महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने द संडे इंडियन वृत्तसाप्ताहिक (मराठी आवृत्ती) आणि आयआयपीएम प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मानबिंदू महाराष्ट्राचे यशोगाथा शंभर मराठी आयडॉल्सची हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.
आपापल्या कायर्क्षेत्रात स्वतच्या कर्तगारीने वेगळा ठसा उमटविणाऱया विविध व्यक्तींची ओळख आणि त्यांचा प्रवास यात उलगडून दाखविण्यात आला आहे. यातील सर्व व्यक्तीमत्व सगळ्यांच्या माहितीची असतीलच असे नाही. पण जीवनात आलेल्या अडचणी, अपयश आणि आपल्यातील मर्यादेवर मात करत जीवनात केलेली यशस्वी वाटचाल अनेकांना मार्गदर्शक ठरणार आहे.
या पुस्तकाचे संपादक देवदास मटाले यांनी आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, मराठी माणूस म्हणजे नोकरदार, चाकरमानी ही मागे सरलेल्या काळातील प्रतिमा झाली. अर्थात तेव्हाही मराठी समाजातील कित्येकांचे कर्तृत्व गगनाला भीडणारे होतेच आणि कित्येक क्षेत्रांवर मराठी जनांनी आपल्या असमान्य कर्तगारीने स्वतचा असा ठसा उमटवला होता. आज ही कर्तबगारी अधिक व्य़ापक होऊ लागली आहे. म्हणूनच उत्तुंग यश मिळविणाऱया असमान्य कर्तबगारीच्या बुजर्गासोबतच वेगळ्या वाटा चोखाळून आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
यश, कर्तगारी ही कोणत्याही चौकटीतल्या व्याख्येत बसवता येत नाही. आपण आपली वेगळी वाट धुडाळून यशाचा एक नवा फॉर्म्युला जगासमोर ठेवायचा असतो. हे शालेय विद्यार्थ्यांना सांगण्याच्या मुख्य उद्देश या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. काही विशिष्ट क्षेत्रांची, व्यक्तिमत्वांची निवड ही म्हणूनच खास मुलांना डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकातील काही आयडॉल्सच्या महत्वाच्या वाक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात आयटी उद्योजक दीपक घैसास, अभिनेता अतुल कुलकर्णी, शेफ निलेश लिमये, कवी संदीप खरे, सामाजिक कायर्कर्ते डॉ. अभय आणि राणी बंग यांचा समावेश आहे. त्यांचे हे विचार विद्यार्थी आणि तरुणांना नक्कीच प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरतील.
द संडे इंडियन आणि आयआयपीएम प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच महाराष्ट्रातील पर्यटन, संस्कृती, उद्योग आदी विविध विषयांवरील माहितीचा आढावा घेणारी पुस्तकेही प्रकाशित केली जाणार आहेत. खरे तर अशा प्रकारारचे काम महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याच्या या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने करणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. त्यामुळे द संडे इंडियन आणि आयआयपीएम प्रेस यांचा हा उपक्रम अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे.
या पुस्तकात चित्रकार अनंत जोशी, आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट-क्रिएटिव्ह डायरेक्टर या पदावर काम करणारे राज कांबळे, मराठी बाणा कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे, आयसीआयसीआय व्हेन्चर फंड्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाखा मुळ्ये, मिस अर्थ सौदर्यस्पर्धेचा किताब जिंकणारी पहिली भारतीय अमृता पत्की आणि अन्य अनेक व्यक्तींचा परिचय करून देण्यात आला आहे. त्याचा हा परियच अनेकांच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणेल.
पुस्तकाचे संपादक देवदास मटाले यांचा संपर्क
feedback.greatmarathi@gmail.com
No comments:
Post a Comment