समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरील सुनील चिंचोलकर लिखित चिंता करितो विश्वाची हा ग्रंथ नुकताच वाचनात आला. १४ मार्च २००६ मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती आणि अवघ्या तीन वर्षात पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. हा ग्रंथ श्री गंधर्व वेद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. ४७२ पानी या ग्रंथाची किंमत ४०० रुपये इतकी आहे.
प्राचार्य राम शेवाळकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. या ग्रंथात मोगलांच्या आक्रमणाने पिचलेला महाराष्ट्र, समर्थ रामदास स्वामी यांचे पूर्वज, समर्थांची जन्मभूमी, त्यांचे माता-पिता, थोरले बंधू, समर्थांचा जन्म, त्यांचे बालपण, श्रीराम यांचे झालेले दर्शन व अनुग्रह, विवाह मंडपातून पलायन, नाशिक येथे पंचवटीला झालेले आगमन, टाकळीतील दिनचर्या, करुणाष्टकांची रचना, शहाजी राजे व बालशिवाजी यांची भेट, पहिला मठ, पहिला मारुती व पहिला शिष्य, समर्थ रामदास स्वामी यांचे भारत भ्रमण, महाबळेश्वर येथे झालेले आगमन, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट, सज्जनगडावरील वास्तव्य, समर्थ रामदास स्वामी यांचे राजकारण असे विविध विषय या ग्रंथाच हाताळले आहेत.
समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झालीच नाही, रामदास स्वामी शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे काही मंडळींकडून सांगण्यात येते. चिंचोलकर यांनी या ग्रंथात काही जुने दाखले, हस्तलिखिते यांचे दाखले देऊन रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची अनेक वेळा भेट झाली होती, शिवाजी महाराजांना रामदास स्वामी वेळोवेळी कसे मार्गदर्शन करत होते, हे स्पष्ट केले आहे.
चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने लेखक चिंचोलकर या ग्रंथात म्हणतात की, शंभर दिवसात लिहिलेला हा ग्रंथ शंभर दिवसात छापून तयार झाला. त्याची पहिली आवृत्ती प्रकाशनपूर्व नोंदणीतच संपली. चौथी आवृत्ती समर्थभक्तांच्या सेवेसाठी सादर करत आहोत. आता वेध लागले आहेत ते या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशनाचे. या इंग्रजी अनुवादाच्या ४०० प्रती जगातील ४०० ग्रंथालयांना भेट म्हणून पाठवून समर्थांची ४०० वी जयंती संपन्न करण्याचे सदभाग्य समर्थांनी आम्हास द्यावे, ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र प्रार्थना.
हा संपूर्ण ग्रंथ अभ्यासकांच्या दृष्टीने आणि समर्थ भक्तांसाठीही महत्वाचा आहे.
प्रकाशक संपर्क
दीपक खाडिलकर, श्री वेद गंधर्व प्रकाशन, १२८६, सदाशिव पेठ, चिमण्या गणपतीजवळ, पुणे-४११०३०, दूरध्वनी (०२०-२४४९३५०२)
लेखक संपर्क
सुनील चिंचोलकर, अजिंक्य नगर, हिंगणे खुर्द, पुणे-४११०५१
दूरध्वनी (०२०-२४३४८०७०)
No comments:
Post a Comment