15 November 2009

नवा भस्मासूर

महाराष्ट्रात इतकी वर्षे राहून मला मराठी येत नाही असे निर्लज्जपणे सांगत आणि राज्य घटनेचा आधार घेत अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली. सोयीचे असेल केव्हा भारतीय राज्य घटनेचा आधार आणि सोयीचे नसेल तेव्हा ती धाब्यावर बसवण्याचा हा प्रकार आहे. अबू आझमी यांने केलेल्या या कृत्यामुळे समाजवादी पक्षाला आनंदाच्या उकळ्या फूटत असून अबूला आता त्याचा जाहीर सत्कार करुन त्याला पद्धतशीर हिरो बनवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र यातून नवा भस्मासूर निर्माण होणार आहे, असे मला वाटते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवाले यांच्या रुपाने असाच भस्मासूर निर्माण केला होता मात्र शेवटी त्यानेच त्यांचा बळी घेतला, हा इतिहास विसरुन चालणार नाही. अखंड भारताची फाळणी होऊन केवळ धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झाले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या देशात बहुसंख्य हिंदू नागरिक राहिले. त्यामुळे जर धर्माच्या नावावर पाकिस्तान निर्माण झाले तर भारताला हिंदुस्थान या नावाने ओळखायला आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांनीही तसे नामकरण करायला काहीही हरकत नव्हती. परंतु मुस्लिमांचे तुष्टीकरण हाच एककलमी कार्यक्रम असल्यानुसार कॉंग्रेसने आपल्या देशाला सर्वधर्मसमभाव असलेला किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यास सुरुवात केली. आज इतक्या वर्षानंतर काय दिसते, आपण खरोखरच धर्मनिरपेक्ष आहोत का, भारतात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्याऐवजी अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमांचे लाड का केले जातात, खुद्द पाकिस्तानातही अल्पसंख्य असलेल्या हिंदुना भारतातील मुस्लिमांसारखे स्थान आहे का, भारतात मुस्लिमाना शासन दरबारी जितकी मानाची पदे मिळाली तितकी ती पाकिस्तानातील हिंदुना मिळाली का, भारतात धर्माच्या आणि अन्य बाबतीत मुस्लिमाना जितक्या सलवती मिळतात, तितक्या त्या जगातील अन्य मुस्लिम राष्ट्रांमध्ये राहणाऱया मुसलमानांना तरी मिळतात का, खुद्द पाकिस्तानातील मुसलमान किंवा अल्पसंख्य असलेल्या हिंदूना मिळतात का, याची उत्तर नाही अशीच आहेत. आजच बहुतेक मराठी दैनिकात समाजवादी पक्षासंदर्भातील एक बातमी वाचनात आली. हिंदीतून शपथ घेण्याच्या हट्टामुळे अबू आझमी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यामुळे झाल्या प्रकाराचा फायदा उठविण्यासाठी समाजवादी पक्षातर्फे आता अबू आझमी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ मुस्लिम तुष्टीकरणासाठी कॉंग्रेस आणि सपा यांच्यात चाललेली स्पर्धा आहे, असे मला वाटते. आजवर कॉंग्रेस पक्ष म्हणजे मुस्लिमांचा कैवारी अशी प्रतिमा होती. मात्र गेल्या काही वर्षात समाजवादी पक्षाने आपली प्रतिमाही (ज्या पक्षाचा अध्यक्ष एक हिंदू आहे ) मुस्लिमांचा पक्ष म्हणून निर्माण केली आहे. कॉंग्रेसने आजवर मुस्लिमांच्या मतपेढीवर डोळा ठेवून, स्वतला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत कायम धर्माधिष्ठीत राजकारण केले. त्यासाठी देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भावनांना नेहमीच पायदळी तुडवले. मुस्लिम आक्रमकाच्या नावाने ओळखली जाणारी आणि गेल्या कित्येक वर्षात ज्या मशिदीत नमाजही पढला जात नव्हता ती बाबरी मशिद पाडली गेली म्हणून मुस्लिमांच्या बरोबरीने याच कॉंग्रेसी मंडळीनी आपले उर बुडवून घेतले होते. देशातील कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा अशी होती की या ठिकाणी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. काळाच्या ओघात बाबराकडून तेथील मंदिर उध्वस्त करून तेथे मशिद बांधण्यात आली. त्यामुळे हे स्थान हिंदूना देण्यात यावे, अशी समस्त हिंदूंची भावना होती. त्यामुळे कॉग्रेस शासनाने ठणकावून हा वाद तेव्हाच का नाही सोडवला. पण आपण तसे केले तर आपली प्रतिमा हिंदुचे कैवारी अशी होईल, मग मुस्लिम मतपेढी नाराज झाली तर काय, वंदे मातरम हे राष्टीय गीत म्हणण्यास नकार देणाऱया इमाम आणि मौलवीनाही साधी अटक करुन गुन्हा दाखल करण्याची धमक कॉंग्रेसचे नेते दाखवू शकलेले नाहीत. आता कॉंग्रेसच्या बरोबरीने समाजवादी पक्ष मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे. अबू आझमीला महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात जी मारहाण झाली, त्याचे भांडवल करुन अबू आझमी याला मुस्लिमांचा नेता म्हणून पुढे आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. मात्र असे करणे म्हणजे नवा भस्मासूर निर्माण करण्यासारखे आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच खलिस्तान समर्थक भिंद्रनवाले याचा भस्मासूर तयार केला आणि शेवटी त्याच भस्मासुरामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे समाजवादी पक्षाने अबू आझमी याला प्रोत्साहन देऊन नाहक हिरो करु नये. मुस्लिमांचा नेता म्हणून त्याला पुढे आणणे हे समाजवादी पक्ष आणि या देशासाठीही घातक ठरू शकते. वेळीच सावध व्हावे...

1 comment:

  1. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे म्हणजे देशद्रोह आहे असं ज्यांना वाटतं, त्यांना वंदे मातरम नाकारणं हे स्वत:छ्या धर्माचं रक्षण वाटतं. कॉंग्रेसच्या राजकारणाला जनता वेळोवेळी बळी पडूनही पुन्हा कॉंग्रेसलाच निवडून आणते. निदान आता तरी लोकांनी सावध व्हावं.

    महाराष्ट्रात घडलेल्या अबूच्या ’धाडसी’ कृत्यासाठी त्याचा उत्तर भारतात सत्कार का करणार आहेत, ते अजूनही समजलं नाही. सपा. अबूला हिरो करून नवा भस्मासूर बनवत आहे, हे खरंच आहे.

    ReplyDelete