इतिहास संशोधक (ज्यांनी ताजमहाल नव्हे तेजोमहालय हे पुस्तक लिहिले ते ) पु. ना. ओक यांनी लिहिलेला आणि अभ्यासपूर्ण विवेचन केलेला हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास हा ग्रंथ नुकताच वाचनात आला. आजवर झालेल्या इतिहास संशोधन आणि अभ्यासाला एक वेगळी दिशा देणारा असा हा ग्रंथ म्हणता येईल. प्राचीन काळी संपूर्ण जगभरात वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीच कशी पसरलेली होती, ते ओक यांनी या ग्रंथात उलगडून दाखवले आहे.
पुस्तकाच्या अर्पण पत्रात ओक यांनी म्हटले आहे की, प्रचलित परिपाठाहून पूर्णपणे भिन्न अशा माझ्या संशोधन प्रणालीत प्रस्तुतचा ग्रंथ अभूतपूर्व व सर्वकष ठरावा. कारण अनेक ऐतिहासिक रहस्ये, गैरसमजूती आणि ब्रह्मघोटाळे यांची उकल करून जागतिक इतिहासाचा समन्वय करून दाखवणारी गुरुकिल्ली असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
वैदिक संस्कृती आणि संस्कृत भाषा हाच सर्व मानवांचा मूळ वारसा आहे, हे चिरकाल लुप्त झालेले ऐतिहासिक सत्य सर्वांच्या कानी जायला हवे.
या ग्रंथाचे हिंदू विश्वप्रसार, वैदविज्ञानाचे प्राचीनत्व व विश्वप्रसार, इतिहास लेखन, संशोधनाचे तंत्र आणि घटना खंड असे चार भाग केलेले आहेत. हिंदू विश्वप्रसार या पहिल्या भागात हिंदू शब्दाची व्युत्पत्ती, पूर्वेकडील हिंदू संस्कृती, पश्चिमेकडील हिंदू संस्कृती, संस्कृतोद्भव विश्वभाषा, हिंदू देवतांचे विश्वपूजन, जगातील हिंदू पदव्या आणि प्रथा, विश्वव्यापी हिंदू राजचिन्हे, विश्वव्यापी हिंदू शिक्षण पद्धती, विश्वप्रसृत हिंदू कालगणना, हिंदू संगीताचा विश्वप्रसार, युरोपखंडातील हिंदू संस्कृतीचे रामनगर केंद्र, यदुकुलाचे यहुदी लोक, कृस्तियांची हिंदू परंपरा, इस्लामचे हिंदुत्व, स्पेन, फ्रान्स व जर्मनतील हिंदू संस्कृती, अमेरिका खंडातील प्राचीन हिंदू संस्कृती, विश्वव्यापी प्राचीन हिंदू वैद्यकशास्त्र, आर्यावर्त असे विषय हाताळले आहेत.
वेदविज्ञानाचे प्राचीनत्व आणि विश्वप्रसार या भागात वेदांचे ऐतिहासिक स्वरुप, हिंदूंचे प्राचीन मुलभूत वाङ्मय, प्राचीन हिंदूंचे वेदविज्ञान, हिंदूंचे प्राचीन यांत्रिक-तांत्रिक ज्ञान, जागतिक वैदिक वारशाचा पुरावा, प्राचीन भारताची शास्त्रीय प्रगती यांचा उहापोह करण्यात आला आहे तर इतिहास लेखन व संशोधनाचे तंत्र या भागात प्रचलित इतिहासातील काही ढोबळ दोष, इतिहास पुनर्लेखनाची आवश्यकता, ऐतिहासिक कुट प्रश्नांचा उलगडा, इतिहासकारांचे अक्षम्य अपराध याविषयी सांगितले आहे.
हे पुस्तक मनोरमा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ६२८ पानांच्या या ग्रंथाची किंमत सहाशे रुपये इतकी आहे.
प्रकाशक-अनिल रघुनाथ फडके, मनोरमा प्रकाशन, १०२, सी-माधववाडी, दादर मध्य रेल्वे स्थानकासमोर, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४
दूरध्वनी ०२२-२४१४८२९९
p n oak = fekafeki
ReplyDelete