांभाळतांना पैशांची किंमत विसरलो आहे
उत्तेजक चित्रांच्या बरबटीमुळे सौदर्य पाहणे विसरलो आहे
कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे
फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो आहे
पॉप व रॉपच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे
क्षणभंगूर मृगजळाच्या मागे धावतांना सत्कर्माला विसरलो आहे
माझीच तुंबडी भरतांना दुसऱयाचा विचार करणं विसरलो आहे
धावत धावत असतांना क्षणभर थांबणंही विसरलो आहो
जागेपणीचं सुख जाऊच द्या सुखाची झोपही विसरलो आहे
कृत्रिम व खोट्या विनोदामुळे खळखळून हसणं विसरलो आहे
आणि हसणं विसरल्याने जीवन जगणेच विसरलो आहे
खूप छान आणि मनाला भावणारे असे हे शब्द आहेत. हे ज्या लिहिले असतील, त्यांचे अभिनंदन.
No comments:
Post a Comment