16 November 2009

हे जीवन सुंदर आहे

येणारा आत्ताचा क्षण हा आपला असतो, उद्याचा तर जाऊ दे पुढचा क्षणही आपला असेल की नाही, ते आपल्याला सांगता येत नाही. आपले मानवी जीवन हे असेच क्षणभंगूर आहे. मात्र पुढचा किंवा उद्याचा क्षण कसा असेल, त्याची काळजी करत बसण्यापेक्षा हातात असलेला प्रत्येक क्षण सार्थकी कसा लागेल, त्या क्षणी आपल्याला आणि दुसऱयानाही आपल्याला फक्त आनंद आणि आनंदच कसा देता येईल, याचा विचार केला तर हे जीवन सुंदर आहे, असे आपल्या लक्षात येईल. काहीही आजार नसलेला आणि धडधाकट असलेला माणूस अचानक आपल्यातून निघून जातो आणि आजारपणामुळे वर्षानुवर्षे/महिनोंमहिने अंथरुणाला खिळून असलेला कोणी जाऊ म्हटले तरी जात नाही. खरेच देवाची आणि दैवाची लिला आपल्याला कळत नाही हेच खरे. म्हणतात ना देवाचे/यमाचे बोलावणे आले की आपल्याला जावेच लागते. एखाद्याने देवा मला ने रे असे म्हटले तरी तो नेत नाही किंवा एखाद्याने मला नेऊ नको असे म्हटले तरी तो थांबत नाही. सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरुप घरी येईल की नाही, त्याचीही सध्याच्या काळात शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे आपला माणूस सुखरुप घरी येईपर्यंत घरच्यांच्या मनाला चैन पडत नाही. कधी कोणी मृत्यूचे बोलावणे आल्यासारखा त्याच्याबरोबर जातो तर कोणी त्याचे बोलावणे आलेले असूनही नशिबामुळे, देव, दैव आणि पूर्वपुण्याईमुळे वाचतो. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दुखद घटनेची बातमी सर्वच वृत्तपत्रातून आली होती. लिफ्टमधून जाताना सहा अग्निशमन दलाच्या जवांनाना आतमध्ये गुदमरुन प्राणाला मुकावे लागले होते. त्यांच्याबरोबरच लिफ्टमध्ये पाऊल टाकलेली एक महिला पोलीस अधिकारी ऐनक्षणी नंतर जाऊ म्हणून लिफ्ट बाहेर पडली आणि ती वाचली. याला काय म्हणायचे. अनेकदा अपघात किंवा अन्य दुर्घटनांमध्ये लहान बालके, तान्ही मुले आश्चर्यकारकपणे वाचतात तर काही जण मृत्यूमुखी पडतात. एखादा तरुण ज्याने आपल्या भावी आयुष्याची काही स्वप्ने रंगवलेली असतात तो अचानक जातो तर कोणाच्या जीवनाची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच म्हणजे लहान वयातच त्यांना मृत्यू गाठतो. अनेक मृत्यू/अपघात हे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा देवाच्या दर्शनाला जाताना/परतताना झाले असल्याचे वाचायला किंवा ऐकायला मिळते. काही वेळेस रेल्वे, बस किंवा विमानाच्या भयानक अपघातात अनेकांचा एकाच वेळी मृत्यू होतो. त्या सगळ्यांचे मरण एकाच वेळी लिहिलेले असते का, अर्थात यातूनही काही वाचतात, पण अपघातात आलेल्या अपंगत्वामुळे अरे त्यापेक्षा आपण सुटलो असतो तर बरे झाले असते, असे विचार त्यांच्या मनात येऊन जातात. काही खरोखरच भाग्यवान ठरतात, जीवघेण्या अपघातात त्यांना केवळ खरचटण्यापलीकडे किंवा थोडेसे लागण्याखेरीज काही होत नाही. त्यांचे गंडांतर टळलेले असते. किंवा त्यांचा मृत्यूयोग तेव्हा नसतो, असेच म्हणावे लागते. या सगळ्याचा विचार केला की आपलेच डोके भणभणायला लागते. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानात माणसाने केलेली प्रगती, विविध शोध, औषधे, वैद्यकीय सोयी-सुविधा, अत्याधुनिक उपकरणे यामुळे सुसह्य झालेल्या जीवनामुळे आपण निसर्गावर विजय मिळवला, त्याच्यावर मात केली अशा थाटात वावरत असतो. पण आत्ताचा आणि येणारा पुढचा क्षण आपला आहे की नाही या बाबतीत मात्र आपल्याला काही कळत नाही. मात्र पुढचा क्षण कसा असेल त्याची काळजी करत बसण्यापेक्षा आत्ताचा क्षण आपण आनंदाने जगू या, दुसऱयाला मदत करु या, आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य घडणार नाही, त्याची खबरदारी घेऊ या आणि आपल्या कृतीने समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद फुलवू या असे प्रत्येकाने ठरवले तर क्षणभंगूर असेलेले आपले मानवी जीवन सार्थकी लागेल...

5 comments:

  1. सहमत आहे.पुढच्या क्षणी काय( चांगले-वाईट दोन्ही शक्यता ) होणार आहे हे कोणालाच ठाउक नसते. निदान हा क्षण तरी प्रेमाने जगण्यात व ते वाटण्यात जगणे नक्कीच आपल्या हाती असते. पण अनेकजण नुसते रडतच राहतात तर अनेकजण बेफिकीर असतात.
    शेखर लेख आवडला.

    ReplyDelete
  2. खुप छान आहे. लिहिलेलं प्रत्येक वाक्य पटलं.
    आजकाल आयुष्य म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं झालंय,तरी पण त्या धारेमुळे जखमी न होता, पुढे चालत रहाणं हे महत्वाचं.

    ReplyDelete
  3. भानस, महेंद्र नमस्कार
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
    शेखर

    ReplyDelete
  4. खुपच छान लिहीले आहे...खरय अगदी म्हणतात ना ,’जिंदगी ये छोटी है पुरी वसुल कर...’ हे वाक्य सकारात्मक पद्धतीने अवलंबले की आयुष्य सुंदर होते. आजचा आत्ताचा क्षण आपला....भरपुर जगायला हवयं!!!!

    ReplyDelete
  5. सहजच,
    आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल आभार.
    शेखर

    ReplyDelete