आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला असे म्हणण्याचे दिवस असताना मुंबईकर आणि राज्यातील लोकांना घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात पाऊस नाही आणि थंडीच्या दिवसात चक्क पाऊस, असे बदललेले ऋतूचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरे तर लहरीपणाने वागणे हा माणसाचा स्वभाव आहे. निसर्ग कधीही लहरीप्रमाणे वागत नाही. निसर्गाची प्रत्येक गोष्ट नियमानुसारच सुरु असते. मग गेल्या काही वर्षात असे काय घडले की निसर्गालाही आपले नियम गुंडाळून ठेवावे लागले. त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.
विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, नववनीन शोध आणि माणसाचे झालेले सुखवस्तू व भोगवादी जीवन यामुळे आपण निसर्गावर विजय मिळवला असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत असतो. पुराणात अगस्ती ऋषींनी समुद्र पिऊन टाकला, परशुराम यांनी समुद्र हटवला आदी कथा आपण वाचतो. मात्र आधूनिक काळात राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी, पोलीस आदींच्या अभद्र युतीने समद्रात भराव टाकून समुद्र बुजवला. मुंबईत बॅकबे रेक्लमेशन उभे राहिले. समुद्र बुजवून किंवा त्याला हटवून किती बांधकामे उभी करायची याला काही धरबंद व मर्यादा राहिली नाही. २६ जलै २००५ व्हायला ते ही एक प्रमुख कारण असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
पूर्वी निसर्ग हा नियमाप्रमाणे वागायचा. म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात पावसाळा आणि ऑक्टोबर ते जानेवारी या काळात थंडी असायची. फेब्रुवारी ते मे हा काळ उन्हाळ्याचाच असायचा. पण सध्या चित्र वेगळेच दिसते आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस नाही आणि थंडीच्या दिवसात थंडी नाही. गेल्या वर्षी मुंबईत थंडी अजिबात पडलीच नव्हती. बदलते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मींग, पर्यावरणाचा नाश त्यामुळे निर्माण होणाऱया विविध समस्या याकडे आपण सगळे जण कळत असून वळत नसल्यासारखे करत आहोत.
मुंबईतील डोंगर, टेकड्या आपण भूईसपाट करुन टाकल्या. झाडे, जंगले इतकेच नव्हे तर खाडी किनाऱयावरील तिवरांची झुडपेही आपण तोडून टाकली. नद्या, नाले, तलाव विविध रासायनिक द्रव्ये सोडून प्रदूषित करुन टाकली. त्यामुळे या पाण्यातील जलजर आणि अन्य वनस्पती, जीवसृष्टीलाही आपण धोका पोहोचवला. रासायनिक कंपन्या, वाहनांची प्रचंड संख्या यामुळे हवेतील प्रदूषणात भर टाकली. मुंबईत ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे सर्वत्र उंच इमारती बांधल्या. पावसाचे ढग अडवायला डोंगर आणि झाडेच आपण शिल्लक ठेवली नाहीत. सिमेंट-क्रॉंक्रीटचे जंगल उभारून पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जमीनच शिल्लक ठेवली नाही. ज्या निसर्गाने आपल्याला गेली शेकडो वर्षे भरभरुन दिले, ते आपण अवघ्या काही वर्षात अक्षरश ओरबाडून घेतले. त्याबदल्यात निसर्गाला आपण काहीच दिले नाही.
आणि हे सगळे करुन आपण आमचा विकास कसा करु घेतला, निसर्गावर कसा विजय मिळवला, त्याच्याच गप्पा मारत राहिलो. आपण या सगळ्याचा गर्व बाळगला. माणसाला त्याच्या बुद्धीचा अहंकार चढला. त्यामुळेच सध्या हा अहंकार आणि माणसांची घमेंड उतरवण्याचे काम निसर्ग आपल्यापरीने करत आहे. एवढे सगळे होत असूनही आपले डोळे उघडत नाही हे दुर्देव आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण वेळीच सावध होऊन पुन्हा निसर्गाकडे गेले पाहिजे. अन्यथा निसर्ग त्याच्यावर केलेल्या अन्यायाचा बदला या ना त्या स्वरुपात घेतच राहील आणि हे जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आपण केलेल्या या चुकांबद्दल भावी पिढी आपल्याला कधीच क्षमा करणार नाही...
No comments:
Post a Comment