इतिहास संशोधक पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास या पुस्तकात विश्वप्रसृत हिंदू कालगणना असे एक प्रकरण आहे. या प्रकरणात त्यांनी जगातील कालमापन हे पूर्वापार भारतीयांनीच ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच आजही कसे सुरू आहे ते तसेच इंग्रजी महिन्यांची नावेही विश्वव्यापी भारतीय वैदिक संस्कृतीत प्राचीनकाळी विविध महिन्यांचा उल्लेख कसा केला आहे, ते सांगितले आहे. ही सर्व माहिती विचार करायला लावणारी आहे.
पुस्तकातील सप्ताह-महिन्यांचे क्रमही भारतीयच या शीर्षकाखाली असलेल्या मजकुरात लेखक म्हणतात की, साठ सेकंद म्हणजे एक मिनिट आणि साठ मिनिटे म्हणजे एक तास हा हिशोब भारतीयांनी रुढ केलेल्या गणनेनुसार आहे. भारतीय पद्धतीनुसार साठ विपळे म्हणजे एक पळ आणि साठ पळे म्हणजे एक घटी. यावरुन असे दिसते की ६०-६० चा भारतीय हिशोब तसाच राहून घटी, पळे, विपळे या परिभाषेऐवजी तास, मिनिटे आणि सेकंद ही नावे युरोपात रुढ झाली.
hour (आवर) हा आंग्ल शब्द मुळात होरा असा संस्कृत आहे. होरा शब्दाचाच hour असा आंग्ल अपभ्रंश झाला. अडीच घटकांचा एक होरा. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. म्हणून अडीच घटकांचा एक तास hour ऊर्फ होरा म्हटला जातो.
दिवसांचा साप्ताहिक क्रमही भारतीयांनी ठरवून दिलेल्या प्रथेनुसारच संबंध जगात बिनबोभाट पाळला जातो. उदा. शनिवारनंतर रवीचा वार. नंतर सोमवार म्हणजे चंद्राचा वार आंग्ल भाषेत Monday असा जो शब्द आहे तो मुळात Moonday (म्हणजे चंद्रावार) असा होता. भारतीय वैदिक सम्राटांचे जगावर प्रभुत्व नसते तर वरील क्रम कोणीच मानला नसता.
यौरोपीय महिन्यांची नावेही पाहा. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ही नावे सप्तांबर, अष्टांबर, दशांबर अशी संस्कृत आहेत. अंबर म्हणजे आकाश. जन्मपत्रिकेत आकाशाचे बारा भाग कल्पिले असून त्यास अनुसरून १२ राशी आणि १२ महिने केले गेले आहेत. महिने मोजण्याचे दोन प्रकार असतात. वाटल्यास चैत्र वैशाख अशा विशिष्ट नावाने उल्लेख करावा किंवा पहिला महिना, दुसरा महिना असा करावा. या संख्याक्रमानुसार पहिला महिना म्हणजे एकांबर. दुसरा म्हणजे द्वितीयांबर. अशा क्रमाने सप्तांबर, अष्टांबर, आणि नवांबर ही अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या, दहाव्या महिन्यांची नावे आहेत. युरोपात ही जी नावे उरली आहेत, त्यावरून विश्वव्यापी भारतीय वैदिक संस्कृतीत प्राचीन काळी विविध महिन्यांचा उल्लेख अशा प्रकारे त्यांच्या संख्याक्रमाने होई, असे दिलून येते.
सप्टेंबर हा नावानुरुप सातवा महिना. परंतु प्रचलित यौरोपीय प्रथेनुसार तो नववा महिना आहे. ही विसंगती कशी निर्माण झाली ह्याचे स्पष्टीकरण वास्तविक यौरोपीय लोकानीच द्यायला पाहिजे. पण बहुतेकांना त्याची जाणीव सुद्धा नाही तर ते त्याचे विवरण ते काय देणार. मात्र या विसंगतीवरून एका नवीन ऐतिहासिक तथ्याचा सुगावा लागतो. ते तथ्य असे की मार्च हा पहिला महिना धरला तरच सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे संख्याक्रमाने सातवे, आठवे, नववे आणि दहावे महिने ठरतात. या वरून असा निष्कर्ष निघतो की प्राचीनकाळी युरोपात मार्च महिन्यात नववर्षदिन पडे. म्हणूनच मार्च हा पहिला महिना गणला जाई. आणि हुबेहुब प्राचीन इतिहासापासून तेच सिद्ध होते. उदा. इसवीसन १७५२ पर्यंत आंग्ल देशाचे नवे वर्ष २५ मार्च पासूनसुरु होई. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदा त्याच सुमारास येते. इराणी नवरोझही त्याच सुमारास येतो.
ऑगस्ट हे एखा यौरोपीय महिन्याचे नाव ऑगस्टस सीझर या रोमन सम्राटाच्या नावावरून पडले असा समज सध्या रुढ आहे. तो समज खऱा असला तरी त्या सम्राटाचे नाव ऑगस्टस पडण्याचे कारण काय, हे पाहिले तर अगस्च ऋषी हे प्राचीन विश्वात फार ख्याती पावल्यामुळे त्यांचे नाव रोमन सम्राटांनी पदवीरुपाने धारण केले. कॅलेंडर (calendar) हा यौरोपीय शब्द मुळात कालांतर म्हणजे काळाचे अंतर दाखविणारा तक्ता अशा अर्थाचा संस्कृत आहे. आंग्ल भाषेत मोठ्या घड्याळाला क्लॉक (clock) म्हणतात. तो काल-क म्हणजे काळाची नोंद ठेवणारे यंत्र अशा अर्थाचा शब्द आहे.
काळाच्या उलथापालथीत ऐतिहासिक इमारतींची जशी नासधूस होते, तशी ती हिंदू संवत्सरातील महिन्यांची झालेली आपणास दिसून येते. कालौघात अशी वाताहत सतत सुरु असते. तरी त्या खंडीत चिन्हांवरून लुप्त इतिहासाची जुळणी करता येते.
(हे पुस्तक मनोरमा प्रकाशन, १०२/सी, माधववाडी, पहिला मजला, दादर मध्य रेल्वे स्थानकासमोर, दादर-पूर्व, मुंबई-४०००१४ यांनी प्रकाशित केले आहे. दूरध्वनी संपर्क ०२२-२४१४८२९९)
No comments:
Post a Comment