रिक्षाची दरवाढ बुधवारपासून लागू झाली. बहुतेक ग्राहक मनातल्या मनात चरफडत ही दरवाढ स्वीकारतील. पण, दरवाढीपूर्वी मंगळवारी अचानक संपावर जाऊन रिक्षाचालकांनी मुंबईकरांना वेठीस धरले त्यास प्रत्युत्तर म्हणून ग्राहक एक दिवस रिक्षांवर बहिष्कार टाकणार का, असा सवाल मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केला आहे.
कोणतीही दरवाढ काही निश्चित निकषांवर केली जाते. रिक्षाची दरवाढ करताना वाहनाची किंमत, रिक्षाचालकांच्या राहणीमानाचा निर्देशांक, इंधनाची किंमत आणि वाहनासाठी भरण्यात येणाऱ्या विम्याची रक्कम तसेच इतर कर हे घटक लक्षात घेतले जातात. सीएनजीची वाढीव किंमत, रिक्षाचा सध्याचा बाजारभाव आणि इतर खर्च लक्षात घेऊन ६.२३ रुपये प्रति किलोमीटर एवढा दर मिळतो. पहिला टप्पा १.६ किलोमीटरचा असल्याने ६.२३ गुणीले १.६ हा हिशेब केल्यावर ९.९६ हे उत्तर मिळते आणि पूर्णाक करता रिक्षाचा दर हा १० रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ६.५० रुपयांचा दर असणे अपेक्षित होते.
ग्राहक पंचायतीने हा सर्व हिशेब राज्याचे परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर ठेवला होता. परंतु ‘ना तेरा ना मेरा’ असे म्हणत परिवहनमंत्र्यांनी रिक्षावाल्यांचे समाधान करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठीचा दर ११ रुपये आणि ग्राहक पंचायताचे समाधान करण्यासाठी पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ६.५० रुपये एवढा दर कायम केला. परंतु, अशास्त्रीय पद्धतीने मंजूर केलेली ही दरवाढ अमान्य असल्याचे देशपांडे म्हणाले.
दरम्यान, भारतात अजूनही ‘मैल’ हे परिमाण धरून दरआकारणी केली जाते. त्यामुळे एक किलोमीटरऐवजी १.६ किलोमीटरचा पहिला टप्पा गृहित धरला जातो. त्यामुळे थोडय़ाशा अंतरासाठीही प्रवाशाला अधिक अंतराचा ज्यादा दर द्यावा लागतो. या संदर्भातील प्रस्तावही परिवहन मंडळाकडे देण्यात आला आहे आणि तो तत्वत: मान्य झाल्याची माहितीही देशपांडे यांनी दिली.
मुंबईतील बुहतेक उपनगरांमध्ये प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा अनुभव येतो. विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली, मुलुंड या ठिकाणी रिक्षावाले प्रवाशांना भाडे नाकारत असल्याच्या कित्येक घटना घडतात. रिक्षावाल्यांना हव्या त्या ठिकाणी प्रवाशाला जायचे नसेल तर ते चक्क नकार देतात. परंतु, अनेकदा प्रवाशांना इच्छित ठिकाणी पोहोचण्याची घाई असल्यामुळे कोणी तक्रार करण्याची तसदी घेत नाहीत. स्वत: परिवहनमंत्र्यांनी अंधेरी, बोरिवली येथे रिक्षावाल्यांच्या वागणुकीचा अनुभव घ्यावा, असेही शिरीष देशपांडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्राहकांकडून घेण्यात येणारे शुल्क व त्यांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा यात काहीतरी ताळमेळ असणे गरजेचे असते. रिक्षाचालकांबाबत मात्र हे अजिबात दिसून येत नाही, अशी तक्रारही देशपांडे यांनी केली आहे. याबाबत आता ग्राहकांनीच कडक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. बेकायदेशीर संप आणि अशास्त्रीय पद्धतीने झालेली दरवाढ या दोन्ही मुद्दय़ांवर पुढे काय पाऊल उचलायचे याबाबतची येत्या शनिवारी होणाऱ्या ग्राहक पंचायतीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त २४ जून २०१० च्या अंकात पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झाली आहे)
शिक्षणासोबतच हा पण एक सरकारी गोंधळच आहे. कल्याण - डोंबिवलीचे रिक्षावाले शासनाचे निर्णय लागू करायला नाही म्हणतात तर "स्वाभिमानी" मुंबईत गोंधळ घालतात. सामान्य माणूस मात्र सर्वत्र भरडला जातोय, त्याला कोणीच वाली नाही.
ReplyDeleteश्री. शिरीष देशपांडे यांनी अपेक्षील्या प्रमाणे मी आजपासुनच मुंबईत रिक्षावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला आहे. इतरांनी रोजचा बहिष्कार घालणे शक्य नसेल तर सर्व जनतेने प्रत्येक बुधवारी रिक्षाप्रवास बंद करावा. बघा हे मुजोर रिक्षावाले कसे ताळ्यावर येतात.
दिनकर,
ReplyDeleteनमस्कार
प्रतिसादाबद्दल आभार. मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाबतीत आपण घेतलेला निर्णय स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. पण आपण प्रवासी म्हणून रिक्षाचालकांप्रमाणे एकजूट दाखवत नाही. त्याचाच फायदा रिक्षाचालक घेतात. आपण म्हणता त्यानुसार सर्व प्रवाशांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी रिक्षावर बहिष्कार टाकण्यास काहीच हरकत नाही. मी सुद्धा रिक्षाचा वापर फारसा करत नाही. गावात कुठेही जायचे असले तरी चालतच जातो. अगदी क्वचित रिक्षाचा वापर करतो.
शेखर